नमुंमपा आयुक्तांचे निर्देश
नवी मुंबई : यावर्षी ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीत श्रीगणेशोत्सव आणि ३ ते १२ ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रौत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवामध्ये अवलंबावयाच्या प्रक्रियेबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली १४ ऑगस्ट रोजी विशेष बैठक संपन्न झाली असून या बैठकीत देण्यात आलेले निर्देश तसेच शासनाकडून मागील वर्षी पर्यावरणपूरक सण साजरा करणेच्या अनुषंगाने प्राप्त मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्यात येत आहे.
- सार्वजनिक गणेशोत्सवासाठी गणेशोत्सव मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील.
- न्यायालयाने निर्गमीत केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबधीत स्थानिक प्रशासनाचे मंडपांबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
- सर्व गणेशभक्त, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिक / भक्तजनांना विनम्र आवाहन करण्यात येते की, शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) पासून घडविलेल्या श्री गणेशमूर्तीं / दुर्गामातेची विक्री अथवा खरेदी करु नये.
- प्लास्टर ऑफ पॅरिस (पी ओ पी) मूर्तींऐवजी शाडू मातीपासून घडविलेल्या मूर्तींची प्रतिष्ठापना करावी.
- पारंपारिक गणेशमूर्तींऐवजी घरातील धातू / संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे. मूर्ती शाडूची / पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास नजिकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे.
- सार्वजनिक उत्सवाकरिता वर्गणी / देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्विकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्य विषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी.
- सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम / शिबीरे (उदा.रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या व वस्तू यांचा वापर टाळण्यात यावा.
- वेळोवेळी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार इतर निर्बंध कायम राहतील.
- आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करतांना गर्दी होणार नाही तसेच कोर्टाच्या निर्णयानुसार ध्वनी प्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे.
- श्रीगणेश दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबूक इत्यादींद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.
- श्रीगणेश मंडपांमध्ये निर्जंतुकीकरणाची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन इच्छिणा-या भाविकांसाठी स्वच्छतेचे नियम पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.
- विसर्जनाच्या पारंपारिक पध्दतीत विसर्जन स्थळी होणारी आरती घरीच करुन विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले (बालके) आणि वरिष्ठ नागरिकांनी, गर्भवती महिलांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे.
- विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने शक्य झाल्यास श्रीगणेशमुर्तींच्या विसर्जनाकरिता त्याच परिसरात कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच महानगरपालिकेमार्फत निर्मित कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्यात यावे.
- महाराष्ट्र शासन तसेच महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या तसेच वेळोवेळी दिलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही महाराष्ट्र शासनाच्या मागदर्शक सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.
- गणेशोत्सव व नवरात्रौत्सवाच्या अनुषंगाने अवलंबविण्याच्या परवानगी प्रक्रियेबाबत विभाग स्तरावर सर्व विभाग कार्यालयांमध्ये बैठक आयोजित करण्यात येणार असून, मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सदर बैठकीस उपस्थित रहावे व नियमानुसार उत्सव साजरे करावेत.
- नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात तात्पुरत्या स्वरुपात मंडप, ध्वनी प्रदूषण नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी आणि रस्ता, पदपथ व पादचारी मार्गावर तात्पुरत्या स्वरुपात मंडप व तत्सम रचना उभारणे संदर्भात उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १७३/२०१० संदर्भात दिलेल्या निर्देशानुसार गतवर्षीप्रमाणे यावर्षीही मंडप उभारणेची परवानगी देण्याची “इ-सेवा संगणक प्रणाली” महापालिकेने विकसीत केली आहे.
सर्व गणेशोत्सव / नवरात्रौत्सव मंडळे व नागरिक यांनी नवी मुंबई महापालिकेच्या https://app.nmmconline.in या संकेतस्थळावर गणेशोत्सवामध्ये मंडप उभारणेकरिता परवानगी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन सेवा सुरु केली आहे. मंडप उभारणीकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत कोणतेही शुल्क अथवा अनामत रक्कम आकारण्यात येणार नाही. तसेच नवरात्रौत्सवासाठी सुध्दा याच वेबसाईटवरवर मंडप उभारणेकरीता परवानगी अर्ज सादर करावयाचे आहेत. दोन्ही उत्सवासाठी उत्सव सुरु होण्यापूर्वी दहा दिवस अगोदर ऑनलाईन प्रणालीव्दारे परवानगी देणे आवश्यक आहे, असे सूचित करण्यात येत आहे.
- गणेशोत्सव व नवरात्रौत्सव याकरिता सर्व संबधीत विभागांची परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी सुरु करु नये, तसेच केवळ परवानगी अर्ज दाखल केल्यामुळे परवानगी मिळेल असे गृहीत धरु नये. महानगरपालिका हद्दीत कोणत्याही मंडपाची उभारणी परवानगीशिवाय केल्यास अशा मंडपावर निष्कासनाची तसेच कायदेशीर कार्यवाही केली जाईल. सर्व गणेशोत्सव व नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळ / नागरिकांनी याची दक्षता घ्यावी असेही सूचित करण्यात येत आहे.
- मंडप उभारणी परवानगी अर्ज उपरोक्त नमूद कालावधीमध्ये महानगरपालिकेच्या संबंधित विभाग कार्यालयाकडे https://app.nmmconline.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावेत. लेखी परवानगी प्राप्त झाल्याशिवाय कोणत्याही प्रकारच्या मंडपाची उभारणी करु नये. विशेष करुन गणेशोत्सव / नवरात्रौत्सव व अन्य धार्मिक कार्यक्रम सादर करणा-या मंडळानी याची नोंद घ्यावी. उत्सव सुरु होण्याच्या 10 दिवस अगोदर कोणतेही परवानगी अर्ज विभाग कार्यालयात स्विकारले जाणार नाहीत किंवा मंडप उभारणेसाठी परवानगी दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.
तरी, या सर्व बाबींचे पालन करून नागरिक व मंडळांनी अत्यंत उत्साहात गणेशोत्सव साजरा करावा तसेच आपल्या पर्यावरणाची काळजी घेत पर्यावरणाला हानी पोहचविणा-या प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळून ‘प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव’ साजरा करावा तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी श्रीमूर्ती विसर्जनासाठी आपल्या नजिकच्या कृत्रिम तलावांचा वापर करावा, फटाक्यांचा वापर टाळून वायूप्रदूषण टाळावे, ठराविक मर्यादेत ध्वनीव्यवस्था करून ध्वनीप्रदूषण टाळावे तसेच सजावटीमध्ये विघातक थर्माकोलचा वापर टाळून टाकाऊ व पुनर्वापरकरण्यायोग्य वस्तूंचा वापर करावा आणि इकोफ्रेंडली प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.