भालचंद्र कुबल – पाचवा वेद
मायबाप ऑडीयन्स हो, आज मी तुम्हाला सांगणाराय गज्या-चंद्याची गोष्ट. अरुण खोपकरांनी कशी मांडली होती, “कथा दोन गणपतरावांची” जवळपास तशी नाय म्हणता येणार, पण तशीच. काय होतं की एकदा खूप पाऊस पडतो. इतका की सर्वाधिक खपाची सर्व वर्तमानपत्रं मुंबईला सतत पुढले तीन दिवस तुंबई, तुम्बई, तुंबअी म्हणंत ऑनलाईन व्ह्यु मोजत असतात. झोपडपट्ट्या तरंगत असतात, शाळा-बीळांना शासनाने सुट्टी बिट्टी जाहीर केलेली असते, सर्व चॅनल्स एकच न्यूज वेगवेगळा टाईम टाकून ब्रेकिंगच्या नावाखाली खपवत असतात, अशा काळात वॉट्सअॅप, फक्त संघाचे ‘दक्ष’ कसा तुंबईचा यक्षप्रश्न सोडवताहेत याच्या पोष्टीवर पोष्टी ढकलत असतात, अशावेळी घरदार वाहून गेलेला गज्या हतबल होऊन साचलेल्या बाणगंगेचं चित्र वाहून गेल्याच्या दुःखात कुठल्या तरी पुलावर शांतपणे झुरके मारत बसलेला असतो आणि पुढील प्रसंगास सुरुवात होते.
आता सादरकर्त्यानी (कुणीतरी सादर करणार आहे? केवढा तो आशावाद…!) एवढे मात्र लक्षात घ्यावे की संहिता नाटकाची असल्याने पटकथेप्रमाणे “कट् टू”ला वाव नाही. प्रकाश मंदावतो, अंधार, काळोख इत्यादी शब्द त्याला पर्याय म्हणून वापरले जातील. तर, संवादाअगोदर रंगसूचनेनुसार पारंपरिक सुरुवात करू म्हणतो. रंगसूचना म्हणजे कंसातील वाक्ये…!
(गज्या चिंतातुर अवस्थेतून वैफल्यग्रस्त दिसत आहे. सिगारेट शिलगावतो, इतक्यात गाडीच्या हॉर्नचा आवाज. वळून पहातो तर त्याचा मित्र चंद्या सुटाबुटात विंगेतून प्रवेश करतो. तो गज्याच आहे अशी चंद्याची खात्री पटल्यावर…)
चंद्या : अरे वा… सिगारेट पितोयस वाटतं?
गज्या : ( त्वरित सिगारेट विझवतो) हो… इकडे कुठे?
चंद्या : म्हाडाला गेलो होतो…
गज्या : का ?
चंद्या : ती रे परवा म्हाडाची जागेच्या लॉटरी संबंधी जाहिरात नाही का आलीय, त्यात दुरुस्ती करुन आलो.
गज्या : तू सांस्कृतिक खात्यात कामाला ना? मग तुझा त्या जाहिरातीशी काय संबंध?
चंद्या : अरे व्वा… नाही कसा? त्यात असलेल्या ‘कलाकार राखीव कोट्यात’ फॉर्म भरताना “कलाकार म्हणजे लेखक नव्हे” असा तळटिपेत बदल करुन आलो.
गज्या : कळले नाही रे…!? (प्रश्नार्थक उदगारवाचक भाव)
चंद्या : अरे पहिल्या जाहिरातीनुसार सर्व लेखकांनी कलाकार कोट्यावर आपला दावा सांगितला आणि झाली ना पंचाईत, आमची, म्हणजे शासनाची…!
गज्या : पंचाईत कशी (आवाज दोन स्केलने चढवून), पंचाईत कशी? मी सुद्धा तेच केलंय (या वाक्यास गदगदल्याचा स्वर अपेक्षित.) या वर्षी सतत पडलेल्या पावसामुळे घर-दार, भांडी-कुंडी, कपडे-लत्ते, दाग-दागिने, कल्याणजी-आनंदजी सगळे सगळे ओले तरी झाले किंवा वाहून तरी गेले. त्यात ही जाहिरात “नामाची काय कामाची” या आमच्या वॉट्सअॅप ग्रुपवर कुणीतरी ढकलली. मी वहातं दुःख कुठल्याही कुसुमाग्रजांना न सांगता कामाला लागलो. मी स्वतःच स्वतःला ‘लढ म्हण’ म्हणालो. (दिग्दर्शकाने हे वाक्य नटाची बौद्धिक अॅडीशन म्हणून ट्रीट करावे.) मेव्हण्याकडे फॉर्मबरोबरच्या डिपॉझिटसाठी पैसे मागितले. लेखक म्हणून माझी लॉटरी लागू शकते. एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण होऊ शकते, हे मेव्हण्याला आजवरच्या उदाहरणातून पटलंय. त्याचे पैसे घेऊन फॉर्म भरलाय आणि तू माझ्या तोंडचंही पाणी पळवतोयंस याsssर..!
चंद्या : म्हणजे…गज्या तू सुद्धा…! (काही क्षणांची प्रदीर्घ शांतता…आणि लगेचच..)
गज्या : हो हो मी सुद्धा..! (मोठ्ठा बँग, आघाती संगीत किंवा गॉग) मीच काय परंतू… (चंद्याशी अविश्वासाच्या भावनेच्या सुरात) परंतु… तुमच्या या शासकीय खुलाशा मागे असे काय षडयंत्र रचित आहात? ते सांगशील मला ?
चंद्या : (निराशेने पुलाच्या कठड्यावर हात रेलंत आणि समोरच्या सुक्या खाजणाकडे पहात…) लेखक हा कलाकार म्हणवून घेऊ शकत नाही… कारण मग समाजात वावरणारे पत्रकार, कादंबरीकार, स्तंभलेखक एवढेच नाही तर हल्लीचे ‘कंटेंटकार’ आणि कवी देखील स्वतःला कलाकार म्हणू शकतात…
गज्या: मग त्यात चुकीचे ते काय? चौसष्ट कलांपैकी तीही एक आहेच की…! वाङ्मय निर्मिती ही कला नाही?
चंद्या : आमच्या सांस्कृतिकतेच्या व्याख्येनुसार नाही.
गज्या : अरे मग तुम्ही ज्या नाटकांना, सिनेमांना भरभरुन बक्षिसे देता ते लिहितं कोण? गेला बाजार, तुमच्या प्रसारित होणाऱ्या जाहिराती देखील लिहितं कोण? लेखकच ना?
चंद्या : हे बघ गज्या, नाटक हे नाटककार लिहितो, लेखक नाही, सिनेमा पटकथाकार लिहितो लेखक नाही. संवाद-लेखन तर वेगळेच क्षेत्र आहे. त्यामुळे उद्या जर तुला लॉटरी लागली तर डिपार्टमेंट तुला नाटककार म्हणून प्रमाणपत्र देईल, पटकथाकार म्हणून प्रमाणपत्र देईल, गीतकार म्हणून देईल; परंतु लेखक म्हणून नाही… आणि तीच टिप सर्व वर्तमानपत्रांना देऊन घरी चाललोय…!
गज्या : अरे चंद्या (काकुळतीला येऊन) अरे लेखक हा लेखकच असतो, त्याला आरक्षणाच्या नावाखाली विभागू नका… तो त्याला जे जमेल, जसे जमेल, त्या क्षेत्रासाठी लिहितो. आपली कला मुक्त हस्ते वाचकांवर उधळतो…(कणखरपणे) आणि मला अभिमान आहे त्याचा…!
चंद्या : अभिमान नाही हा.. इगो म्हणतात याला… दोन कवडीच्या लेखकाकडून मला हे ऐकावे लागतेय… एका सरकारी अधिकाऱ्याला हे ऐकावे लागतेय? वाहून गेलं म्हणतोयंस ना ? माझ्याकडं बघ, माझ्याकडं फ्लॅट आहे, गाडी आहे, नटीसारखी बायको आहे, खरीखुरी प्रॉपर्टी आहे, काय हाय काय तुज्याकडं?
गज्या: माझ्याकडे पेन (Pain) आहे… (हा श्लेष नटांना दिग्दर्शकाने समजावून सांगावा.)
(विजांचा कडकडाट…मगापेक्षा मोठ्ठा बँग…आणि गज्याच्या खिशावरल्या पेनवर रेड कलरचा फोको)
हळूहळू अंधार होत जातो
आणि पडदा.