(आचार्य अत्रे यांच्या साहित्याचे दर्शन)
फिरता फिरता – मेघना साने
साहित्यसम्राट आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त पुणे येथे राष्ट्रीय फिल्म संग्रहालय, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि ‘आत्रेय’ यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे चित्रपट महोत्सव (दिनांक ११ ते १३ ऑगस्ट ) आणि आचार्य अत्रे विशेष पुरस्कार सोहळा आयोजित केला होता. यानिमित्ताने राष्ट्रीय फिल्म संग्रहालयाच्या प्रांगणात अत्रे यांच्या साहित्याचे, त्यांच्या छायाचित्रांचे, त्यांनी संपादित केलेल्या दैनिकांचे, त्यातील लेखांचे व त्यांच्यावरील बातम्यांचे एक सुंदर प्रदर्शन पाहायला मिळाले. या प्रदर्शनाचे नाव होते, ‘लाख मोलाची ठेव’. हे प्रदर्शन ज्यांनी आयोजित केले होते ते सुहास बोकील अनेक वर्षे अनेक शहरांमध्ये हे प्रदर्शन मांडत असतात अशी माहिती मिळाली. अत्र्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्वाचे दर्शन या प्रदर्शनातून घडवले गेले आहे. बोकील यांच्या या कार्यामुळे त्यांना एक विशेष ओळख मिळाली आहे व या सोहळ्यात त्यांचा सत्कारही करण्यात आला.
भारतीय स्टेट बँकेचे निवृत्त अधिकारी सुहास बोकील यांचे अत्रे प्रेम जगजाहीर आहेच. एखाद्या समारंभासाठी वा संमेलनासाठी आचार्य अत्र्यांच्या भाषणातील उतारा किंवा मराठा वृत्तपत्रातील काही भाग हवा असेल तर लोक सुहास बोकील यांना शोधत येतात. अत्र्यांचे संपादकीय लेख, त्यांची सारी पुस्तके, भाषणांचे ध्वनिमुद्रण बोकील यांच्याकडे जपून ठेवले आहे. त्यांनी एकट्याने जबाबदारी घेऊन आयोजित केलेली अशी आजवर अत्रे साहित्य दर्शनाची ५१ प्रदर्शने झाली. त्यामध्ये पुणे येथे २०, मुंबई उपनगरात ८ आणि नाशिक, औरंगाबाद, सातारा, सासवड येथे काही झाली. तसेच परदेशात लंडन, अमेरिका, दुबई येथेही काही संमेलनात ते प्रदर्शन मांडून सहभागी होऊ शकले.
सुहास शालेय विद्यार्थी असताना त्यांनी अत्र्यांच्या ‘घराबाहेर’ या नाटकात अशोकची भूमिका केली होती. त्यानंतर एकदा वडिलांनी त्यांना ‘मराठा’मधील एक संपादकीय लेख वाचायला सांगितला. तो खूपच मोठा म्हणजे दोन पानी होता. त्यामुळे सुहास यांनी वाचायची टाळाटाळ केली. पण वडिलांनी धमकीच दिली, ‘लेख वाचला नाही तर आज जेवायला मिळणार नाही.’ मग लेख वाचावाच लागला. सुहास यांना अत्र्यांचा लेख वाचता वाचता त्यातील सौंदर्य कळले. पहिलाच परिच्छेद उपमा, अलंकार, म्हणी यांनी नटलेला होता आणि अतिशय सकस होता. तेव्हापासून बोकील अत्र्यांचे लेख जपून ठेवू लागले. पुढे त्याचे प्रदर्शन भरवावे असे काहीच त्यांच्या मनात नव्हते. त्यांना साहित्याची गोडी लागली म्हणून त्यांनी अत्र्यांची पुस्तके मिळवली. ती वाचून काढली.
आचार्य अत्रे यांच्या प्रथमदर्शनाचा योग आला त्याची आठवण बोकील सांगतात ती अशी, ‘पेण येथे १९६० साली अत्रे यांचे भाषण होते. त्यावेळी वडिलांनी सुहास यांना अत्रे किती मोठे आहेत, त्यांची पत्रकारिता, त्यांची भाषणे, त्यांचे साहित्य याबद्दल सांगितले होते. २९ एप्रिल रोजी सुहास यांनी ते भाषण ऐकले व लगेचच दोन दिवसांनी संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि अत्रे महाराष्ट्रातील जनतेच्या गळ्यातील ताईत बनले.’
एकदा कोल्हापूरला कुठल्या साहित्यविषयक मासिकात ऑगस्ट महिन्यात जन्मलेल्या लेखकांबद्दल टिपा होत्या. त्यात परदेशातील मंडळींचाही उल्लेख होता. मात्र १३ ऑगस्टला अत्र्यांचा जन्म झाला याची साधी नोंदही नव्हती. याचे सुहास बोकील यांना वाईट वाटले. म्हणून त्यांनी अत्रे यांची पुस्तके, लेख इत्यादी घराच्या दर्शनी भागात मांडले आणि देवाच्या तसबिरीसमोर बसावे तसे अत्र्यांच्या फोटोजवळ बसून राहिले. येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना अत्र्यांच्या साहित्याची ते माहिती देत राहिले. अर्थात लोकांना अत्रे हे माहीतच होते. मात्र त्यांचे मराठ्यातील लेख नव्या पिढीलाही पाहायला मिळत होते. यातूनच बोकील यांना प्रदर्शनाची कल्पना सुचली.
१९८९ साली कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन येथे बोकील यांनी आचार्य अत्रे साहित्य दर्शन देणारे पहिले प्रदर्शन आयोजित केले. लोकांनी ते उत्सुकतेने पाहिले. मग ठिकठिकाणी प्रदर्शने भरवणे सुरू केले. १९९३ साली सातारा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरले होते. विद्याधर गोखले अध्यक्ष होते. त्यांची परवानगी घेऊन तेथेही ‘आचार्य अत्रे साहित्य दर्शन’ हे प्रदर्शन मोठ्या प्रमाणात लावण्यात आले. त्याचे शीर्षक होते ‘लाख मोलाची ठेव’. परदेशातील मराठी मंडळींनाही आचार्य अत्रे यांच्या साहित्याबद्दल प्रेम आहेच. ही मंडळी पुणे, मुंबई, सातारा अशा ठिकाणाहून लंडन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया येथे गेली आहेत. तेव्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीबद्दल त्यांनाही अभिमान आहे.
मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती या चळवळीमुळे. सुहास बोकील यांनी लंडन येथे त्यांच्या लेकीकडे मुक्काम केला असता २००७ साली महाराष्ट्र मंडळ लंडनचा अमृत महोत्सव होणार आहे असे कळले. बोकील यांनी नकार ऐकण्याची तयारी ठेवून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना संमेलनात अत्रे साहित्य दर्शन देणारे हे प्रदर्शन मांडण्याची परवानगी मागितली. लंडनच्या मराठी माणसांनी कुतूहल दाखवले आणि होकार दिला. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर हे तेथे पाहुणे होते. त्यांनी प्रदर्शनावर सकारात्मक अभिप्राय लिहिला. त्याचप्रमाणे अमेरिकेतील सॅन होजे येथील बीएमएम अधिवेशनात, दुबई येथे विश्व मराठी संमेलनात हे प्रदर्शन यशस्वी झाले. ऑस्ट्रेलियातील ‘आकाशवाणी सिडनी’ या मराठी रेडिओवर त्यांच्या या उपक्रमावर त्यांची एक तास मुलाखत प्रसारित झाली. आजवर झालेल्या प्रदर्शनाला मोठमोठ्या लेखकांनी, पत्रकारांनी, अभिनेत्यांनी अभिप्राय लिहिले आहेत. या अभिप्रायांनी त्यांचे सहा कॅटलॉग भरले आहेत. त्यातील एक अभिप्राय त्यांना मोलाचा वाटतो. माधव गडकरी यांनी लिहिलेला अभिप्राय असा होता ‘जसे ज्ञानेश्वरीची तुलना दुसऱ्या कुठल्याही वाङ्मयाची होऊ शकत नाही, तसेच अत्र्यांच्या साहित्याची तुलनाही दुसऱ्या कुठल्याच वाङ्मयाची होऊ शकत नाही.’
२००९ मध्ये एकाच लेखकाच्या साहित्याची ३० प्रदर्शने आयोजित केल्याबद्दल सुहास बोकील यांचे नाव ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंदले गेले. तर २०१५ मध्ये एकाच लेखकाच्या साहित्याची ४२ प्रदर्शने आयोजित केल्याबद्दल सुहास बोकील ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये चमकले आहेत. वयाच्या ऐंशीव्या वर्षीसुद्धा ते पूर्वीच्याच उत्साहाने ‘लाख मोलाची ठेव’ जपत आहेत आणि प्रदर्शितही करीत आहेत.