टर्निंग पॉइंट – युवराज अवसरमल
‘तू भेटशी नव्याने ‘ या मालिकेत दुहेरी भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत, ती अभिनेत्री म्हणजे शिवानी सोनार. शिवानीचे शिक्षण पुण्यातील शिवाजी नगरमधील पी. इ. एस. मॉडर्न गर्ल्स हायस्कूल येथून झाले. शाळेत असताना लहान गटापासून मोठ्या गटापर्यंत असणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत तिने भाग घेतला. नृत्य, नाटक, वक्तृत्व, लेझीम यांसारख्या स्पर्धेत तिने भाग घेतला. तिचे अकरावी, बारावीचे शिक्षण मॉडर्न कॉलेजमधून झाले, तर पदवीपर्यंतच शिक्षण एम.आय. टी.मधून झाले. अकरावी, बारावी कॉलेजमध्ये असताना पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत तिने भाग घेतला होता.
तिथूनच तिच्या अभिनयाचा श्रीगणेशा झाला. जवळजवळ तीन वर्षे तिने प्रायोगिक नाटकातून कामे केली. बारावीनंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात करिअर करण्याचे निश्चित केले. कारण अभिनय करणे तिला आवडू लागले होते. अभिनय करताना तिला कंटाळा येत नव्हता.
अभिनयाच्या करिअरमध्ये प्रत्येक वळणावर टर्निंग पॉइंट येत गेले असे ती म्हणाली. ‘तू भेटशी नव्याने ‘ही तिची मालिका सोनी मराठी वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता पहायला मिळत आहे. या मालिकेमध्ये ती तन्वी व गौरी या दोन व्यक्तिरेखा साकारत आहे. त्या दोन्ही व्यक्तिरेखा सकारात्मक आहेत. प्रेक्षकांना दोन्ही व्यक्तिरेखा आवडू लागल्या आहेत. गौरी सगळ्यांना घराघरातील वाटते, जवळची वाटते. तन्वीवर जी बंधन आहेत ती इतरांना पहायला मिळतात. या मालिकेला प्रेक्षकांच्या पसंतीची पावती लाभलेली आहे. अभिनेता सुबोध भावे सोबत शिवानीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडलेली आहे. ती साकारत असलेल्या दोन्ही व्यक्तिरेखा सकारात्मक असल्याने, त्या भूमिका साकारताना फार मोठे आव्हान असल्याचे तिचे म्हणणे आहे. याउलट एक व्यक्तिरेखा सकारात्मक व दुसरी नकारात्मक व्यक्तिरेखा साकारताना सोपे असल्याचे तिचे म्हणणे आहे. दोन भूमिका एका मालिकेत करत असणे ही तारेवरची कसरत असते.
कारण दररोज तुम्ही प्रेक्षकांसमोर जात असता, त्यावेळी दोन्ही भूमिकेचे वेगळेपण जपणे ही खरोखरच तारेवरची कसरत असते, असे ती म्हणाली. त्या भूमिका प्रेक्षकांना आवडणे हेदेखील महत्त्वाचे असते. या कसोटीत ती पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसते, कारण प्रेक्षकांना तिच्या दोन्ही भूमिका आवडल्या आहेत. या मालिकेचे कथानक उत्कठावर्धक आहे, त्यामुळे दररोज मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या व कलाकारांच्या मनामध्ये उत्कंठा वाढत जाते. शिवानी सोनारला तिच्या मालिकेसाठी व भविष्यातील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!