मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इशारा
पुणे : “मी एकच सांगतो की एकवेळा आमच्यावर टीका केली तर आम्ही सहन करू. मात्र, आमच्या बहिणींच्या हिताच्या आडवं कोणी आलं तर मग गाठ माझ्याशी आहे, हे लक्षात ठेवा”, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना दिला.
महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली आहे. या योजनेची मोठी चर्चा आहे. मात्र, या योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जाणार आहेत. आता जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचा निधी महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच आज पुण्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देत इशारा दिला.
“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत मी मंत्रिमंडळात सांगितलं होतं की, रक्षाबंधनाच्या अगोदर या योजनेचे पैसे पोहोचले पाहिजेत. मात्र, हे पैसे पोहोचले की नाही ते पाहण्यासाठी काही लोक म्हणाले की, आधी एक रुपया टाकूयात. त्यांना मी म्हटलं जर एक रुपया टाकला तर विरोधक म्हणतील ३ हजार देणार म्हणाले आणि १ रुपया टाकला. त्यानंतर आम्ही ठरवलं की सर्व तीनच्या तीन हजार रुपये टाकायचे आणि योजना सुरु करायची. तेव्हापासून मी ज्या ठिकाणी कार्यक्रमाला जात आहे, त्या ठिकाणी माझ्या लाडक्या बहीणी मला पैसे आल्याचे सांगतात, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.