Thursday, March 20, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमंदी नव्हे, ही तर संधी

मंदी नव्हे, ही तर संधी

सध्या शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पहायला मिळत आहे. यामुळे गुंतवणूकदार भयभीत झाल्याचे दिसून येत आहे. मात्र या घसरणीला देशांतर्गत नाही तर बाह्यघटक मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहेत. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठणार असल्याने येत्या काळात कंपन्यांची भरभराट निश्चित आहे. त्यामुळे सद्यस्थितीत गुंतवणूकदारांनी कमी कमतीत समभाग घेण्याची संधी साधायला हवी.

वेध – चंद्रशेखर चितळे
अर्थतज्ज्ञ

शेअर बाजारात सध्या घसरण पाहायला मिळत आहे. परवाच्या सोमवारी शेअर बाजार २२२२२२ अंकांनी घसरला. शेअर बाजार याआधी लोकसभा निवडणुकांच्या निकालादिवशी म्हणजे ४ जूनला ४३८९ अंकांनी घसरला होता. त्यानंतरची निर्देशांकाची ही या वर्षातली सर्वात मोठी घसरण ठरली. मंगळवारीही निर्देशांक १६६ अंकांनी तर निफ्टी ६३ अंकांनी घसरला. या सततच्या घसरणीमुळे शेअर बाजारातले गुंतवणूकदार चिंताक्रांत झाले असले तरी प्रत्यक्षात घाबरण्यासारखे फारसे काही नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे बाह्य घटकांमुळे शेअर बाजारात निर्माण झालेली अस्थिरता.

जागतिक स्तरावर घडणाऱ्या घडामोडी भारतीय शेअर बाजाराच्या घसरणीला कारणीभूत ठरल्या आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेशी किंवा देशांतर्गत घडामोडींशी याचा संबंध नसल्यामुळे आता आपले काय होणार, असा विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मंगळवारी निफ्टीच्या ५० कंपन्यांच्या समभागांपैकी २१ समभागांनी तेजी तर २९ समभागांनी घसरण अनुभवली. यावेळी रिॲल्टी क्षेत्रतल्या शेअर्समध्ये तेजी असल्याचे पाहायला मिळाले. मेटल तसेच आयटी क्षेत्रानेही थोडीफार तेजी अनुभवली. मात्र सरकारी बँकांच्या निर्देशांकात १.२६ टक्क्यांची घसरण झाली. वाहन तसेच ग्राहकोपयोग वस्तूंचे समभागही घसरले. मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, हदाल्को, टायटन तसेच टाटा स्टीलच्या समभागांमध्ये चांगलीच घसरण झाली. शेअर बाजारात घसरण होण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांवर नजर टाकल्यास हे सर्व बाह्य घटक असल्याचे आपल्या लक्षात येईल. अमेरिकेत आर्थिक मंदी येण्याची शक्यता असल्याने भारतीय शेअर बाजारावर परिणाम पाहायला मिळाला. अमेरिकी बाजारही मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. सप्टेंबर २०२२ नंतरची अमेरिकन शेअर बाजारातली ही सर्वात मोठी घसरण मानली जाते. ॲपल, मेटा, एनविडियाच्या समभागांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम अमेरिकन शेअर बाजारावर पाहायला मिळाला. जुलै महिन्यात अमेरिकेत उपलब्ध झालेल्या नव्या नोकऱ्यांची संख्या खूपच कमी होती. गेल्या वर्षीच्या मासिक सरासरी दोन लाख १५,००० नोकऱ्यांच्या तुलनेत या कालावधीत केवळ १,१४,००० नोकऱ्या उपलब्ध झाल्या. अमेरिकेतला बेरोजगारीचा दर ४.३ टक्क्यांवर पोहोचला असून ऑक्टोबर २०२१ नंतरचा बेरोजगारीचा हा उच्चांकी दर आहे. त्यामुळे मागील आठवड्यातल्या शुक्रवारी अमेरिकन शेअर बाजार तोंडघशी पडले.

जागतिक स्तरावर फक्त अमेरिकन शेअर बाजारातच मंदी आहे असे नाही तर जपानचा निक्केई २२५ ही संघर्ष करतो आहे. बँक ऑफ जपानने बुधवारी आपला व्याजदर वाढवल्याने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत जपानी येनचे मूल्य अधिक वाढले. बँक ऑफ जपानने व्याजदर ० टक्के आणि ०.१ टक्क्यांवरून ०.२५ टक्क्यांवर नेला. हाँगकाँग, शांघाय आदी शेअर बाजारांमध्येही घसरण पाहायला मिळते. जगभरात पसरलेले युद्धाचे ढगही शेअर बाजारांच्या घसरणीस कारणीभूत ठरत आहेत. इराण-इस्रायलमध्ये परिस्थिती चिघळल्याने मध्यपूर्वेत तणाव वाढत आहे. इराण, हमास आणि हिजबुल्लाहने इस्रायलवर सूड उगवण्याची शपथ घेतली. यामुळे या भागात हल्ले, प्रतिहल्ले वाढीस लागणार आहेत. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ होईल.

पहिल्या तिमाहीचे कंपन्यांचे कमकुवत निकालही शेअर बाजाराच्या घसरणीस कारणीभूत ठरले. मोतीलाल ओसवाल यांच्या मते, कंपन्यांमध्ये चांगले करार न होणे, उष्णतेची लाट आणि मंदावलेली मागणी यामुळे जूनमध्ये संपलेल्या तिमाहीचे निकाल कमकुवत आहेत. या कालावधीत आतापर्यंतचे निकाल वार्षिक आधारावर सुमारे १० टक्क्यांनी कमी आहेत. निफ्टी ५० मध्ये समाविष्ट असणाऱ्या ३० कंपन्यांनी आतापर्यंत आपले निकाल जाहीर केले असून त्यांच्या कमाईमध्ये सरासरी वार्षिक ०.७ टक्के वाढ झाली आहे. मात्र नफ्यामध्ये ९.४ टक्क्यांची तिमाही घट झाली. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता गुंतवणूकदारांनी बचावात्मक पवित्रा घेणे आवश्यक आहे. पुढील काळात बाजारात स्थानिक तसेच जागतिक कारणांमुळे चढ-उतार पाहायला मिळू शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. दुसरीकडे वॉरेन बफे यांच्या वर्कशायर हाथवे या कंपनीने ॲपलमधली आपली ५० टक्के भागीदारी विकून टाकली असून बफे आता रोख रक्कम वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. यासोबत अन्य मोठे गुंतवणूकदारही आपले समभाग मोठ्या प्रमाणावर विकत आहेत. शेअर बाजारात सुरू असणाऱ्या या विक्रीमुळे गुंतवणूकदारांची संपत्ती १६ लाख कोटी रुपयांनी घटली आहे.

सध्याच्या शेअर बाजारातल्या अस्थिर वातावरणात नेमके करायचे तरी काय, असा प्रश्न गुंतवणूकदारांना पडला आहे. त्यातही शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास उत्सुक असणारे नवे गुंतवणूकदार प्रचंड गोंधळून गेले आहेत. मात्र अशा परिस्थितीने घाबरून जाण्याऐवजी शेअर बाजारात दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करायला हरकत नाही. मुळात शेअर बाजारात झालेली घसरण ही समभाग खरेदी करण्यासाठी पर्वणी असते, असे म्हणायला हरकत नाही. कारण या काळात कंपन्यांच्या शेअर्सच्या किमती कमी झालेल्या असतात. अशा परिस्थितीत काही चांगल्या कंपन्यांचे शेअर्स विकत घेता येतात आणि दीर्घकालीन गुंतवणुकीतून चांगला नफाही कमावता येऊ शकतो. मात्र गुंतवणूकदारांनी सगळे समभाग आताच एकत्र न घेता टप्प्याटप्याने घेतले तर फायदा होऊ शकतो. उदाहरणार्थ तुम्हाला दोनशे समभाग विकत घ्यायचे असतील तर सर्व एकत्र न घेता ४०-४० चे पाच किंवा ५०-५० चे चार असे टप्प्याटप्प्याने शेअर खरेदी करणे योग्य ठरेल. कारण शेअर बाजार खाली गेला, तर तुम्हाला कमी किमतीत समभाग मिळू शकतील आणि वर गेला तर फारसे नुकसानही होणार नाही. त्यामुळे शेअर बाजारातल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना घाबरण्याची अजिबात आवश्यकता नाही. या वळणावर शेअर बाजारातून बाहेर पडण्याची अजिबात गरज नाही. कारण परदेशात कोणत्याही घडामोडी घडल्या तरी आपली अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर्सचा आकडा गाठणार यात दुमत असण्याचे कारण नाही. महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या कंपन्यांची भरभराट झाल्याशिवाय भारताला पाच ट्रिलियनचा आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे कंपन्यांची भरभराट निश्चित आहे. त्यामुळे सध्याचा काळ ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी आहे, असे म्हणता येईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -