Friday, May 9, 2025

ब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमीनाशिक

नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट!

नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला गालबोट!

दोन गटात दंगल, अश्रूधुराचा वापर करत पोलिसांनी मिळवले परिस्थितीवर नियंत्रण


नाशिक : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनांनी आज नाशिक बंदची हाक दिली होती. नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून पुकारण्यात आलेल्या या बंदला दुपारी गालबोट लागले. नाशकातील मेम रोड परिसर आणि पिंपळ चौक परिसरात दगडफेकीची घटना घडली. दोन जमाव एकमेकांसमोर आल्याने ही दगडफेक आणि वाहनांची तोडफोड झाली. दुपारी साडेतीनच्या सुमारास दोन गट एकमेकांसमोर आल्यामुळे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु तातडीने पोलिसांनी यावर नियंत्रण मिळवत तणावाची परिस्थिती नियंत्रणात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.


याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी नाशिक मध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंदचे आयोजन करण्यात आले होते. हा बंद दुपारपर्यंत अतिशय शांततेत सुरू होता. परंतु दुपारच्या सुमारास शहरातील भद्रकाली परिसरात असलेल्या दूध बाजार परिसरामध्ये सकल हिंदू समाजाची रॅली येतात या ठिकाणी दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत चुकीच्या घोषणा देत असल्याचे सांगून विरोध केला. त्यातून शाब्दिक बचावाची झाली आणि हा विरोध वाढत गेला आणि दोन्ही गटांमध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.


यावेळी दुसऱ्या गटाकडून मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीमध्ये काही घरांचे आणि उपलब्ध असलेल्या माहितीनुसार चार ते पाच वाहनांचे नुकसान झाले असून या परिसरामध्ये असलेल्या दुकानांचे देखील नुकसान झाले आहे.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि सर्वप्रथम पोलीस अधिकाऱ्यांनी या दोन्हीही गटाला दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु हे दोन्हीही गट दूर होत नसल्यामुळे अश्रूधुराचा वापर करावा लागला. त्यानंतर हे दोन गट वेगवेगळे झाले आणि पोलिसांनी मग या ठिकाणी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.


परिस्थिती नियंत्रणात आणली असून या ठिकाणी पोलीस दल तैनात केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

Comments
Add Comment