Monday, March 24, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखकरदात्यांनो फसव्या ईमेल्सपासून सावधान

करदात्यांनो फसव्या ईमेल्सपासून सावधान

गुगल, याहू, वगैरे कंपन्या अशा प्रकारच्या मेल्स थेट ‘स्पॅम’मध्ये टाकतात. तरीही अशा प्रकारची एखादा मेल आपल्या इनबॉक्समध्ये आलाच तर तिची ‘स्पॅम’ म्हणून नोंद करता येते आणि भविष्यात या ठिकाणाहून येणाऱ्या मेल्स ‘स्पॅम’ फोल्डरमध्ये जाऊन पडतात. या फोल्डरमधल्या मेल्स साधारणत: ३० दिवसांनी आपोआप डिलीट केल्या जातात. संबंधित खात्याकडे संशयास्पद ईमेल्सची तक्रार करावी. त्यामुळे हे खाते सर्वांना सावध करेल. हे सर्व आपल्यापुरते न ठेवता इतरांनाही सावध करा, त्यांनाही एक जागरूक ग्राहक बनवा.

ग्राहक पंचायत – अभय दातार

३१ मार्च, २०२४ उलटल्यानंतर करदात्यांची लगबग चालू झाली ती आयकर विवरणपत्रासाठी लागणारी वेगवेगळी माहिती गोळा करण्याची आणि ३१ जुलै, २०२४ या अंतिम तारखेआधी विवरणपत्र दाखल करण्याची. आता लगबग चालू आहे ती आयकर खात्याची आणि त्यांच्या प्रणालीची. काही करदात्यांना ‘आपल्याला आणखी कर भरावा लागणार आहे का?’, ‘आयकर खाते काही त्रुटी काढून कारणे दाखवायला सांगेल का?’अशी काहीशी चिंता असते. तर काही करदाते आपला कर परतावा कधी आपल्या खात्यात जमा होणार त्याची वाट पाहत असतात. करदात्यांच्या याच मनस्थितीचा फायदा सायबर चाचे घेतात आणि काहीना काही शक्कल लढवून अगदी खऱ्या वाटणाऱ्या ईमेल्स त्यांना पाठवतात.

हा मेल वाचा-एका महिलेला मेल आला की, काही तांत्रिक अडचणींमुळे तिने करापोटी भरलेली रक्कम आयकर खात्याकडे जमा होऊ शकली नाही, तरी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून परत एकदा कर भरावा. ती महिला दक्ष असल्याने तिने तो मेल कोणाकडून आलाय ते तपासून पाहिले आणि तो मेल फसवा असल्याचे तिच्या लक्षात आले. मग तिने ताबडतोब तो ईमेल आयडी ब्लॉक केला. अन्य एका मेलमध्ये म्हटले होते की, ‘तुम्हाला ३१ हजार रुपयांच्या आयकर परतावा मंजूर करण्यात आला आहे. पण तुमच्या बँकेचा तपशील आमच्याकडे मिळत नसल्याने आम्ही तो तुम्हाला देऊ शकत नाही.’ या महाशयांनी आपली सर्व माहिती समोरच्या व्यक्तीला उघड केली आणि बँकेतली शिल्लक गमावून बसले. खरे तर आपण भरलेला कर किंवा मिळणारा परतावा आयकर खात्याच्या संकेतस्थळावर दिसतो. हे आपल्याला जमत नसेल तर ज्या कर सल्लागारामार्फत आपण आपले विवरणपत्र दाखल करतो, त्याला विचारावे. म्हणजे फसगत होणार नाही.

आयकर खात्याकडून आल्यासारख्या वाटणाऱ्या फसव्या ईमेल्सची संख्या खूपच जास्त आहे. कारण अगदी साधे आहे की करदाते अशा मेल्सना घाबरून काहीतरी भलतेच करून बसतात. हे केवळ आयकराबाबतच घडते असे नाही, तर जीएसटी, कस्टम्स, यांच्या नावानेही फसव्या ईमेल्स येतात. कर भरायची शेवटची तारीख जसजशी जवळ येऊ लागते, तसतसे अशा ईमेल्सचे प्रमाण वाढते. जोडीला पोलीस, सरकारी खाती, बड्या कंपन्या, यांच्याकडून आल्यासारख्या वाटणाऱ्या ईमेल्सची संख्याही मोठी आहे. अत्याधुनिक संगणकीय तंत्रज्ञानामुळे या सर्वांचे जे एक विशिष्ट चिन्ह अथवा प्रतीक असते ते जसेच्या तसे वापरता येऊ शकते. शिवाय अशा ईमेल्सच्या शेवटी एखादे नाव आणि त्याचा हुद्दा लिहिला असतो; तोही अशा पद्धतीने की वाचणाऱ्याला वाटावे की, बापरे एवढ्या मोठ्या पदावरील माणसाने मेल पाठवली आहे, म्हणजे खरी असणार. सायबर चाचे फसव्या ईमेल्सचा उपयोग एखाद्याचा पासवर्ड, क्रेडिट कार्डाचा तपशील, बँक खात्याचा तपशील, अशी गोपनीय माहिती अलगद काढून घेण्यासाठी अतिशय प्रभावीपणे करतात. तंत्रज्ञान कोळून प्यायलेले हे चाचे अगदी हुबेहूब वाटणारे संकेतस्थळही बनवतात. हे मूळ संकेतस्थळाच्या url शी साधर्म्य असणारे पण एखादा सूक्ष्म बदल केलेले, तसेच https:// या सुरक्षित साधनाचा वापर केलेले नवीन संकेतस्थळ असते. url म्हणजे कोणत्याही संकेतस्थळाचा पत्ता आणि https:// म्हणजे सर्वांना माहीत आहेच की, सुरक्षित संकेतस्थळ. समजा मूळ संकेतस्थळ https://abcbank-ltd असे असेल, तर यात थोडासा बदल करून https://Abcbank.ltd असे संकेतस्थळ बनवले जाते किंवा मूळ a मध्ये A असा बदल केला जातो. आपण ज्या फसव्या ईमेलला उत्तर द्यायच्या मनस्थितीत असतो, ती ईमेल आपल्याला या बनावट संकेतस्थळावर घेऊन जाते आणि साहजिकच आपल्याला वाटते की, यावर विश्वास ठेवायला हरकत नाही.

मात्र जशी छपाईमध्ये चूक होते, एखादी बातमी चुकीच्या पद्धतीने छापली जाते, तशीच चूक हे चाचेही करतात. ईमेल जीएसटी खात्याकडून आलेला असतो, पण मेसेज आयकरासंबंधी असतो. ईमेल आयडी खोटे दिले जातात. इंग्रजी भाषाही नीट वापरलेली नसते. अर्थात जो फसतो, तो इतके सर्व काही पाहत नाही. त्या मेलद्वारे घातलेली भीती, मग ती अमुक एका तारखेआधी इतका कर भरा, अन्यथा दंड भरावा लागेल, अशी असो की, इतक्या दिवसांत रक्कम न भरल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी असो. वाचणारा घाबरायला हवा. आणखी दोन दिवसांनी अशा मेल्सवर आपण काही कृती करायला गेलो, तर ती संकेतस्थळे गायब झालेली दिसतात, म्हणजेच चाचे निदान काहीजणांना फसवण्यात तरी यशस्वी झालेले असतात. मग आता यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही लोभाला बळी पडून अथवा कोणत्याही धमकीला घाबरून कोणतीही कृती करायची नाही. तर थोडे शांत राहायचे.Ø मेल, मेसेज कुठून आलाय ते तपासा. संगणक असो, की मोबाईल, त्यात चांगल्या कंपनीचे अँटीव्हायरस सॉफ्टवेअर टाका. हे सॉफ्टवेअर अशा प्रकारच्या ईमेल्स अथवा मेसेज आल्यावर आपल्याला सावध करते. अशा प्रकारच्या ईमेल्स व मेसेज ब्लॉक करता येतात.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -