नवी दिल्ली: निवडणूक आयोग आज चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा करणार आहे. निवडणूक आयोग हरयाणा, जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीची घोषणा करणार आहे. याशिवाय निवडणूक आयोग झारखंड आणि महाराष्ट्रातही निवडणुकीच्या तारखांची घोषणा करू शकते.
निवडणूक आयोग आज दुपारी तीन वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहे. यात जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली जाईल. याशिवाय आज हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखांचीही घोषणा केली जाऊ शकते. जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदा विधानसभा निवडणुका होत आहेत. आयोगाने गेल्याच आठवड्यात जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा पूर्ण केला होता.
दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद
निवडणक आयोगाने दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. मात्र यावेळी कोणत्या राज्यांतील निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर करणार याबाबत माहिती देण्यात आलेली नाही. हरयाणा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेचा कार्यकाळ तीन नोव्हेंबर आणि २६ नोव्हेंबरला समाप्त होत आहे. तसेच ३० सप्टेंबरआधी जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेण्याची निवडणूक आयोगाची योजना आहे. ही मर्यादा सुप्रीम कोर्टाने ठरवली आहे.
आयोगाने निवडणूक संबंधीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी नुकताच जम्मू-काश्मीर आणि हरयाणाचा दौरा केला होता मात्र त्यांनी महाराष्ट्राचा दौरा अद्याप केलेला नाही.