कटक : नोकरदार महिलांना आता मासिक पाळीच्या काळात महिन्यातून एक दिवस रजा मिळणार आहे. ओडिशामध्ये उपमुख्यमंत्री प्रवती परिदा यांनी आज, गुरुवारी स्वातंत्र्यदिनाला ही घोषणा केली. विशेष म्हणजे सरकारी आणि खासगी दोन्ही नोकरीतील महिलांना ही रजा मिळणार आहे.
राज्याच्या कटक येथे आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री म्हणाल्या की, महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी मिळत नाही. आता एक दिवसाची सुट्टी देण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत महिला मासिक पाळीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या दिवशी सुट्टी घेऊ शकतील. ही रजा त्यांच्यासाठी ऐच्छिक असेल म्हणजेच त्यांना ती हवी असेल तरच मिळेल. हा निर्णय सरकारी कर्मचाऱ्यांबरोबरच खासगी कंपन्यांनाही लागू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
एका संशोधनानुसार, ४० टक्के मुली पीरियड्स आल्यामुळे शाळेत जाऊ शकत नाहीत. शाळांमध्ये गोपनीयतेचा अभाव, शिक्षणाचा अभाव आणि जागरूकता यासारख्या गोष्टींमुळे त्यांना घरीच राहणे चांगले वाटते. सुमारे ६५ टक्के मुलींचे म्हणणे आहे की, पीरियड्समुळे त्यांच्या शालेय शिक्षणावर परिणाम होतो. त्यांना शाळा आणि वर्ग चुकवावे लागतात. अनेकवेळा ते लाजेमुळे जात नाहीत तर कधी त्यांची तब्येतही साथ देत नाही.
दरम्यान, ओडिशा सरकारच्या निर्णयाचे सामाजिक कार्यकर्त्यांनीही कौतुक केले आहे. ओडिशाच्या आधी बिहार आणि केरळमध्ये रजेची तरतूद आहे. बिहारमध्ये दोन दिवस आणि केरळमध्ये तीन दिवसांची सुट्टी देण्याचा नियम आहे.