मुंबई : मुंबईतील मुलुंड येथील ऐरोली टोलनाक्यावर पोलिसांनी २ कोटी रुपये किमतीचा मेफेड्रोन (एमडी) साठा जप्त केला आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही अनुचित घटनेला आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरभरात नाकाबंदी लावली. याच मोहिमेत, नवघर पोलिसांनी मुंबईत प्रवेश करणारी एक कार अडवली. तपासणीदरम्यान, वाहनात संशयास्पद पिवळसर पावडर आढळली. सदर पावडर अंमली पदार्थ चाचणी किटद्वारे एमडी असल्याचे निष्पन्न झाले.
कारचालक मोहम्मद कलीम सलीम चौधरी (२७) याला तात्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडून २ किलो २९ ग्रॅम एमडी जप्त केले असून, या साठ्याची किंमत सुमारे दोन कोटी रुपये आहे.
अमली पदार्थांची तस्करी ही गंभीर समस्या असून, विशेषत: युवा पिढीला या जाळ्यातून वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांनी अशा कारवायांद्वारे समाजातील अवैध धंद्यांना आळा घालण्याचे काम सुरू ठेवले आहे. नागरिकांनी देखील जागरूक राहून अशा संशयास्पद घटनांची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, जेणेकरून समाजाला या घातक पदार्थांपासून सुरक्षित ठेवता येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.