Sunday, March 23, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसगुण निर्गुण एकू गोविंदू रे

सगुण निर्गुण एकू गोविंदू रे

जीवन संगीत – सद्गुरू वामनराव पै

जीवनविद्येच्या सिद्धांतानुसार जीवनसंगीताचे सात स्वर म्हणजे, जग, कुटुंब, शरीर, इंद्रिये, बहिर्मन, अंतर्मन आणि परमेश्वर. या सात स्वरांमुळेच जीवन हे संगीत व्हायला पाहिजे. संगीत हे सगळ्यांना आवडते. संगीत आवडत नाही असा माणूस क्वचितच. प्राणी, वनस्पती सर्वांना संगीत आवडते. सांगायचा मुद्दा संगीत सर्वांना आवडते तसे जीवन हे संगीत झाले पाहिजे. जीवन हे संगीत होते तेव्हा ते सर्वांना आवडते. ज्याचे जीवन हे संगीत होते तो सर्वांना आवडतो म्हणून “जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला” असे म्हटलेले आहे. हा फार महत्त्वाचा सिद्धांत आहे. परमेश्वर हा विषय सर्वांशी संबंधित आहे. मी या आधीही सांगितलेले होते की, परमेश्वर हा आपल्या जीवनाचे केंद्र आहे. बाकीच्या सर्व गोष्टी त्याला जोडूनच आहेत. सहाही स्वर त्याच्या परिघात येतात. दुसऱ्या बाजूने विचार केला तर व्यक्ती, कुटुंब, समाज, राष्ट्र, विश्व या सर्वांचे केंद्र परमेश्वर आहे. तिसरी गोष्ट म्हणजे सुख-समाधान, शांती, आनंद, यश, समृद्धी याही गोष्टी मिळणे किंवा न मिळणे हे देखील परमेश्वराच्या संदर्भातच आहे. आज लोकांनी परमेश्वराची कल्पना केलेली आहे. मात्र जो वस्तुस्थितीत आहे, वास्तवतेला धरून आहे त्या परमेश्वराबद्दल मी बोलतो. बाकीचे लोक सांगतात तेव्हा ते काल्पनिक परमेश्वर सांगतात. कोण म्हणतो आकाशाच्या पलीकडे परमेश्वर आहे तर कोण म्हणतो केवळ मूर्तीत परमेश्वर आहे.

जीवनविद्या सांगते तो परमेश्वर काय? तो परमेश्वर निर्गुण व सगुण आहे. हा जीवनविद्येचा परमेश्वर आहे तो, अर्थात तो सर्वांचा परमेश्वर आहे पण मी केवळ संदर्भासाठी सांगतो आहे म्हणून जीवनविद्येचा परमेश्वर म्हणतो. तर हा जीवनविद्येचा परमेश्वर एका बाजूने निर्गुण आहे व दुसऱ्या बाजूने सगुण आहे. निर्गुण कशाला म्हणायचे? जो परमेश्वर अदृश्य, अव्यक्त, निर्गुण, निराकार, सर्वव्यापी, ज्ञानघन, आनंदघन आहे, तो हा परमेश्वर म्हणजे निर्गुण परमेश्वर.

याउलट अनंतरूपे, अनंतवेषे प्रकट आहे, व्यक्त रूपाने आहे तो परमेश्वर म्हणजे सगुण परमेश्वर. एका बाजूने निर्गुण परमेश्वर व दुसऱ्या बाजूने सगुण परमेश्वर. दोन्ही मिळून परमेश्वर एकच. “तुज सगुण म्हणू की निर्गुण रे, सगुण निर्गुण एकू गोविंदू रे”. सगुण निर्गुण एकू गोविंदू म्हणजे एकच परमेश्वर आहे. हा सगुण निर्गुण परमेश्वर नीट ध्यानांत ठेवला तर माझे विवेचन तुमच्या ध्यानांत येईल की, परमेश्वर हे मानवी जीवनाच्या केंद्रस्थानी आहे. या परमेश्वराबद्दलचे अज्ञान हे मानवी समाजाच्या सर्व दुःखाचे मूळ आहे. जगांत दुःख का? तर मी सांगेन, परमेश्वराबद्दलचे अज्ञान! दहशदवाद का घडतो कारण खरा परमेश्वर समजलेला नाही. लोक एकमेकांशी भांडतात, खून करतात कारण खरा परमेश्वर समजलेला नाही. लोक तंटेबखेडे करतात कारण त्यांना खरा परमेश्वर समजलेला नाही. खरा परमेश्वर समजेल तेव्हा सर्व मानवजात या अनिष्ट गोष्टीतून मुक्त होईल.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -