‘काना वचनाचिये भेटी’ या कल्पनेत सर्वसाधारणपणे दोन माणसांच्या संदर्भात भेटणे, गाठ पडणे हे क्रियापद वापरले जाते. ज्ञानदेव हे क्रियापद शिष्याचे कान व गुरूचे वचन या संदर्भात वापरतात. एका अर्थी या दोन्ही गोष्टींना गोचर, सजीव करतात. पुन्हा यात ‘कान आणि वचन’ या शब्दांतून ‘न’चा नाद सुंदर साधलेला दिसतो.
ज्ञानेश्वरी – प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे
आदर्श अवस्था कोणती?’ तर साऱ्या विश्वाशी एकरूप होऊन जाणे, ब्रह्मस्वरूप होणे. या अवस्थेतील साधकाचे वर्णन करताना अठराव्या अध्यायात अप्रतिम ओवी येते. त्यात श्रीकृष्ण म्हणतात, ‘अर्जुना, कोणी एक साधक – जो तीव्र अधिकारी आहे तो – श्रीगुरूंच्या वचनाची व त्याच्या कानाची गाठ पडण्याबरोबर ब्रह्मस्वरूप होतो.’
ही मूळ ओवी अशी –
‘काना वचनाचिये भेटी। सरिसाचि पैं किरीटी।
वस्तु होऊनि उठी। कवणिएकु जो।।’ ओवी क्र. ९९१
‘वस्तू’ या शब्दाचा इथे अर्थ आहे ‘ब्रह्मस्वरूप’.
व्यवहारात आपण पाहतो की, तीन प्रकारचे विद्यार्थी असतात. एक, गुरूवचन ऐकताक्षणी त्याचे आज्ञापालन करणारा. दुसरा, गुरूआज्ञा ऐकल्यावर काही काळाने त्यानुसार आचरण करणारा. तिसरा, गुरूवचन पालन न करणारा. इथे माउलींनी वर्णन केलेला साधक त्यांच्याच शब्दांत ‘तीव्र अधिकारी’ आहे. म्हणून तो वचन ऐकताक्षणी ब्रह्मस्वरूप होतो.
आता या ओवीतील काव्यात्मता कशात आहे? तर, ‘काना वचनाचिये भेटी’ या कल्पनेत आहे. सर्वसाधारणपणे दोन माणसांच्या संदर्भात भेटणे, गाठ पडणे हे क्रियापद वापरले जाते. ज्ञानदेव हे क्रियापद शिष्याचे कान व गुरूचे वचन या संदर्भात वापरतात. एका अर्थी या दोन्ही गोष्टींना गोचर, सजीव करतात. पुन्हा यात ‘कान आणि वचन’ या शब्दांतून ‘न’चा नाद सुंदर साधलेला दिसतो. तसेच पूर्ण ओवी वाचली की, त्यात एक गती जाणवते. या साधकाने गुरूवचन ऐकले रे ऐकले की तो त्वरित ब्रह्मस्वरूप होतो. हा भाव, हा अर्थ या ओवीच्या शब्दांतून, गतीतून चांगल्या प्रकारे प्रकट होतो.
या आधीच्या ओव्यांतूनही सुंदर दृष्टान्तांच्या आधारे या साधकाची योग्यता चित्रित केली आहे. सूर्य उगवताच जसा अंधाराचाच प्रकाश होतो किंवा दिव्याच्या ज्योतीस कापूर लागताच तो दिवा होतो किंवा मिठाचा खडा पाण्यात मिळवताच जसा जलरूप होऊन राहतो किंवा झोपलेल्या मनुष्यास जागे केल्यावर स्वप्नासह झोप नाहीशी होऊन तो आपल्या मूळ स्वरूपात प्राप्त होतो, तशी दैवयोगाने ज्या कोणाची वृत्ती गुरूवाक्य श्रवणाबरोबर भेदाचा नाश करून स्वस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते.
सूर्य, दिवा, पाणी, जागृती असे हे दृष्टान्त आहेत. यातील सूर्य हा तेजाचे प्रतीक आहे. ज्यातून गुरूवाक्य श्रवणाचे तेज, सामर्थ्य सूचित होते. पाणी हे तत्त्व गुरूवाक्य वचनाची व्यापकता दाखवते. जागृती हा दाखला शिष्याची जागृत अवस्था दाखवतो. या दाखल्यांतून गुरूवचनाची शक्ती उमगते आणि शिष्याची निष्ठा जाणवते. अंधाराचाच प्रकाश होणे, दिव्याच्या ज्योतीचा दिवा होणे, मीठ पाणीमय होणे, झोपलेल्या माणसास जाग येणे हे परिवर्तनाचे चित्र आहे. ते अधिकारी साधकाचे सूचन करते. त्याचा अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास, खरंतर यात्रा दाखवते.
ज्ञानदेवांची प्रतिभा तत्त्वविचार असा सुंदर, सोप्या प्रतिमांतून साकारते. त्यामुळे ऐकणाऱ्या श्रोत्यांनाही त्या तत्त्वविचाराची गोडी लागते, आचरणाची ओढ वाटते.
ही आहे ज्ञानदेवांची समर्थ उक्ती,
उमलावी श्रोतृमनात भक्ती…