संवैधानिक राजकारणात देशाचे महत्त्व नेहमीच वरिष्ठ स्थानी असणे अभिप्रेत आहे. पण पक्षीय राजकारणाच्या प्रभावामुळे आता देशाचा, झेंड्याचा वापरही राजकारणासाठी होऊ लागला. याबरोबरच अलीकडच्या काही घटना खरोखरंच देशाची स्थिती दाखवली जाते तशी आहे का, असा प्रश्न उपस्थित करतात. लोकशाहीचे उत्सव आता मरगळलेल्या अवस्थेत आहे. त्याला नको एवढे राजकीय स्वरूप प्राप्त झाले. बडेजाव, दिखाऊपणा खूप वाढला आहे. सर्वसामान्यांना निश्चितच हे अपेक्षित नाही कारण स्वातंत्र्य म्हणजे साधेपणासुद्धा आहे. केवळ स्वरूप उत्सवी असून उपयोग नाही, तर तो मनापासून साजरा करण्याजोगी परिस्थिती निर्माण करणे गरजेचे आहे.
शिवाजी कराळे – विधिज्ञ
देशामध्ये सगळ्या समस्या, विषयांवर मोकळेपणाने चर्चा व्हायला हवी. कारण वादविवाद आणि संवादातूनही अनेक प्रश्नांची उकल होते. सामाजिक विषयांचे खच्चीकरण करून आपण संविधान राबवू शकत नाही. त्यामुळेच १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला साजऱ्या होणाऱ्या लोकशाहीच्या उत्सवांना राजकीय स्वरूप प्राप्त होऊ देता कामा नये. देशाच्या स्वातंत्र्यदिनी आबालवृद्ध तिरंग्याला मानवंदना करतात. अनेकांच्या बलिदानातून मिळवलेल्या स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अभिमान आहे. मात्र याच तिरंग्याचा वापर पक्षीय राजकारणासाठी होताना दिसतो तेव्हा मनात शंका उत्पन्न झाल्याखेरीज राहात नाही. संवैधानिक राजकारणात देशाचे महत्त्व नेहमीच वरिष्ठ स्थानी असणे अभिप्रेत आहे. पण पक्षीय राजकारणाच्या प्रभावामुळे आता देशाचा, झेंड्याचा वापरही राजकारणासाठी होऊ लागला. याबरोबरच अलीकडच्या काही घटना खरोखरंच देशाची स्थिती दाखवली जाते तशी आहे का, असा प्रश्न उपस्थित करतात. लोकशाहीचे उत्सव आता मरगळलेल्या अवस्थेत आहे. त्याला नको एवढे राजकीय स्वरूप प्राप्त झाले. बडेजाव, दिखाऊपणा खूप वाढला आहे. सर्वसामान्यांना निश्चितच हे अपेक्षित नाही कारण स्वातंत्र्य म्हणजे साधेपणासुद्धा आहे.
नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत. यासाठी वाहतूक पोलिसांची आवश्यकता असते, असा समज प्रमाणात दृढ आहे; परंतु एक जबाबदार नागरिक म्हणून वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे कर्तव्य ठरते. ट्रॅफिक सिग्लनच्या ठिकाणी वाहतूक पोलीस असो वा नसो, नियमांचे पालन केलेच पाहिजे. ही जाणीव प्रत्येकाच्या मनात दृढ झाली तर काय होईल, याची कल्पना करा. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस, अधिकारी, यंत्रणा यांची आवश्यकताच राहणार नाही. अगदी मोजके अधिकारी, कर्मचारी तसेच यंत्रणेवर सर्व काही भागून जाईल. सरकारच्या विविध यंत्रणांवरील खर्च बराच मोठा असतो आणि दिवसेंदिवस या खर्चात वाढ होत आहे. त्याचा सरकारी तिजोरीवर ताण येत आहे. शेवटी हा पैसा कर रूपाने जनतेच्या खिशातूनच जात असतो. त्यामुळे सरकारी यंत्रणांवरील खर्च कमी झाला तर नागरिकांवरील कराचा बोजाही कमी होऊ शकतो, हे लक्षात घ्यायला हवे. स्वातंत्र्यलढ्यात कायदेभंगाची चळवळ जोमाने उभी राहिली. त्या जुलमी राजवटीत ते अस्त्र प्रभावी ठरले; परंतु एकदा देश स्वतंत्र झाला, लोकशाही पणालीचा स्वीकार केला आणि या देशात कायद्याचे राज्य असेल हे कबूल केल्यानंतर कायदेभंगाची मानसिकता आपोआप दूर झाली नाही. त्यामुळे वाहतुकीचे असोत वा अन्य नियम-कायदे; त्यांचे पालन करायचेच नाही, अशी प्रवृत्ती जागोजागी पाहायला मिळते. ‘इथे थुंकू नका’ अशी सूचना लिहिलेल्या ठिकाणी हमखास थुंकल्याच्या खुणा आढळतात. ‘इथे कचरा टाकू नका’ असे सांगितल्यास त्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतील. या छोट्या गोष्टीतही शिस्तपालनाची आवश्यकता आहे. कारण यातूनच पुढे सामाजिक स्तरावर कायदे, नियमांबाबत योग्य भान राखले जाते.
जपानमध्ये शाळांच्या सहली काढल्या जातात. त्यात मुलांना हिरोशिमा, नागासाकी या दोन शहरांमध्ये नेले जाते. अणुबॉम्बच्या हल्ल्यात ही दोन शहरे कशी बेचिराख झाली आणि या राखेतून देशाने फिनिक्स पक्षाप्रमाणे कशी भरारी घेतली, किती परिश्रमातून आताचे विश्व उभे केले, हे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. याद्वारे त्यांच्यामध्ये आपल्या देशाला वैभवशाली बनवण्याप्रती दृढ भाव निर्माण केला जातो. जर्मनीतही शाळांमधील विद्यार्थ्यांना हिटलरने नरसंहार केलेल्या बंकरना भेट देण्यासाठी आवर्जून नेले जाते. यातून जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात समर्थ वाटचाल करण्याची, नवी आव्हाने स्वीकारण्याची ऊर्मी निर्माण होते. असेच चित्र आपल्याकडे दिसण्याची आवश्यकता आहे. देशात लोकशाही व्यवस्था रुजली असली तरी लोकशाहीची तत्त्वे मनामनात भिनली आहेत का, याचा विचार करणे ही आता काळाची गरज आहे. अजूनही कल्याणकारी राज्याची संकल्पना प्रत्यक्षात येणे बाकी आहे, असे म्हणावे लागेल. त्याच्या स्वप्नपूर्तीसाठी यापुढील काळात झटावे लागणार आहे. अर्थातच, त्यात मानवाधिकाराचा भाग महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अलीकडे मानवाधिकारावर घाला घालण्याचे प्रयत्न वाढीस लागले आहेत. त्याचाही विचार या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने व्हायला हवा. तरच लोक मिळालेल्या स्वातंत्र्याचे नेमके महत्त्व जाणू लागतील.