Saturday, March 15, 2025
Homeताज्या घडामोडीNavra Maza Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा २'मधील पहिलं गाणं रिलीज;...

Navra Maza Navsacha 2 : ‘नवरा माझा नवसाचा २’मधील पहिलं गाणं रिलीज; ‘या’ गाण्याचं केले रिक्रिएशन!

मुंबई : महाराष्ट्राचा लाडका गणेशोत्सव (Ganeshotsav 2024) अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमानसोबत सुश्रिया चित्र या संस्थेची निर्मिती असणारा ‘नवरा माझा नवसाचा २’ (Navra Maza Navsacha 2) चित्रपटाची लाखो चाहते वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची रिलीज तारीख समोर आली. त्यानंतर आता या चित्रपटामधील पहिलं गाणं देखील रिलीज झालं आहे.

आपल्या सर्वांना परिचित असलेलं गणपती बाप्पाचं “डम डम डम डम डमरू वाजे” हे गाजलेलं गाणं ‘नवरा माझा नवसाचा २’ या चित्रपटात नव्या ढंगात आपल्या भेटीला येणार आहे. सचिन पिळगावंकर आणि आदर्श शिंदे यांनी हे गाणं पहिल्यांदाच एकत्रित गायलं आहे. या गाण्याचे रिक्रिएशन प्रवीण दवणे यांनी केले असून संगीत दिग्दर्शन रविराज कोलथरकर या नवोदित संगीत दिग्दर्शकाने केले आहे.

यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे गाजणार

गाण्याविषयी आदर्श शिंदे म्हणाला, की “डम डम डम डम डमरू वाजे….” हे गाणं मी लहानपणापासून ऐकत, गात आलो आहे. आता “नवरा माझा नवसाचा २” या चित्रपटात सचिन पिळगावंकर यांच्यासह ते मला गायला मिळणं ही खूप आनंदाची बाब आहे. आम्ही दोघांनी एकाचवेळी एकत्र उभे राहून हे गाणं गाण्याचा वेगळा प्रयोग केला. त्यामुळे पूर्वीच्या काळी जसं रेकॉर्डिंग व्हायचं तसं हे गाणं केलं आहे. तो अनुभव खूप कमाल होता. यंदाच्या गणेशोत्सवात हे गाणे नक्कीच गाजेल अशी मला आशा असल्याचे गायक आदर्श शिंदे याने सांगितले.

‘हे’ अभिनेते चित्रपटात दिसणार

सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या “नवरा माझा नवसाचा 2” या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केले असून संवाद संतोष पवार यांचे आहेत. अभिनेते सचिन पिळगांवकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, निर्मिती सावंत, वैभव मांगले आणि सिद्धार्थ जाधव अशी दमदार स्टारकास्ट आपल्याला या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या भेटीस येणार आहे.

दरम्यान, दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणपती बाप्पावरची अनेक गाणी येत असतात. मात्र यंदाचा गणेशोत्सव “डम डम डम डम डमरू वाजे….” या गाण्यामुळे अधिकच स्पेशल होणार आहे, प्रत्येक घरात, मंडळात हे गाणं वाजेल यात शंका नाही. “नवरा माझा नवसाचा २” हा चित्रपट २० सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -