मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधकांना टोला
बदलापूर : राज्यातील याआधीचे महाविकास आघाडीचे सरकार हप्ते घेणारे होते. मात्र,आमचे सरकार बहिणींच्या खात्यात हप्ते भरणारे आहे,असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेवर टिका करणाऱ्या विरोधकांवर लगावला.
कुळगाव–बदलापूर नगरपरिषदेच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे तसेच आदर्श उर्दू शाळा क्रमांक २ नूतन इमातीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात गुरूवारी करण्यात आले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,घोषणा करायच्या आणि निवडणुका झाल्यावर सांगायचे. आमच्याकडे पैसे नाहीत.त्यानंतर केंद्र सरकारकडे पैसे मागायचे. अशा प्रकारचे काम आम्ही करणार नाही . बदलापूरला महानगर पालिका पाहिजे असेल तर तुम्ही सर्व एकदा विचार करा आणि मला सांगा त्यादिवशी महानगरपालिका केली जाईल. आता लाडकी बहिण योजनेचे पैसे जमा झाले आहेत तर विरोधक म्हणतात लवकर पैसे काढून घ्या नाहीतर सरकार पैसे काढून घेईल. पण आम्ही देणारे आहोत. घेणारे नाहीत.आमची देना बँक आहे. लेना बँक तिकडे आहे.
अगोदरचे सरकार हप्ते घेणारे होते. आमचे सरकार बहिणीच्या खात्यात हप्ते भरणारे आहे. ही योजना कायम सुरू राहील, याची काळजी करू नका. लाडका भाऊ झाला,लाडकी बहीण झाली,लाडका शेतकरी झाला,लाडका सगळेच झाले.आता तुम्ही लाडके सरकार पण लक्षात ठेवा.आपला दोन वर्षाचा कारभार बघा आणि तिकडे अडीच वर्षाचा कारभार बघा. तुम्हाला नक्की फरक कळेल,असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि राज्यघटना आपल्या भारताची आहे. महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे. यावेळी विचारमंचावर खासदार श्रीकांत शिंदे, खासदार सुरेश म्हात्रे,आमदार किसन कथोरे,आमदार डॉ.बालाजी किणीकर,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे,जिल्हाधिकारी अशोक शिनगारे,वामन म्हात्रे, राजेंद्र घोरपडे, श्रीधर पाटील,आशिष दामले,शैलेश वडनेरे व इतर मान्यवर होते.