Sunday, March 16, 2025
Homeताज्या घडामोडीबदलत्या फॅशनमुळे ‘मोगरा’ गजरा व्यवसायावर परिणाम!

बदलत्या फॅशनमुळे ‘मोगरा’ गजरा व्यवसायावर परिणाम!

महिलांची ‘चायनीज प्लास्टिक’ गजऱ्याला पसंती

कुडूस : इतरांच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या मात्र स्वतःच्या रोजच्या मिळकतीत चणचण असणाऱ्या ‘मोगरा’ गजरा विक्रेत्यांच्या धंद्यावर महिलांमधील बदलत्या फॅशनमुळे चांगलीच गदा आली आहे. बाजारात चायनीज ‘प्लास्टिक’ गजरा विक्रीसाठी आल्याने त्याला महिला वर्गाकडून मोठी पसंती मिळत आहे. त्यामुळे ‘मोगरा’ गजरा व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

काही वर्षांपूर्वी केसात मोगऱ्याचा गजरा माळणे हे सौंदर्याचे प्रतीक म्हणून समजले जात होते. आज ब्यूटिपार्लर ही पाश्चात्त्य संस्कृती जोपासली जात असल्याने मोगऱ्याच्या गजऱ्याला मागणी कमी झाली असल्याचे दिसत असून गजरा व्यवसाय करणाऱ्यांना अर्थिक चणचण भासत आहे. कुडूस या मुख्य बाजारपेठ गजरे विकणाऱ्या रवींद्र भोईर व राजा भोईर यांची ही हीच व्यथा आहे. सणासुदीचे व लग्नसराईचे दिवस वगळता बाकी दिवस धंदाच होत नसल्याने आम्हा ‘मोगरा’ गजरा विक्रेत्यांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. मुलांचे शिक्षण तसेच संसाराचा गाडा चालविण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागत असल्याचे भोईर यांनी सांगीतले. बदलत्या परिस्थितीनुसार आपल्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी स्त्रियांमध्ये ब्यूटिपार्लर पसंतीचे प्रमाण वाढीस लागल्याने केसात मोगऱ्याचा गजरा माळण्याची मराठमोळी फॅशन हळूहळू कमी होत गेली असून पाश्चात्य संस्कृती आपली पकड घट्ट करीत असल्याचे दिसत आहे.

नाईलाज म्हणून या धंद्यात तग

मोगऱ्याचा गजरा माळण्याचा उत्साह महिला वर्गामध्ये कमी झाल्याने ग्राहकांची संख्या कमालीची घटली असून साधी रोजंदारी ही सुटत नाही. समोर उदरनिर्वाहाचा कोणताही पर्याय शिल्लक नसल्याने केवल नाईलाज म्हणून या धंद्यात तग धरून राहिलो असल्याची आपली खंत कुडूस येथील ‘मोगरा’ गजरे विक्रेते रवींद्र भोईर व राजा भोईर यांनी बोलताना व्यक्त केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -