नागपूर : अनेकांच्या बलिदानातून, संघर्षातून आपल्याला स्वातंत्र्य मिळाले. यासाठी अनेकांनी यातना सहन केल्या. भारतीय स्वातंत्र्याच्या आजवरच्या वाटचालीत आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून एक मैलाचा टप्पा गाठला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत हे ब्रीद घेऊन सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्धता ठेवली आहे. प्रगतीचे विविध टप्पे गाठताना सामान्य माणसाच्या जीवनात परिर्वतन व्हावे यासाठी शासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. स्वातंत्र्य दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालय येथे आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमात ते बोलत होते.
राज्य शासनाने केंद्र शासनासमवेत विविध उपक्रम, योजनांच्या अंमलबजावणीवर भर दिला. या प्रयत्नातून महाराष्ट्राची वाटचाल आता ट्रिलियन डॉलरकडे झेपावली असून सबंध भारतात महाराष्ट्राने यात पहिला क्रमांक मिळविला आहे. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही आपण सुरु केली आहे. सुमारे ६ हजार, ८ हजार आणि १० हजार रुपये असे विद्यावेतन आपण नोंदणीकृत युवकांना देत आहोत.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला. मुलींसाठी ५०० कोर्सेसच्या फिसची रक्कम शासन देत आहे. पीएम सूर्यघर योजनेच्या माध्यमातून ज्यांनी आपल्या घरावर सौर पॅनल बसविले त्यांना ३०० युनिट मोफत वीज आपण देत आहोत. ज्यांची वीज ३०० युनीटपेक्षा अधिक होत आहे. ती वीज आपले वीज महामंडळ विकत घेईल, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला.