ऋतुराज – ऋतुजा केळकर
सूर्यालाही सहस्त्र किरणे…
चंद्रालाही एक हजार….
शीतलता की दाह हवा तो…
तुझा करावा तु स्वीकार …
देणाराचे हात हजार…”
किती अर्थपूर्ण आहे हो काव्य!! आयुष्यात नेहमीच आपली ‘टू बी ऑर नॉट टू बी’ अशी मनाची द्विधावस्था बरेचदा होते. तेव्हा खरा आपला कस लागतो. पण हळवेपणा, वात्सल्य भावनांचा सच्चेपणा ज्यांच्या व्यक्तिमत्त्वात ओसंडून वाहतो, ज्यांच्या वाणीत, विचारांत, आचारात अमृताची मधुरता असते किंबहुना साऱ्या जीवनात स्नेहशिलता असते असेच लोक अशा प्रसंगांतून तरून पार होतात.
आज “अनंत अमुची विषयासक्ती अनंत या वासना” हे ब्रीदवाक्य बाळगून जगणारे रावण आणि कंस वळणावळणावर उभे आहेत. पापांची मोहक फुलबाग ऐश्वर्याच्या द्वाराने सजली आहे. पण आपल्या हृदयात उदात्त विचारांचे आणि संस्काराचे मुद्दल पुंजीवर आनंदाच्या निर्व्याज निष्ठेतून मिळणाऱ्या व्याजावर जगणाऱ्याच्या मुक्तीचे द्वार सहज उघडले जाते. म्हणूनच जीवनाच्या फाटक्या चंद्रमोळीत भले ही ऐश्वर्याची चकचकीत आणि मौल्यवान झुंबरे झळाळत नसतीलही पण त्यात सदैव स्नेहमयी प्रेमाची आणि नितीमत्तेची ज्योत मात्र अखंडपणे तेवत रहाते आणि जेव्हा जेव्हा धर्माला क्षिणता येऊन अधर्म बोकाळतो तेव्हा तेव्हा धर्मरक्षणाकरिता ही ज्योत मशाल बनून अधर्माला मुळासकट उखडून टाकते. कारण “धर्म” मग तो कोणताही असो तो दुर्बलतेचे समर्थन कधीच करत नाही. धर्म हा निती, सत्य आणि सौंदर्याचे द्योतक आहे. जेव्हा निरांजनी मूल्यांची फरफट होते तेव्हा, भाबडेपणाने आपल्याच भातुकलीच्या खेळात रमून अंगणातील पारिजातकाचे सडे वेचत राहाणे हे अत्यंत अयोग्य असते. कारण पावसाळ्यात गव्हाची कोठारे कितीही लिंपली तरीही किडे, शेण, मातीला भोक पाडून धान्याची वाट लावणारच. त्यामुळे या दुष्ट प्रवृत्तींना जाळून शुभंकरत्वाची तसेच संस्कृतीची ज्योत अखंड तेवत ठेवायला हवी.
पण जीवनात ‘सफलता’ म्हणजे नक्की काय? आपण पोट भरण्यासाठी जगायचे किंवा जगण्यासाठी पोट भरायचे की कलाप्रेमी, ईश्वरभक्त, ज्ञानोपासक, ध्येयवादी असे सर्वगुणसंपन्न आयुष्य व्यतीत करायचे हे ज्याचे त्याने ठरवावे. तसे बघायला गेले तर, जीवनात कसे जगायचे याच ज्ञान हे भगवद्गीता, कुराण आणि बायबल आणि यांसारख्या सर्वच ग्रंथात वेगवेगळ्या पद्धतीने दिलेले आहे. त्यात सर्वच जीवनमूल्ये नेटकेपणाने मांडलेली आहेत.
तसे बघायला गेले तर वरवर पाहता ही सारी पुस्तके ही केवळ पुस्तके आहेत आणि म्हटले तर यात कला, क्रीडा, संगीत, विज्ञान साऱ्या साऱ्यांचे समग्र ज्ञान व्यापकपणे सामावले आहे. आता ज्ञानेश्वरीतील एक एक ओवी घ्या बरं. जितक्या वेळा तुम्ही त्या वाचाल तितक्या वेळा वेगवेगळा अर्थ आपल्याला अभिप्रेत होतो. प्रत्येकवेळी नानाविध प्रकारचे अर्थ त्यातून हजार पाकळ्यांच्या कमलपुष्पाप्रमाणे उलगडत जातात. अर्थात याकरिता स्वतःच्या क्षमतेवर ही श्रद्धा असणे तितकेच गरजेचे आहे. कारण अज्ञान आणि अकार्यक्षमतेच्या आधारे जीवन जगणे हे मृत्यू समानच आहे.
अर्थातच ऋतूसाजाने फुलणाऱ्या बहरणाऱ्या जीवनाला अपयशाच्या पानगळीला कधी ना कधीतरी सामोरे जावे लागत नाही असे नाही. अशावेळी
“ जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ
दुर्गुणांचा वळ सहावेना’’
या उक्तीप्रमाणे जगण्याची… ‘सुंदर जीवन जगण्याची अतुट इच्छा असणे अजिबात चुकीचे नाही. मग त्यातही केवळ देहाने शंभर वर्षे जगायचे की, विचारांनी तत्त्वांनी आपल्या विचार शृंखलेने शतकानुशतके जिवंत राहण्याची धडपड करायची आणि ‘तेच जिवनाचे प्रयोजन’ निर्धारीत करायचे हे ही ज्याचे त्याने ठरवायचे असते.
म्हणूनच नेहमी मोठी आणि चांगली स्वप्न पाहणारे आणि उदात्त सौंदर्याची, यशाची, समृद्धीची आराधना करणाऱ्याचे अनुयायी व्हावे जेणेकरून आपलेही आयुष्य समयीच्या ज्योती सारखे मंद पण सात्विकतेने भारले जाईल. कारण अंधाराचे पाश कितीही बळकट असले तरीही अंतरंगातील स्नेहाचे दीप जोवर तेवत राहतील तोवर अंधाराचा भेद होतोच. मग जीवनाची गुढता कितीही गूढ होत गेली तरीही चैतन्याच्या नवनवीन खुणांनी भविष्याचे वेध घेता घेता आपल्या मनाच्या प्रतिभेचे आणि कर्तव्याचे सूर या ऋतुपर्णावर अधिकाधिक गडद झाल्याखेरीज राहणार नाहीत मग अखेरीस माझ्याच शब्दांत सांगायचे झाले तर,
ऋतू ऋतुतून फुलणारे…
कर्तव्याचे मंजुळ सूर…
मी पणाच्या शिंपल्यातून …
ऋतुपर्णावर…
आत्मसादाच्या नवख्या खुणांचे…
माणिकमोती ठेवून गेले…