नाशिक : जरांगे पाटील कुणाला लाभदायी हो अथवा न हो पण नाशिकमधील चोरांना मात्र जरांगे पाटील लाभदायी झाले आहेत. त्यांच्या शांतता रॅलीच्या समारोपामध्ये पाच लाखाच्या दागिन्यांची चोरी झाली आहे. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मंगळवारी (दि.१३) शहरात मराठा आरक्षण शांतता रॅलीचा समारोप झाला. तपोवनातून निघालेल्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने समाजबांधवांची गर्दी उसळली होती. या गर्दीची संधी साधत चोरट्यांनीही हात की सफाई केली. या गर्दीत सोन्याचांदीच्या दागिण्यांसह मोबाईल आणि पाकिटे चोरट्यांनी लांबविले असून पंचवटीत चौघांच्या गळ्यातील सुमारे पाच लाखांचे दागिणे भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी आणि आडगाव पोलीस ठाण्यात नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केशव पंढरीनाथ ढोली (रा. वावरेनगर, कामटवाडे) यांनी पहिली फिर्याद दिली आहे. ढोली या रॅलीत सहभागी झाले होते. काट्यामारूती सिग्नल चौकात उभे असतांना चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी लांबविली. तर मालेगाव स्टॅण्ड भागात सौरभ देवचंद महाले यांच्या गळ्यातील चैन तर सिमा माधव पिंगळे या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र असा सुमारे दीड लाखाचे अलंकार भामट्यांनी हातोहात लांबविले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात एकत्रीत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.