जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग घ्यावा, सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन
चंद्रपूर : लोकमान्य टिळकांनी (Lokmanya Tilak) जनजागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव आयोजित करण्याची प्रथा सुरु केली. महाराष्ट्र शासनातर्फे (Maharashtra Govt.) सार्वजनिक गणेशोत्सवात जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभागी व्हावे, याकरिता गत वर्षीपासून राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार (Award) देण्यात येतात. त्याच पार्श्वभूमीवर यंदा ७ सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) राज्यातील सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या स्पर्धेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२४ अंतर्गत मुंबई, मुंबई (उपनगर), पुणे, ठाणे या जिल्ह्यातून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यातून प्रत्येकी १ याप्रमाणे एकूण ४४ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येणार आहे. त्यामधील राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या सर्वोत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लक्ष रुपये, द्वितीय क्रमांकासाठी २.५० लक्ष व तृतीय क्रमांकासाठी १ लक्ष रुपये, इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ जिल्हास्तरीय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सहभागी होता येईल. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ जुलै २०२४ च्या शासन निर्णयात स्पर्धा निवडीचे निकष, अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सदर अर्जाच्या नमुन्यानुसार स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई याच्या [email protected] या ईमेलवर ३१ ऑगस्ट २०२४ या कालावधीत अर्ज सादर करावा. तसेच या स्पर्धेत जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी केले आहे.