आजच्या लेखामार्फत आपण माणसाची वैचारिक शक्ती, त्याच्या विचारांची व्यापकता, एकमेकांना समजावून घेण्यासाठी लागणारं कौशल्य, वादविवाद, गैरसमज याची कारणं काय, मन कलुषित होण्याची कारणं, नातं तुटण्याची कारणं काय, हे सगळं टाळता येणे किती सोपे आहे, हे जाणून घेणार आहोत. एखाद्या इमारतीच्या मजल्याप्रमाणे खालच्या मजल्यावरून वरच्या मजल्यावर जाताना आपल्याला दिसणारे दृश्य, चित्र, परिसर त्यानुसारच आपली वैचारिक शक्ती, मानसिकता कशी बदलत जाते, उंचावत जाते, जाऊ शकते, दृष्टिकोन कसे बदलतात, व्यापक होतात, विचार बदलणे शक्य असते, कोणत्याही गोष्टीला किती वेगवेगळ्या बाजू असतात, अनेक कंगोरे असतात याबद्दल जाणून घेणार आहोत.
फॅमिली काऊन्सलिंग – मीनाक्षी जगदाळे
जेव्हा आपण रस्त्यावर उभे असतो तेव्हा आपल्याला फक्त समोरचं किंवा जास्तीत जास्त आपल्यापेक्षा दहा-पंधरा फूट उंचीवरच दृश्य दिसत. आपण म्हणतो ते दृश्य तेवढंच आहे, जेवढं आपण बघतोय. त्याचवेळी त्याच रस्त्यावर असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर असणाऱ्या व्यक्तीने आपल्याला फोन केला आणि सांगितलं की, अरे तू उभा आहे तिथे थोडं पुढे एक विक्रेता उभा आहे त्याच्याकडून काही वस्तू घेऊन ये. आपण म्हणू नाही तिथे कोणीच नाही, मला तसं कोणीच दिसत नाही. जी व्यक्ती वर आहे, वरून बघते आहे तिला आपल्यापेक्षा जास्त मोठा परिसर दिसत असल्यामुळे तिला व्यापक दृष्टिकोन प्राप्त झाला. पण आपण त्याचं म्हणणं अमान्य करतो केवळ आपल्याला ते दिसत नाहीये म्हणून. आता आपण स्वतः जसं जसं या इमारतीच्या अधिक !वरच्या मजल्यावर चढतो तसतसं आपल्याला अजून लांबचे रस्ते, माणसं, दुकान, बाजारपेठ, गाड्या, गर्दी, मोठे रस्ते, मोठी वाहनं, अजून वर गेल्यावर आपल्या बिल्डिंगपेक्षा मोठ्या बिल्डिंग, तिथली घरं, त्या घरातील सामान, त्यातली माणसं, आकाश, आकाशात उडणारे पक्षी हे सर्व दिसायला लागत. जे आपण रस्त्यावर उभे राहून पाहू पण शकत नव्हतो. मग आपल्याला तो विक्रेता पण दिसलेला असतो आणि लक्षात येत की, आपण चुकलो होतो ती व्यक्ती बरोबर सांगत होती. आपण तिचं ऐकायला हवं होतं.
आता यात पण आपण वर गेलोय पण बिल्डिंगच्या कोणत्या दिशेला आपण कितव्या मजल्यावर आहोत हेही तितकेच महत्त्वाचे आहे. चार मुख्य दिशांना म्हणजेच पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण. चारजण त्यांच्या त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीमध्ये जर पाचव्या मजल्यावर त्यांच्या खिडकीत उभे असतील तरीसुद्धा प्रत्येकाला समोर दिसणारं दृश्य वेगळं असेल. एकजण म्हणेल माझ्या घरासमोर सुंदर मॉल आहे, गाड्या येत आहेत, लोकं खरेदी करत आहेत, यांच्या जीवनात किती आनंद आहे. दुसरा म्हणेल माझ्या फ्लॅटच्या खाली गार्डन आहे. मुलं खेळत आहेत, ज्येष्ठ गप्पा मारत आहेत, सुख-समाधान आहे, बागेत मंदिर आहे. सुमधुर भक्तीगीत ऐकायला येत आहे, प्रसन्न वाटतं आहे. तिसरी व्यक्ती म्हणेल माझ्या फ्लॅट खाली मुख्य रस्ता आहे, प्रचंड ट्रॅफिक आहे, कायम कर्कश हॉर्न, गाड्यांचे आवाज, घरात चिडचिड, मन एकाग्र होत नाही, मुलांना !अभ्यासाला त्रास होतो, सतत खिडक्या बंद ठेवून वैताग1! आला आहे. उगाच इथे घर घेतले, चूक झाली माझी घर घेताना. एजन्टने फसवलंच मला. चौथा व्यक्ती म्हणेल माझ्या फ्लॅटमधून झोपडपट्टी दिसते. बिल्डरने फसवलंच मला. बांधकाम सुरू असताना सांगितलं होतं मोकळी जागा असणार. इथे तर झोपडपट्टी झाली. सतत शिवीगाळ, भांडण. काय संस्कार होणार मुलांवार माझ्या. दारूडे असतात, कचऱ्याचा वास येत असतो, इथे घर घेतले आणि पैसे वाया गेले माझे.
आता यामध्ये कोणाचेही सांगणे चुकीचे नाही. जर हे चारहीजण एकमेकांना भेटले किंवा फोनवर एकमेकांशी बोलले तर आपापल्या घराचे वर्णन वर सांगितल्याप्रमाणे करतील. म्हणजेच जेवढं त्यांना दिसत आहे, जेवढ त्यांनी पाहिलं आहे. आता या ठिकाणी दुसऱ्याची बाजू ऐकून घेण्याची अथवा समजावून घेण्याची जर त्यांची मानसिकता नसेल तर मात्र त्यांच्यात प्रचंड वाद, मतभेद, भांडण होणारच. याठिकाणी प्रत्येकजण प्रत्येकाच्या जागी योग्य असून सुद्धा तो दुसऱ्यासाठी खोटारडा आणि चुकीचा, मूर्ख ठरेल कारण त्याची सत्य परिस्थिती इतरांनी समजावून घेतलीच नाही, तेवढा अभ्यास त्यांनी केलाच नाही. अगदी असच आपण दैनंदिन आयुष्यात करत असतो.! आपली संकुचित विचारसरणी. आपण बिल्डिंगच्या गच्चीवर जाऊन सर्व बाजूंनी फिरून संपूर्ण परिसर फिरून पाहण्याचे कष्टच कधी घेत नाही. आपल्याच मनाच्या, डोक्याच्या डबक्यात आपण आपल्याच विचाराच्या खेळात इतके वर्षानुवर्षे अडकलेले असतो की त्यावर, त्यापुढे, आजूबाजूला खूप मोठे जग, दुनिया आहे, इतर सत्य परिस्थिती आहे, आपल्याला जे दिसतंय, जे दाखवलं जात आहे त्यापेक्षा अधिक काही आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न सुद्धा आपण करत नाही. अनेकदा आपणच आपल्याकडे येणाऱ्या माहितीच्या वाटा स्वतःहून बंद करून टाकलेल्या असतात. आपण वेळीच आयुष्यात किती लवकर, किती पटापट सत्य जाणून घेण्यासाठी, वरच्या माजल्यांवर जाण्यासाठी प्रयत्न करायचे, किती लवकर स्वतःला ज्ञानी आणि हुशार करायचे, स्वतःच्या कोशातून बाहेर यायचे आणि स्वतः सगळी परिस्थिती समजावून घेऊन अभ्यास करायचा की त्याच्या अर्धवट सांगण्यावरूनच वाद घालून आपलं आयुष्य वाया घालवायचे हे आपल्या हातात आहे.
आता इथे तरी आपण फक्त चार दिशांना उभे असलेल्या चार लोकांच्या नजरेतून दिसणाऱ्या परिस्थिती किंवा वस्तुस्थितीचे उदहारण घेतले आहे. याठिकाणी हे चारही लोकं एकाच इमारतीच्या पाचव्या मजल्यावर उभे आहेत आणि खरं बोलत आहेत असं गृहीत धरलेलं आहे. आयुष्य जगत असताना आपल्याला असे अनेक रस्त्यांवर उभे असणाऱ्या लोकांपासून ते अनेक परिसरातील अनेक विविध इमारतींच्या वेगवेगळ्या मजल्यावर, दिशांना उभे राहून वेगवेगळ्या दृष्टीने वेगवेगळे दृश्य पाहणारे लोकं भेटतात, आपल्याशी बोलतात, आपल्या नात्यात येतात, संपर्कात येतात आणि त्यांच्याशी आपल्याला स्नेहसंबंध, नातेसंबंध जोपासायचे असतात. यातील कितीजण सर्वांगीण विचार करून बोलणारे असतात, सर्वसमावेशक निर्णय घेणारे असतात, जे दिसत आहे ते तंतोतंत आणि खरं सांगणारे असतात, शब्दाला जागणारे असतात, निस्वार्थी असतात हे पण आव्हान आपल्यासमोर असतं. त्यामुळे कोणत्याही गोष्टीचा एकांगी एकतर्फी विचार न करता सर्वांगीण विचारशैली विकसित करणे, विचाराची उंची वाढवणे, सगळ्यांच्या बाजूने परिस्थितीनुसार अभ्यास करणे, सत्याच्या मुळाशी जाणे, घटनेच्या खोलात जाणे, स्वतः अनुभव घेऊन माहिती घेऊनच मत मांडणे, निर्णय देणे अथवा कोणतेही विधान करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला या वाचाळ स्वभावामुळे स्वतःचं महत्त्व आणि किंमत शून्य होते हे लक्षात घ्यावे.