पुणे : उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशभरात स्वातंत्र्य दिन (Independence Day) साजरा करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडूनही (Central Government) दरवर्षी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) उपक्रम राबवण्यात येतो. त्याचप्रमाणे यंदाही शासनातर्फे देशभरात १३ ते १५ ऑगस्टया कालावधीत दरवर्षीप्रमाणे ‘हर घर तिरंगा’ (घरोघरी तिरंगा) उपक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्व शासकीय, निमशासकीय इमारती तसेच पुणे विभागातील नागरिकांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे.
‘घरोघरी तिरंगा’ या उपक्रमानुसार प्रत्येक देशवासीयांनी आपल्या घरी राष्ट्रध्वज उभारुन आपला देशाभिमान व्यक्त करण्यासह स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करावे, असे आवाहन केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आले आहे.
हा उपक्रम राबवित असताना प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाने १३ ते १५ ऑगस्टदरम्यान सूर्योदयानंतर राष्ट्रध्वज फडकावणे आणि सूर्यास्तापूर्वी उतरवणे बंधनकारक आहे. नागरिकांनी आपल्या घरी लावलेला राष्ट्रध्वज या संपूर्ण कालावधीत संध्याकाळी उतरवणे आवश्यक नाही. राष्ट्रध्वज संहितेचे पालन करुन या कालावधीत राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा.
दरम्यान, ‘तिरंगा सेल्फीज’ हा उपक्रम राबवून सदर छायाचित्रे शासनाच्या https://harghartiranga.com संकेतस्थळावर अपलोड करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे. सर्व नागरिकांनी ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमात सहभागी होत आपल्या घरी फडकविलेल्या राष्ट्रध्वजासोबत सेल्फी घेऊन कार्यालयप्रमुखांकडे पाठवावे.