Friday, October 24, 2025
Happy Diwali

डेंग्यू, झिकाचा होणार नायनाट! लवकरच येणार व्हायरसची नवी लस

डेंग्यू, झिकाचा होणार नायनाट! लवकरच येणार व्हायरसची नवी लस

पुणे : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक साथीचे आजार डोकावत असतात. त्यातच सध्या देशभरात डेंग्यू आणि झिका व्हायरसने थैमान घातले आहे. मागील आठवड्यात जोरदार झालेल्या पावसामुळे डेंग्यू (Dengue) आणि झिकाची (Zika Virus) रुग्णसंख्या सातत्याने वाढत चालल्याचे दिसून येत आहे. मात्र आता लवकरच या आजारांचा नायनाट होणार आहे. या आजारांचा प्रादुर्भाव मिटवण्यासाठी नवीन लस (Vaccine) उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देशात सध्या डेंग्यूच्या लशीवर ४ संस्थांकडून संशोधन सुरू आहे. सरकारने राष्ट्रीय जैववैद्यक धोरणांतर्गत डेंग्यू लसीच्या चाचण्यास परवानगी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) हैदराबादमधील पॅनासिआ बायोटेक कंपनीबरोबर डेंग्यूवरील लशीच्या चाचण्यांसाठी करार केला आहे. 'डेंगीऑल' असे या लसीचे नाव असून तिच्या चाचण्या ५ वर्षांसाठी घेतल्या जाणार आहेत. या लसीची पहिली व दुसरी चाचणी पूर्ण झाली असून तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी भारतीय औषधे महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे.

याचबरोबर इंडियन इम्युनोलॉजिकल्स लिमिटेड (आयआयएल) कंपनीकडूनही डेंग्यूची लस विकसित केली जात आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी लवकरच सुरू होणार आहे. या लसीची पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी ठरली असून, तिचे चांगले परिणाम दिसून आले आहेत.

झिकाच्या लसीचे संशोधन

दरम्यान, हैदराबादमधील 'भारत बायोटेक' कंपनी सध्या डेंग्यू आणि झिकाच्या लसीबाबत काम करत आहे. सध्या या लसींची क्लिनिकल ट्रायल सुरू असून झिका व्हायरसच्या लसीला CDSCO ची मान्यता देण्यात आली आहे. कंपनीने लस विकसित केली असून, झिकाच्या निष्क्रिय विषाणूचा वापर यामध्ये करण्यात आला आहे. याची पहिल्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय औषधे मानके नियंत्रण संस्थेने याच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला परवानगी दिली आहे. त्यामुळे लवकरच या चाचण्या सुरू होतील, अशी माहिती मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >