Friday, March 28, 2025
Homeमहामुंबई२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

२७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार

प्रश्न सोडविण्याबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. या सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेऊन त्यांचे प्रश्न सोडविणार असे आश्वासन कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर आंदोलनास बसलेल्या या कर्मचाऱ्यांची खा. डॉ. शिंदे यांनी भेट घेत पुन्हा कामावर रुजू होण्याचे आवाहन केले.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये समावेश होऊनही महानगरपालिकेच्या नियमानुसार पगार मिळावा या प्रमुख मागणीसाठी २७ गावातील सफाई कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. केडीएमसी मुख्यालयासमोर हे सफाई कामगार केडीएमसी प्रशासनाविरोधात निदर्शने करत असून या कामगारांची खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्व सफाई कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली २७ गावांच्या समस्यां सोडविण्यासाठी अनेक उपायोजना राबविण्यात येत आहे.

२७ गावांमध्ये रस्त्यांची उभारणी,मुबलक पाणी देण्यासाठी अमृत योजना यांसह अनेक उपाययोजना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या सूचनांनुसार आपण राबवत आहोत. भविष्यातही या गावांसाठी कल्याणाकारी निर्णय घेण्यात येतील, असेही खासदार श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितले. यावेळी खा.शिंदे यांच्यासोबत स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, अरविंद मोरे, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, शहरप्रमुख रवी पाटील, महेश पाटील, महेश गायकवाड, आगरी युथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे, निलेश शिंदे, संजय पाटील,विजया पोटे, छाया वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यापूर्वी २७ गावांना भेडसावणारे मोठे प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पुढाकाराने सोडवण्यात आले आहेत. त्यात कर आकारणीचा प्रश्न असो की पाणी पुरवठ्याचा, हे दोन्ही प्रश्न आपण यशस्वीरीत्या सोडवले आहेत. त्याचप्रमाणे २७ गावांतील सफाई कर्मचाऱ्यांचा पगारासंदर्भात आपण येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यासाठी पुढाकार घेऊ. आणि या बैठकीत याप्रश्नी नक्कीच समाधानकारक असा तोडगा निघेल असा विश्वास खा.डॉ.शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच सुरू केलेले हे कामबंद आंदोलन मागे घेत कामावरही रुजू होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -