भाजपा आमदार नितेश राणे यांचा इशारा
मुंबई : गेले कित्येक दिवस मराठ्यांना आरक्षण (Maratha Reservation) मिळावे यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांचे आंदोलन सुरु आहे. तसेच मराठा समाजातील ठोक मोर्चाचे कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. हे कार्यकर्ते राज्यातील सर्व दिग्गज नेत्यांची आरक्षणाबाबत भूमिका मांडण्यासाठी त्यांची भेट घेत आहेत. यादरम्यान ओबीसी, धनगर किंवा अन्य कोणत्याही जातींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास आमचा पाठिंबा आहे, अशी भूमिका सर्व पक्षीय नेत्यांकडून मांडण्यात येत आहे. परंतु तरीही मराठा समाजाचे जरांगे यांच्यासारखे काही कार्यकर्ते हिंदूंमध्ये फूट पाडून भांडणं लावण्याचे काम करत आहेत, असा खोचक टोला भाजपा (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी लगावला.
महायुती सरकारने कुठल्याही जातीच्या आरक्षणाला हात न लावता प्रामुख्याने ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिले आहे. महायुतीच्या या भूमिकेला राज्यातील सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठींबा दिला आहे. तरीही हिंदूंमध्ये फूट पाडून मराठा, ओबीसी, धनगर या सर्व समाजांमध्ये आरक्षणाच्या नावाखाली भांडणं लावण्याचा कार्यक्रम सातत्याने सुरु असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
मराठा समाजातील काही कार्यकर्तेच मराठा समाजाच्या खांद्यावर बंदूक ठेवून हिंदूंमध्ये फूट पाडत आहेत. तसेच जास्तीत जास्त सरकारी नोकऱ्यांचे प्राधान्य मुस्लिम समाजाला मिळवून देणे, असा त्यांचा लपाछपीचा कार्यक्रम सुरु आहे. या सर्व कारणांमुळेच सर्व हिंदू आपापसात भांडत एकमेकांचे दुश्मन बनत चालले आहेत. त्यामुळे या कार्यकर्त्यांनी हे काम लवकरात लवकर बंद करावे असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. तसेच मराठा समाजातील बांधवांनी अशा कार्यकर्त्यांच्या भूलथापांना आणि आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.