अनेक रस्ते बंद, शाळांनाही सुट्टी; पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
नाशिक : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज नाशिक शहरात शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. पुणे आणि अहमदनगरनंतर आज ही फेरी नाशिकमध्ये (Nashik) दाखल होणार आहे. तर मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणानंतर नाशिकमध्येच रॅलीची सांगता होणार आहे. त्यामुळे या रॅलीत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस देखील तैनात करण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील तपोवन जुना आडगाव नाका – निमाणी मालेगाव स्टॅण्डमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करत मनोज जरांगे पाटील यांचे स्वागत होणार आहे. त्यानंतर सीबीएस येथील चौकात रॅलीमध्ये सहभागी झालेल्या उपस्थित सकल मराठा समाज बांधवांना मनोज जरांगे पाटील संबोधित करतील व शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. यादरम्यान प्रशासनाने शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच वाहनचालकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
कोणते मार्ग बंद?
स्वामी नारायण चौकापासून ते कन्नमवार पूल, मिर्ची सिग्नल ते स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट ते दिंडोरी नाका, मालेगाव स्टँड, रविवार कारंजा ते सांगली बँक सिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएसच्या दोन्ही बाजूकडील रस्त्यावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे.
काय आहे पर्यायी मार्ग?
छत्रपती संभाजीनगरकडून येणारी वाहतूक मिरची हॉटेल सिग्नल येथून अमृतधाम, तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती सिग्नल, पेठरोडमार्गे मार्गस्थ करण्यात येईल. धुळेकडून येणारी वाहतूक अमृतधाममार्गे तारवाला चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती, पेठरोडमार्गे मार्गस्थ होईल. दिंडोरी नाक्याकडून येणारी वाहतूक पेठनाका, मखमलाबाद नाका, रामवाडी पुलामार्गे वळवण्यात येणार आहे. दिंडोरी नाक्याकडून जाणारी वाहतूक तारवाला चौक, हिरावाडीकडून मार्गस्थ तर द्वारका सर्कलकडून कन्नमवार पुलाकडे पुलाखालून जाणारी वाहतूक द्वारका उड्डाणपुलावरून मार्गस्थ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.