माणगांव : मोबाईल न दिल्याने वडिलांचा खून केल्याप्रकरणी माणगांव सत्र न्यायालयाने मुलास जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदरची घटना ही तळा तालुक्यातील मौजे वरळगावचे हद्दीत घडली होती.
या घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, गुन्हयातील आरोपी भावेश भागुराम काप हा मयत वडिल भागुराम धर्मा काप यांचेकडे मोबाईल मागत होता. परंतु वडिलांनी मोबाईल दिला नाही, या गोष्टीचा मनात राग धरून वडिल व मुलामध्ये बाचाबाची व झटापट होवून आरोपी मुलाने लाकडी चोपना हातात घेवून मयत वडिल यांच्या कपाळाचे वर डोक्यात मारून गंभीर जखमी करून ठार मारले होते.
या घटनेची फिर्याद तळा पोलीस ठाणे येथे घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास अप्पर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांनी केला. याकामी गुन्हयातील साक्षीदार तपासून कोर्टासमोर प्रभावीपणे युक्तिवाद करून महत्वाचे न्यायनिर्णय दाखल केले. तसेच जिल्हा व सत्र न्यायाधीश हर्षल भालेराव यांनी सदर घटनेतील गुन्हयाच्या शाबीतीनंतर घटनेतील आरोपीला दि. १३ ऑगस्ट रोजी दोषी धरून जन्मठेप व रू. १५,०००/- दंडाची शिक्षा ठोठावली.