Saturday, March 22, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMhada : म्हाडाच्या बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती; अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार...

Mhada : म्हाडाच्या बनावट अनधिकृत संकेतस्थळाची निर्मिती; अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलकडे तक्रार दाखल

‘म्हाडा’च्या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा: संजीव जयस्वाल

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा-Mhada) मुंबई मंडळाच्या वतीने नुकतीच मुंबई शहराची २०३० घरांची लॉटरी जाहीर झाली आहे. जाहिरात प्रसिध्द होताच अनेक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर अर्ज केले जात आहेत. या दरम्यान म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहुब कॉपी करत एक बनवट वेबसाईट सुरू करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शासनाची mhada.housing.gov.in ही खरी वेबसाईट असून mhada.org ही बनावट वेबसाईट तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची फसवणूक होण्याची शक्याता आहे.

दरम्यान या बनावट वेबसाईटवर घर पाहिजे तर ६ लाख भरावे लागतील असे सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या संकेतस्थळाप्रमाणे हुबेहूब संकेतस्थळ बनवले असून रंगसंगती देखील सेम टू सेम ठेवण्यात आली आहे. तसेच सदनिकेची पूर्ण किंमत २९ लाख सांगिण्यात आली असून पूर्ण किंमत भरल्यावर ताबा दिला जाईल अशा भूलथापा देखील मारल्या आहेत. या बनावट संकेतस्थळाच्या क्विक लिंकमध्ये पेमेंट ऑप्शन ओरिजनलवर नाही पण बनावट संकेतस्थळावर आहे. दरम्यान ही वेबसाईट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर म्हाडाकडे याबद्दल तक्रार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. म्हाडाच्या आयटी विभागाने यासंदर्भात अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी केले आहे.

म्हाडाच्या सोडत प्रणालीमध्ये अर्जदारांची नोंदणी प्रक्रिया झाल्यावर त्यांचे कायमस्वरूपी प्रोफाइल तयार होते. या प्रोफाइलमध्ये अर्जदार आपले कागदपत्र सादर करतात. या कागदपत्रांची प्रणालीद्वारे पडताळणी केली जाते व पात्र कागदपत्रांनुसार अर्जदाराची पात्रता निश्चिती केली जाते. यानंतरच अर्जदार सोडतीसाठी अर्ज करू शकतील व अर्ज भरल्यानंतरच अनामत रकमेचा भरणा करण्याबाबतचा पर्याय या प्रणालीमध्ये उपलब्ध होतो.

म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील २०३० सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याने, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा देत आवाहन केले आहे की, सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही श्री जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.

काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. म्हाडाचे घर मिळवून देण्याचे आश्वासन देत सदर अज्ञात व्यक्तींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीस बनावट संकेतस्थळ व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली व त्यांनी म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी रु. ५०,००० इतकी रक्कम या बनावट संकेतस्थळावरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आली. तसेच याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला आहे.

म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय सोडत प्रणाली वापरण्यात येत आहे. ही प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आणि महत्वाचे म्हणजे पूर्णता ऑनलाइन आहे व यामुळे ही प्रणाली मानवी हस्तक्षेपास वाव देत नाही.

मात्र, फसवणूक झालेल्या व्यक्तीने ही कोणतीही प्रक्रिया न राबविता थेट अज्ञात व्यक्तींद्वारे कळविण्यात आलेल्या रकमेचा भरणा या बनावट संकेत स्थळावर केल्याचे समजले आहे.

मंडळातर्फे कळविण्यात येत आहे की https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय थेट अनामत रक्कमेची मागणी केली जात नाही. करिता अर्ज सादर करतेवेळी सोडत प्रणालीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे नीट अवलोकन करून माहिती पुस्तिकेत नमूद केलेल्या रकमेइतकेच अनामत रकम उत्पन्न गटनिहाय ऑनलाइनच अदा करावी. तसेच ही प्रक्रिया मानवी हस्तक्षेपाशिवाय कार्यरत असल्याने म्हाडा कर्मचारी अधिकारी यांचेकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही. नोंदणी ते सदनिकेचा ताबा या सर्व प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीनेच केल्या जातात.

मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, म्हाडा सोडतीसाठी अर्ज करण्याकरिता https://housing.mhada.gov.in हे अधिकृत संकेतस्थळ असून या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत संकेतस्थळावर अर्जदारांनी सोडतीत सहभाग घेऊ नये, कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये तसेच कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये. तसेच मुंबई मंडळातर्फे सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणत्याही समाजमाध्यमांची, त्रयस्थांची, संस्थांची अथवा इतर मध्यस्थांची मदत घेण्यात आलेली नाही. तसेच कोणालाही प्रतिनिधी/ सल्लागार/ प्रॉपर्टी एजंट/मध्यस्थ/ दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नये आणि तसे केल्यास मंडळ अथवा म्हाडा प्रशासन जबाबदार राहणार नाही. नागरिकांना असेही आवाहन करण्यात येत आहे की, त्यांची अशाप्रकारे कोणी व्यक्ति/ दलाल काही प्रलोभने देऊन फसवणूक करीत असल्याचे आढळल्यास त्यांनी ‘म्हाडा’च्या मुख्य दक्षता व सुरक्षा अधिकारी तसेच उपमुख्य अधिकारी (पणन) मुंबई मंडळ यांचे कार्यालयास कळवावे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -