सेवाव्रती – शिबानी जोशी
भारतीय तरुण सशक्त, आधुनिक युद्ध शास्त्रात प्रवीण झाला पाहिजे, याचा भोसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक, भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाजसुधारक व निष्णांत नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांनी ध्यास घेतला होता. मुंजे यांनी स्थापन केलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे मुख्यत्वे नाव घेतले जाते आणि त्यातील भोसला मिलिटरी स्कूल देशभरात प्रसिद्ध आहे. सैनिकी शिक्षण म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर नाशिकची धर्मवीर डॉ. बा. शि. मुंजे यांनी स्थापन केलेली `सीएचएमईएस`संस्था. अशी संस्था स्थापन करण्याचा ध्यास घेतल्यावर सुरुवातीच्या काळात डॉ. मुंजे यांनी जर्मनी, इटली इत्यादी देशातील सैनिकी शाळांना भेटी दिल्या. १९३६ मध्ये वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी नाशिकला भोसला मिलिटरी स्कूलची स्थापना केली. यासाठी कराचीपासून देशभर प्रवास करून मदत मिळवली व अत्यंत दूरदृष्टीने १६५ एकरच्या विशाल माळरानावर एक भव्य स्वप्न साकार केले.
अग्रत: चतुरो वेदा: पृष्ठत: सशरं धनु:। इदं ब्राह्मं इदं क्षात्रं शापादपि शरादपि।। हे ब्रिद वाक्य घेऊन सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी यशस्वीपणे कार्यरत आहे. लष्करी शिक्षण, सैनिकीकरण, सैनिकी प्रशिक्षण, सैन्याचे हिंदीकरण, देश स्वसंरक्षणक्षम व्हावा, यासाठी मुंजे यांनी केलेले प्रयत्न विसरता न येण्याजोगे आहेत. डॉ. मुंजेचे सैनिकीकरण हे भारताच्या स्वातंत्र्यासाठी होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील धर्मवीर म्हणून ओळखले जाणारे डॉ. बा. शि. मुंजे हे मूळचे मध्य प्रदेशातील. १२ डिसेंबर १८७२ रोजी बिलासपूर येथे जन्मलेल्या डॉ. मुंजे यांचे शालेय शिक्षण बिलासपूर आणि रायपूर येथे झाले आणि १८९८ मध्ये मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून ते डॉक्टर झाले. १८९९ मध्ये त्यांनी बोअर युद्धातही सहभाग घेतला होता. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरुद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. सैनिकी महाविद्यालयात उमेदवार म्हणून येणाऱ्या हिंदी मुलांचा निभाव ब्रिटिश मुलांच्या चढाओढीने लागण्यासाठी हिंदी मुलांच्या प्राथमिक अभ्यासाची, शरीर कमावण्याची सिद्धता हवी आणि या सिद्धतेसाठी इंग्लंडमधील पब्लिक स्कूल्समधून तेथील मुलांना ज्या प्रकारचे शिक्षण दिले जाते, तसे शिक्षण भारतीय मुलांना मिळावे अशी व्यवस्था आवश्यक आहे’, हा विचार डॉ. मुंजे हे सातत्याने मांडत असत.
विधिमंडळाच्या बैठकीत एकदा ते या विषयावर बोलत असताना क्रॉफर्ड यांनी त्यांना टोला लगावला, ‘निजी खर्चा (स्वखर्चीतून) सैनिकी शिक्षण देणारी का काढत नाही? क्राफर्डला विधिमंडळात उत्तर देताना डॉ. मुंजे म्हणाले, ‘इंग्रज शासन हिंदुस्थानात जो पैसा खर्च करते, तो इंग्लंडमधून आणलेला नसतो. तो आमच्याच खिशातला असतो आणि तो आमचा पैसा इंग्रजांसाठी खर्च होतो. तो पैसा आमचा असल्याने आमच्या देशाच्या हितासाठी खर्च व्हावा हे सांगण्याचा अधिकार आम्हाला आहेच. पण क्राफर्डच्या प्रश्नांतून डॉ. मुंजे यांना वेगळी चालना मिळाली आणि त्याचा प्रत्यक्ष परिणाम म्हणजेच स्वखर्चाने डॉ. मुंजे यांनी स्थापलेली ‘दि सेन्ट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी’ आणि त्या सोसायटीने प्रारंभलेली नाशिक येथील ‘भोसला सैनिकी शाळा.’
परदेश दौरा अन् सैनिकी महाविद्यालयांची पाहणी १९३१ मध्ये गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले असताना डॉ. मुंजे गोलमेज परिषदेचे काम आटोपल्यानंतर करत. इंग्लंडमधील सँडस्रटचे सैनिकी महाविद्यालय, बुलविचची रॉयल मिलिटरी अकादमी, क्रम्वेलचे रॉयल एअर फोर्सचे कॅडेट महाविद्यालय पाहून तिथल्या सैनिकी अधिकाऱ्यांशी त्यांनी विस्तृत चर्चा केली व इथे येऊन नाशिकला सैनिकी शाळा उभारली.
आज ‘सीएचएमईएस’ या संस्थेच्या माध्यमातून सलग ८६ वर्षांपासून भारतभरातील विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीत सैनिकी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात येत असते. ‘‘संस्थेच्या स्थापनेच्या वर्षी म्हणजे १९३७ मध्ये पहिले उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबीर नाशिक येथे भरविण्यात आले होते. संस्थापक डॉ. मुंजे यांना सैनिकी शाळा मुलींसाठी सुद्धा सुरू करावयाची होती. मात्र, काही कारणाने ते जुळून आले नाही. पण नंतरच्या काळात मुला-मुलींसाठी हे शिबीर स्वतंत्रपणे भरविले गेले आणि आजही ते यशस्वीपणे सुरू आहे. इथल्या विद्यार्थ्यांना रामदंडी म्हटले जात. रामदंडीच्या अनेक पिढ्या या शिबिरातून आता तयार झाल्या आहेत. आजी, आई, नात अशा पिढ्यांनी शिबिरात सहभाग घेतल्यास समाजात दिसून येत. त्यातून प्रेरणा घेऊन सैन्यात अधिकारी, पोलीस पदावर गेलेल्यांची संख्या सुद्धा मोठी आहे. रामभूमी परिसरात घालवलेले पंधरा दिवस किंवा महिना हा रामदंडींना आयुष्यभराचा ठेवा असतो.
डॉ. मुंजे हे सुरुवातीपासून सशस्र दलातील महिलांच्या सहभागाबाबत आग्रही होते. भोसलाच्या उन्हाळी सैनिकी प्रशिक्षण शिबिरात मुलींचा पहिल्यापासून सहभाग राहिला आहे. आता तर केंद्र शासनानेच सैनिकी शाळा सुरू करण्याची घोषणा केली आहे. संस्थेनेही भोसला मिलिटरी स्कूलबरोबरच मुलींसाठी(गर्ल्स) स्वतंत्र शाळा सुरू केली असून तेथे इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. उन्हाळी, हिवाळी प्रशिक्षण शिबिरात मुलींना घोड्यावर बसणे, जलतरण, फायरिंग हे शिकवले जाते. याशिवाय भोसला इन्स्टिट्यूट ऑफ अँडव्हेंचर अॅण्ड स्पोर्टस् आणि भोसला अँडव्हेंचर फाऊंडेशनसारखे युनिटही यशस्वीपणे कार्यरत आहे.
या परिसरात राममंदिर आहे. ते रामदंडीसाठी स्फूर्ती देणारे ठिकाण आहे, बंदुकीच्या गोळीच्या आवरणापासून रामाची मूर्ती तयार करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रामदंडी असे संबोधले जाते. भोसला मिलिटरी स्कूलने देशाला आतापर्यंत जवळजवळ साडेचारशे ते पाचशे सैनिकी अधिकारी दिले आहेत. लेप्टनंट जनरल(निवृत्त) डॉ. दत्तात्रय शेकटकर हे सध्या संस्थेचे अध्यक्ष आहेत, तर उपाध्यक्ष एअर मार्शल(निवृत्त)अजित भोसले हे संस्थेचे रामदंडीच आहेत. केवळ सैनिकी शिक्षण एवढ्यापुरता मर्यादित हा विषय आता राहिलेला नसून संस्थेचा विविधांगांनी वटवृक्ष विस्तारला आहे. संस्थेत विशिष्ट पूर्ण काम पाहून इतर राज्यातूनही त्यांना प्रशिक्षणासाठी मागणी येत असते. अरुणाचल प्रदेशमधल्या जयरामपूर येथे विवेकानंद केंद्रातर्फे चालवण्यात येणाऱ्या शाळेमध्ये अकरावी-बारावीच्या मुलांसाठी सैनिकी प्रशिक्षण कोर्स सुरू केलेला असून त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदाच्या वर्षापासून मुरुड-जंजिरा हिंदू एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून तेथील शाळेतही संरक्षणाबरोबरच कौशल्य विकासविषयक उपक्रम सुरू करण्यात आले आहे. संस्थेचे जवळपास अठरा युनिट असून शिक्षणात वेगळे प्रयोग करण्यात संस्थेच्या युनिटचा नेहमीच वेगळा प्रयत्न असतो. भोसला मिलिटरी स्कूल, कॉलेज, व्यवस्थापन, नर्सिंगसारख्या युनिटमध्ये काळाबरोबर चालत प्रशिक्षणाच्या पद्धती बदलल्या आहेत.
युद्ध आता केवळ जमिनीवर खेळले जात नाही, तर सायबर तसंच संगणक, ए आयच्या माध्यमातून युद्ध खेळले जात आहे. त्या अानुषंगाने आपल्या प्रशिक्षणामध्ये देखील संस्था, युनिटने बदल केलेला दिसतो. नव्या शैक्षणिक धोरणानुसार विविध नवे अभ्यासक्रम पुढील काळात सुरू होत आहेत. तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकला भेट दिली. त्यावेळेस नाशिक तो भोसला की नाम से जाना जाता है असा आवर्जून उल्लेख आपल्या भाषणात त्यांनी केला होता. त्यामुळे नाशिक आणि भोसला यांचे अतुट नाते याठिकाणी अधोरेखित होते. १६५ एकर परिसरात संस्थेच्या शाळा, महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, सैनिकी शाळा, प्रशिक्षण केंद्र, एसएससी, सीबीएससी मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू आहेत. त्या कार्याविषयी पुढच्या भागात जाणून घेऊया.
joshishibani@yahoo. com