नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आरजी कर कॉलेज आणि रुग्णालयात पोस्ट ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या डॉक्टरवर लैंगिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी कोलकाता उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. देशभरात सुरू असलेल्या आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाने पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित सर्व कागदपत्रे तातडीने सीबीआयकडे सोपवण्यास सांगितले आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आरजी कर हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणी शनिवारी एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती. दरम्यान, याआधी उच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारला या प्रकरणाची केस डायरी दुपारी १ वाजेपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले होते.
सुनावणीदरम्यान, रुग्णालय प्रशासनाने हे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले, त्यावर उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली. रुग्णालय प्रशासनाच्या अनेक त्रुटी असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.