मुंबई: पॅरिस ऑलिम्पिकच्या सांगता सोहळ्यात सामील होणारे भारतीय खेळाडू मंगळवारी स्वदेशी परतत आहेत. पॅरिस ऑलिम्पिक २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पार पडले. भारताने या स्पर्धेत ६ पदके जिंकली. भारताच्या ११७ सदस्यीय दलातील अधिकतर खेळाडू आधीच मायदेशात परतले आहेत.
मंगळवारी मनू भाकर, पीआर श्रीजेशसह काही खेळाडू भारतात परतत आहे. या खेळाडूंनी सांगता सोहळ्यात सहभाग घेतला होता. मनू भाकर आणि श्रीजेश सांगता सोहळ्यात भारताचे ध्वजवाहक होते.
मनू भाकर आणि पीआर श्रीजेश यांच्याशिवाय कुस्तीपटू अमन सेहरावतही १३ ऑगस्टला भारतात परतणार आहे. हॉकी खेळाडू अमित रोहिदास, राजकुमार पाल, अभिषेक, सुखजीत सिंह, संजयही भारतात परतणाऱ्या दलामध्ये सामील आहेत. इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी टी उषाही भारतात परतणाऱ्या भारतीय दलात सामील आहे. विनेश फोगट मंगळवारी परतणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही.
विनेशला रौप्य पदक मिळण्याची आशा
विनेश फोगाटने कुस्तीच्या ५० किलो वजनी गटात फायनलमध्ये पोहोचत कमीत कमी रौप्य पदक पक्के केले होते. मात्र फायनलआधी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. आता विनेशने कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये अपील करत रौप्य पदकाची मागणी केली आहे. या बाबत १३ ऑगस्टला निर्णय येणार आहे.