मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत सतरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘साडे माडे तीन’ (Saade Maade Teen) या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर भरघोस यश मिळवले होते. या चित्रपटातील प्रमुख कलाकार अशोक सराफ, भरत जाधव आणि मकरंद अनासपुरे या कुरळे ब्रदर्सचा त्रिकूट सगळ्यांनाच आवडला होता. त्यामुळे प्रेक्षकांनी या चित्रपटावर भरभरून प्रेम केले होते. या चित्रपटामधूनच मराठी सिनेसृष्टीचा ‘स्टाईल आयकॉन’ असलेला अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Choudhary) याने दिग्दर्शनात पदार्पण केले होते. मात्र आता हा त्रिकूट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ चित्रपटाची सोशल मीडियावरून घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी करणार आहे. यामध्ये अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय या चित्रपटात आणखी कोणते कलाकार झळकणार, हे मात्र अद्यापही समोर आले नाही. स्वाती खोपकर, निनाद बत्तीन यांच्यासह सुधीर कोलते हे चित्रपटाची निर्मिती करत असून छायाचित्रणाची जबाबदारी संजय जाधव करणार आहेत. तर पुढील महिन्यापासून म्हणजेच सप्टेंबरपासून ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’च्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.
दिग्दर्शकाच्या खुर्चीत अंकुशचे कमबॅक
उत्कृष्ट अभिनय आणि लोकप्रियता लाभलेला अंकुश चौधरी गेली तीन दशके प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. उत्तम अभिनेतासह तो कुशल दिग्दर्शकदेखील आहे. दिग्दर्शक मित्र केदार शिंदेला त्याने यापूर्वी अनेक चित्रपटांसाठी दिग्दर्शनात साहाय्यदेखील केले आहे. साडे माडे तीन, झक्कास, नो एंट्री पुढे धोका आहे या चित्रपटांचे दिग्दर्शनदेखील अंकुशने केले आहे. मधल्या काळात तो दिग्दर्शकाच्या खुर्चीपासून लांबच होता. परंतु त्यानंतर आता दिग्दर्शकाच्या खुर्चीत अंकुशने पुन्हा पदार्पण केले आहे.
काय म्हणाला अंकुश चौधरी?
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी याने सांगितले की, ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ची घोषणा करताना खूप आनंद होत आहे. एखाद्या चित्रपटाचा दुसरा भाग येणे, हे खरंच खूपच जबाबदारीचे काम असते. प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढतात. मला खात्री आहे, ‘साडे माडे तीन’वर जसे प्रेक्षकांनी प्रेम केले, तसेच या चित्रपटावरही करतील. या भागात कुरळे ब्रदर्सची धमाल डबल झाली आहे. यात आता ते काय करणार हे प्रेक्षकांना लवकरच कळणार असल्याचे अंकुश चौधरीने सांगितले.