नवी दिल्ली : बांगलादेशात सध्या गृहयुद्ध भडकले आहे. अनेक बांगलादेशी नागरिक भारताच्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day) दिल्लीत हायअलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
दिल्लीच्या पोलीस मुख्यालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधील परिस्थिती बघता दिल्ली एनसीआरमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बैठकीत चर्चा झाली. यानंतर दिल्ली पोलिसांना अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश देण्यात आले.
स्पेशल सेल, क्राईम ब्रान्च आणि जिल्हा पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. यावेळी पोलीस आयुक्तांनी दिल्लीत राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची यादी बनवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या बांगलादेशी नागरिकांची स्वतंत्र यादी बनवण्याच्या सूचनाही यावेळी दिल्या. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि हरयाणा राज्याचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.