Monday, March 24, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वविस्तार उद्योगांचा, विक्रम परताव्यांचा...

विस्तार उद्योगांचा, विक्रम परताव्यांचा…

एकिकडे उद्योग क्षेत्रातील विस्तार योजना सातत्याने पाहायला मिळत असताना प्रशासनही व्यस्त आहे. टाटा समूहाच्या हजारो रोजगार देऊ शकणाऱ्या दोन सेमीकंडक्टर प्रकल्पांचे काम वेगात सुरू झाले. त्याचवेळी ७.२८ कोटी लोकांनी प्राप्तिकर परतावे दाखल केले. याच सुमारास महिलांची बचत योजना निरोप घेण्याच्या तयारीत दिसली, तर स्वित्झर्लंडमध्ये दर सातांमध्ये एक करोडपती असल्याची भुवया उंचावणारी माहिती पुढे आली.

अर्थनगरीतून… महेश देशपांडे

आर्थिक घडामोडींचे जाणकार

उद्योगक्षेत्र तसेच प्रशासन सध्या व्यस्त दिसत आहे. नवनवे प्रकल्प, योजना यामुळे उद्योगक्षेत्रामध्ये वेगवान ‘हलचल’ पाहायला मिळत असताना प्राप्तिकर परताव्यांच्या कामामध्ये प्रशासन धावपळ करताना दिसले. म्हणूनच एकिकडे टाटा समूहाच्या हजारो रोजगार देऊ शकणाऱ्या दोन सेमीकंडक्टर प्रकल्पांचे काम वेगात सुरू असताना ७.२८ कोटी लोकांनी प्राप्तिकर परतावे दाखल केले. याच सुमारास महिलांची बचत योजना निरोप घेण्याच्या तयारीत दिसली. दरम्यान, स्वित्झर्लंडमध्ये दर सातांमध्ये एक करोडपती असल्याची भुवया उंचावणारी माहिती पुढे आली.

टाटा समूहाने आसाममध्ये २७ हजार कोटी रुपयांच्या अर्धसंवाहक (सेमीकंडक्टर) असेंब्ली आणि चाचणी सुविधेचे बांधकाम सुरू केले आहे. हा सेमीकंडक्टर प्लांट दररोज ४.८३ कोटी सेमीकंडक्टर चिप्स तयार करेल. २०२५ पर्यंत तो कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. येथे उत्पादित चिप्स इलेक्ट्रिक वाहने, दळणवळण आणि नेटवर्क पायाभूत सुविधांसह इतर क्षेत्रांमध्ये वापरल्या जातील. या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मान्यता दिली. हा प्रकल्प भारताच्या सेमीकंडक्टर मिशनचा एक भाग आहे. या प्रकल्पामुळे १५ हजार प्रत्यक्ष आणि १२ हजार अप्रत्यक्ष रोजगार मिळणार आहेत. ‘टाटा सन्स’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की, या प्रकल्पामुळे २७ हजार नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि चंद्रशेखरन यांनी आसाममधील जागी रोड येथे सेमीकंडक्टर प्लांटचे भूमिपूजन केले. टाटा दोन सेमीकंडक्टर प्लांट बांधत आहे, एक गुजरातमध्ये तर दुसरा आसाममध्ये. १३ मार्च रोजी मोदी यांनी तीन सेमीकंडक्टर प्रकल्पांची पायाभरणी केली होती. एक प्लांट गुजरातमधील धोलेरा तर दुसरा आसाममधील जागी रोड येथे बांधला जात आहे. २०२१ मध्ये भारतीय सेमीकंडक्टर बाजाराचे मूल्य २७.२ अब्ज डॉलर होते. २०२६ पर्यंत ते वार्षिक १९ टक्के दराने ६४ अब्ज डॉलरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे.

‘सेमीकंडक्टर इंडस्ट्री असोसिएशन’च्या मते जागतिक चिप फॅब्रिकेशन क्षमतेपैकी तैवानचा वाटा ६० टक्के वाटा आहे. चिप सिलिकॉनपासून बनवली जाते. ती एखाद्या गॅझेटच्या मेंदूसारखी असते. सेमीकंडक्टर चिप्स सिलिकॉनच्या बनलेल्या असतात, जे सर्किटमध्ये वीज नियंत्रित करण्याचे काम करतात. कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण त्याशिवाय अपूर्ण असते. कॉम्प्युटर, लॅपटॉप, कार, वॉशग मशीन, एटीएम, हॉस्पिटल मशिन्स आणि अगदी स्मार्टफोन्स सेमीकंडक्टर चिप्सवर काम करतात. त्यामुळेच या उद्योगाकडे अनेक देशही लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, प्राप्तिकर विभागाने ३१ जुलैच्या अंतिम मुदतीपर्यंत विक्रमी ७.२८ कोटींपेक्षा जास्त प्राप्तिकर परतावे स्वीकारले. गेल्या वर्षी ६.७७ कोटी प्राप्तिकर परतावे दाखल करण्यात आले होते. जुन्या करप्रणालीमध्ये भरलेल्या परताव्यांची संख्या २.०१ कोटी आहे. सुमारे ७२ टक्के करदात्यांनी नवी करप्रणाली निवडली आहे, तर २८ टक्के करदात्यांनी जुन्या करप्रणालीमध्ये परतावे भरले आहेत.

पगारदार करदाते आणि इतर गैर-कर ऑडिट प्रकरणांसाठी प्राप्तिकर परतावे दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२४ होती. या मुदतीच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ३१ जुलै रोजी ६९.९२ लाखांहून अधिक प्राप्तिकर परतावे भरले गेले. यंदा पहिल्यांदाच भरलेल्या परताव्यांची संख्या ५८.५७ लाख होती. हे एक चांगले लक्षण मानले जात आहे.

यंदा प्रथमच १ एप्रिल २०२४ रोजी विभागाच्या ई-फायलग पोर्टलवर परताव्यासंदर्भातील तपशील अपलोड करण्यात आला. ऑनलाइन आयटीआर वापरून काही परतावे दाखल केले गेले आहेत तर उर्वरित परतावे ऑफलाइन आयटीआर वापरून दाखल केले गेले आहेत. या काळात ई-फायलग पोर्टलने शेवटच्या क्षणी रिटर्न फाइल करणाऱ्यांची प्रचंड गर्दी यशस्वीपणे हाताळली. यामुळे आयटीआर भरताना करदात्यांना त्रास झाला नाही. ३१ जुलै २०२४ रोजी यशस्वी लॉगिन ३.२ कोटी इतके होते. कोणताही परतावा जारी करायचा असल्यास तसेच आयटीआरची प्रक्रिया सुरू करण्यासाठी ई-व्हेरिफिकेशनची प्रक्रिया महत्त्वाची आहे. ६.२१ कोटींपेक्षा जास्त आयटीआर ई-सत्यापित केले गेले आहेत. त्यापैकी ५.८१ कोटीपेक्षा जास्त आधार-आधारित ओटीपी (९३.५६ टक्के) द्वारे सत्यापित केले गेले आहेत. ई-फायलग सपोर्ट टीमने ३१ जुलैपर्यंत करदात्यांच्या अंदाजे १०.६४ लाख प्रश्नांना संबोधित केले आणि योग्य साह्य प्रदान केले. याच सुमारास एक लक्षवेधी बातमी समोर आली. गेल्या वर्षी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामधून महिलांसाठी विशेष बचत योजना आणली होती. या योजनेत महिलांना सामान्यपेक्षा जास्त म्हणजेच चांगला परतावा दिला जात होता. आता सरकारकडून ही योजना बंद होण्याची शक्यता आहे. २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी सुरू केलेल्या विशेष बचत योजनेचे नाव ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजना असे आहे. सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’अंतर्गत दोन वर्षांसाठी ती सुरू करण्यात आली होती. अशा परिस्थितीत सरकार मार्च २०२५ नंतर ही योजना पुढे नेण्याची शक्यता नाही. ‘महिला सन्मान बचत प्रमाणपत्र’ योजनेमध्ये महिलांना इतर अल्पबचत योजनांच्या तुलनेत चांगला परतावा मिळतो. या योजनेवर सरकार ७.५ टक्के इतके आकर्षक व्याज देते. या योजनेचा लाभ फक्त एक महिला किंवा मुलगी घेऊ शकते. त्यात दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम दोन वर्षांसाठी ठेवली जाते. ही योजना फक्त एप्रिल २०२३ ते मार्च २०२५ पर्यंत वैध आहे.

सध्या तरी ती पुढे नेण्याबाबत सरकारकडून कोणतेही संकेत मिळालेले नाहीत. सरकार ही योजना बंद करू शकते. गेल्या काही वर्षांमध्ये महिला सन्मान बचत प्रमाणपत्र, सुकन्या समृद्धी योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे; आता एक लक्षवेधी बातमी. युरोपमधील स्वित्झर्लंड हा जगातील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे.

दर वर्षी जगभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ असण्यासोबतच स्वित्झर्लंडची आणखी एक खास ओळख आहे. येथे मोठ्या संख्येने करोडपती राहतात. येथील प्रत्येक सातवी व्यक्ती करोडपती आहे. समोर आलेल्या माहितीनुसार स्वित्झर्लंडमधील प्रत्येक सातवी प्रौढ व्यक्ती करोडपती आहे. हे प्रमाण अमेरिकेच्या पाचपट अधिक आहे. काही चांगल्या आर्थिक पद्धतींमुळे येथील लोक करोडपती झाले आहेत. अमेरिकेसारख्या देशात तरुणांमध्ये स्वत:चे घर घेण्याचा ट्रेंड वाढत आहे. अमेरिकेतील ६५ टक्के प्रौढ लोकसंख्येकडे स्वतःचे घर आहे. स्वित्झर्लंडमध्ये मात्र हे प्रमाण ४१ टक्के आहे. या देशात लोक घर खरेदीसाठी मोठी गुंतवणूक करण्याऐवजी विविध संपत्ती योजनांमध्ये पैसे गुंतवण्यास प्राधान्य देतात. सामान्यतः कुटुंबे मासिक खर्चानंतर वाचवलेली रक्कम बचत म्हणून ठेवतात.

स्वित्झर्लंडमध्ये लोक प्रामुख्याने शिक्षणावर खर्च करतात. येथे लोक केवळ पदवी मिळवण्याकडेच नव्हे, तर कौशल्ये विकसित करण्याकडे अधिक लक्ष देतात. एक स्विस व्यक्ती आपल्या वार्षिक उत्पन्नाच्या सरासरी पाच ते दहा टक्के वैयक्तिक विकासासाठी खर्च करते. त्याचा परिणाम त्याच्या कामावर, परिणामी पगारावर दिसून येतो. स्विस व्यक्ती गुंतवणुकीसाठी विशिष्ट धोरण स्वीकारून वेगवेगळ्या बँकांमध्ये गुंतवणूक करतात. त्याला स्थानिक बँका तसेच आंतरराष्ट्रीय बँकांमार्फत परकीय चलनात गुंतवणूक करायला आवडते. याशिवाय, गुंतवणूक करताना स्विस लोक दीर्घकालीन परतावा असलेल्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -