नवी दिल्ली : माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांना २१ ऑगस्टपर्यंत अटक करु नये, असे निर्देश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिल्ली पोलिसांना दिले. यूपीएससीकडे केलेल्या अर्जात चुकीची आणि खोटी माहिती दिल्याचा आरोप पूजा खेडकर यांच्यावर आहे. या प्रकरणी आता पुढील सुनावणी २१ ऑगस्टला होणार आहे.
माजी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. दिल्लीतील पटियाला हाऊस न्यायालयाने खेडकरला जामीन देण्यास नकार दिला होता. या निर्णयाविरोधात खेडकरने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. खेडकर यांची बाजू ज्येष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा, तर नरेश कौशिक यांनी यूपीएससीच्या वतीने युक्तीवाद केला. या युक्तीवादानंतर न्यायमूर्ती सुब्रमोनियम प्रसाद म्हणाले, आत्तापर्यंत मला तिच्या तात्काळ कोठडीची आवश्यकता आहे असे वाटत नाही.न्यायालयाने खेडकर यांना सध्या सुरू असलेल्या तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात यूपीएससीला पक्षकार बनवून, तिने तिच्या अंतरिम जामीन अर्जावर आयोग आणि दिल्ली पोलिसांना नोटिसा बजावल्या आहेत.
दरम्यान, पूजा खेडकरला युपीएससी फसवणूक प्रकरणी १ ऑगस्ट रोजी पटियाला हाऊस न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारला होता. त्यानंतर तिने या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ८ ऑगस्ट रोजी दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती.