पाटणा: बिहारच्या जहानाबाद-मखदुमपूर येथील सिद्धेश्वर मंदिरात सोमवारी सकाळी चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत सात जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
श्रावण महिन्यातील सोमवार असल्याने या ठिकाणी मोठ्या संख्येने भक्तगण जमले होते. मंदिरात भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार श्रावणातील तिसऱ्या सोमवारनिमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी शिवलिंगावर जलाभिषेक करण्यासाठी आले होते. यावेळी प्रचंड गर्दी असल्याने चेंगराचेंगरी झाली. रांगेत उभ्या असलेल्या भक्तांमध्ये धक्काबुक्कीमुळे रेलिंग तुटली आणि हा अपघात झाला.
चेंगराचेंगरी झाल्याची सूचना मिळताच ड्रिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट आणि पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवली जात आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण जखमी झालेत.
याआधी २ जुलैला उत्तर प्रदेश येथील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल १२० जणांचा मृत्यू झाला होता. ही चेंगराचेंगरी बाबा नारायण हरी यांच्या कार्यक्रमादरम्यान झाली होती.