संपूर्ण थरार कॅमेरात कैद; तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी घेतले ताब्यात
गोवंडी : मुंबईच्या गोवंडी (Govandi) परिसरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गोवंडीत एका अठरा वर्षाच्या तरुणाची भररस्त्यात निर्घृण (Murder Case) हत्या केल्याची घटना घडली आहे. आरोपी आणि मृत तरूण यांच्यात किरकोळ वाद सुरु होते. मात्र या वादाचे रुपांतर थेट हाणामारीत झाल्यामुळे तरुणाला जीव गमवावा लागला. सदर प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मोहम्मद सईद पठाण (१८) हा गोवंडीच्या शिवाजीनगरमध्ये कुटुंबीयांसोबत राहतो. तसेच हत्या प्रकरणातील आरोपी देखील याच परिसरात राहतात. हे सर्व एकमेकांच्या ओळखीचे आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरु होते. मात्र त्या वादाला पूर्णविराम द्यावा असे आरोपींनी ठरवले. मोहम्मद हा शिवाजीनगर परिसरातून जात होता. त्यावेळी ३ अल्पवयीन मुलांनी (आरोपी) त्याला गाठले. आरोपींनी धारदार शस्त्राचा वापर करुन मोहम्मदच्या पाठीवर आणि कंबरेवर वार केले. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या अहमदला तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दरम्यान, या हत्येचे सर्व थरार मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्यात आले आहेत. तसेच मोहम्मदच्या मृत्यूनंतर शिवाजीनगर पोलिसांनी हत्या केल्याप्रकरणी ३ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या तिन्ही मुलांना बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे. मात्र या घटनेतील प्रमुख आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा कसून तपास करत आहेत.