हिंदू धर्मात श्रावण (Sharavan 2024) महिना हा पवित्र महिना मानला जातो. तसेच श्रावण महिन्यातील सोमवार (Shravani Somvar) हा विशेष मानला जातो. श्रावण महिन्यातील सोमवार हा शुभ दिवस असून भक्ताने या दिवशी मनोभावे महादेवाची पूजा केली तर भगवान शिव त्याच्या मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते. ५ ऑगस्टपासून या श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून उद्या म्हणजेच १२ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी सोमवार असणार आहे. या दिवशी शुभ संयोग जुळून आला आहे. जाणून घ्या कोणता आहे शुभसंयोग आणि या दिवशी कोणती शिवमूठ वाहावी याची माहिती.
ज्योतिषशास्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लक्ष्मी नारायण आणि शश राजयोगाचा संयोग जुळून आला आहे. या दिवशी महादेवाची पूजा करुन जलाभिषेक आणि रुद्राभिषेक केला जातो. तसेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवमूठ म्हणून तीळ वाहण्याची परंपरा असते.
दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपिंडीचे पूजन कसे करावे?
स्नान करुन स्वच्छ कपडे घालून व्रताचा संकल्प करावा. यानंतर शिवाचे ध्यान करुन ‘ॐ नमः शिवायै’ या मंत्राचा जप करावा. महादेवाला पांढरा रंग प्रिय असल्यामुळे दुसऱ्या श्रावणी सोमवारी पांढऱ्या वस्तू अर्पण केल्या जातात. यामध्ये शिवमूठ म्हणून तीळ वाहिले जाते. तसेच दिवसभर उपवास करावा.