मंगळागौरीची कहाणी

Share

तेजल नेने-मोरजकर

आटपाट नगर होते. तिथे एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असे म्हणून तो चालता होई. ही गोष्ट तिने नवऱ्याला सांगितली. त्याने तिला युक्ती सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणताच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बुवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूल-बाळ होणार नाही असा शाप दिला. तिने त्याचे पाय धरले. बुवांनी उःशाप दिला. बुवा म्हणाले, “आपल्या नवऱ्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळी वस्त्रे परिधान कर. रानात जा. जिथे घोडा अडेल तिथे खण. देवीचे देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असे बोलून बुवा निघाले. तिने आपल्या पतीला सांगितले.

वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथे खणलं. देवीचे देऊळ लागले. सुवर्णाचे देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आत देवीची मूर्ती आहे. मनोभावे पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरदार आहे, गुरढोरे आहेत. धन द्रव्य आहे; पोटी पुत्र नाही, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचे सुख नाही, मी प्रसन्न झाले आहे तर तुला वर देते. अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तेे मागून घे.” त्याने अल्पायुषी पुत्र मागितला. देवीने “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथे एक गणपती आहे. त्याच्यामागे आंब्याचे झाड आहे. गणपतीच्या तोंडावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असे सांगितले. नंतर देवी अदृश्य झाली. वाणी देवळामागे गेला, गणपतीच्या तोंडावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरी नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहू लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असे चार पाच वेळा झाले. गणपतीला त्रास झाला. त्याने सांगितले, “तुझ्या नशिबी एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातले, ती गरोदर राहिली.

दिवसमासा गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढू लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली. काशीयात्रेशिवाय लग्न करणे नाही असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविले. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जाता जाता काय झाले? वाटेने एक नगर लागले. तिथे काही मुली खेळत होत्या. त्यात एकमेकींचे भांडण लागले. तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचे व्रत करते. हे भाषण मामाने ऐकले. त्याच्या मनांत आले हिच्याशी भाच्याचे लगीन करावे, म्हणजे हा दीर्घायुषी होईल; परंतु हे घडणार कसे? त्याच दिवशी तिथे त्यांनी मुक्काम केला. इकडे काय झाले? त्याच दिवशी त्या मुलीचे लग्न होते. लग्नाच्या वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आई-बापांना पंचाईत पडली.

उभयतांना गौरीहरापाशी निजवले. दोघे झोपी गेली. मुलीला देवीने दृष्टांत दिला. “अगं अगं मुली, तुझ्या नवऱ्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरिता दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प कऱ्यात शिरेल. अंगावरच्या चोळीने तोंड बांधून टाक. सकाळी उठून आईला ते वाण दे.” तिने सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणे घडून आले. काही वेळाने तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणू लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्याने तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बिऱ्याडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसऱ्या दिवशी काय झाले? हिने सकाळी उठून स्नान केले, आपल्या आईला वाण दिले. आई उघडून पाहू लागली, तो आत हार निघाला. आईने कन्येच्या गळ्यात हार घातला. पुढे पहिला वर मंडपात आला. मुलीला बघायला आणले. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाही. मी त्याच्याबरोबर खेळत नाही.” रात्रीची अंगठीची खूण काही पटेना.

इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचे युद्ध झाले. यमदूत पळून गेले. गौर तिथे अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगू लागला, “मला असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झाले. तुझावरचे विघ्न टळले. उद्या आपण घरी जाऊ.” लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितले. “इथे अन्नछत्र आहे तिथे जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाही.” दासींनीं यजमानणीस सांगितले. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्याने घरी नेले. पाय धुताना मुलीने नवऱ्याला ओळखले. नवऱ्याने अंगठी ओळखली. आई-बापांनी विचारले. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांने लाडूंचे ताट दाखवले. सर्वांना आनंद झाला. भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरी आले. सासूने सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळे माझा मुलगा वाचला,” असे म्हणाली. तिने सांगितले. “मला मंगळागौरीचे व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरची सर्व माणसे एकत्र झाली आणि त्या व्रताचे उद्यापन केले.

तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हा आम्हा होवो आणि आपले सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णाने सांगितलेली साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.

Tags: Mangalagaur

Recent Posts

Abhijna Bhave: स्वामींच्या मठात जाताना अभिनेत्रीच्या नवऱ्याला आला वेगळाच अनुभव!

मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…

1 hour ago

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

2 hours ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

2 hours ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

2 hours ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

2 hours ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

2 hours ago