Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजझाले मोकळे आभाळ...

झाले मोकळे आभाळ…

हलकं-फुलकं – राजश्री वटे

मन आभाळ आभाळ…
विरह मिलनाचा खेळ…
सुखदुःखाचा लपंडाव…
शोधीता होई धावपळ…
मन कसं भरून आल्यासारखं वाटतं कधी कधी… भरून आलेल्या आभाळासारखं… त्याचा भार सहन होईनासा वाटतो… असं वाटतं वाहून जाऊ दे सर्व… जे साठलं आहे त्याचा निचरा होऊन जाऊ दे… मोकळं करून टाकावं सगळं… कुणीतरी…

अगदी जवळचं असावं प्रत्येकाला मनात दाटलेलं व्यक्त करता आलं पाहिजे… अशी एक ऐकणारी व्यक्ती नक्कीच प्रत्येकाच्या आयुष्यात असावी… नेहमीचंच हे, असं म्हणत झिडकारणारी नको!!
खूप दिवसांपासून एखादी गोष्ट, घटना सलत राहाते मनात… वेदना देत रहाते…
दुःख पेलत राहण्यापेक्षा हलकं करावं… आपलीही बाजू समजून घेणारं कोणीतरी आहे हा दिलासा फार मोठा आहे… जगण्याची उम्मीद देणारा आहे… पुन्हा आनंद लुटण्यासाठी उभारी देणारा असतो!
कोणी डोळे पुसणारं असलं की वाहणाऱ्या अश्रूनाही अर्थ असतो…
जिथे भावनांना वाव असतो
तिथे आसवांना गांव मिळतो
नाहीतर नुसतंच वाहणं!
साद दिल्यावर पडसाद येत नसेल, तिथे संवाद होणार तरी कसा… शब्दापेक्षा नजर वाचता आली पाहिजे!
या डोळ्यांतील वेदना
कोणीतरी वाचा…
शब्द गोठले इथे
ओठातून फुटेना वाचा!

असं खात्रीशीर समजदारपणा असलेलं कोणी खरंच असतं का… नुसता आवाज ऐकल्यावर त्या आवाजाच्या खोलीवरून, पातळी वरून समोरची व्यक्ती कुठल्या मानसिक अवस्थेत आहे, वरून आनंदी दिसणाऱ्याचं आतून आभाळ भरलेलं आहे हे चेहरा वाचून ओळखणारे अंतर्यामी खरे हितचिंतक!
जेव्हा समोरच्या व्यक्तीला या मनात सलणाऱ्या व्यथेचे भागीदार बनवतो ती तेव्हढीच विश्वासू नक्कीच हवी…
नाही तर…

मन में है विश्वास… हा बाणा असावा… मनावर, भावनावर एवढा जबरदस्त ताबा मिळवता आला पाहिजे की सलणारा तो भार स्वतःलाच पेलता आला पाहिजे, ते सहन करण्याची ताकद ठेवली पाहिजे… त्यासाठी हृदयाच्या तळाशी एक कप्पा असतो प्रत्येकाच्या… त्यात ते ढकलून द्यावं तळाशी… पक्क कुलूप लावावे, चावी फेकून द्यावी अवकाशात दूर कुठेतरी… कधीच तो कप्पा न उघडण्यासाठी… खूप हिम्मत लागते मनाला हे साधण्यासाठी… जमेल का हे… पण जमवलं तर पाहिजेच… मनाच्या खोल डोहातील भवऱ्याच्या गर्तेमध्ये गटांगळ्या न खाता… स्वतः धडपडत किनारा गाठला पाहिजे… भावनांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी केलाच पाहिजे… नेहमी कोणी भेटेलच हे सांगता येत नाही..
आयुष्य ऊन-पावसाचा खेळ खेळतं…

कधी भरतं…
कधी झरतं…
अन् सावरतं…
मनाला मग कळतं…
झाले मोकळे आभाळ!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -