रवींद्र मुळे – अहिल्यानगर
जगात अस्तित्वात असलेल्या, कुणीही नाकारू न शकलेल्या पुरोगामी इस्लामिक चळवळीचा उद्रेक वेळोवेळी सर्वत्र होताना आम्ही बघत असतो. या वृत्तीचा उपयोग अत्यंत खुबीने जगातील काही सत्ता घेत आल्या आहेत. जगातील शांतता अस्थिर ठेवणे यावरच ज्यांचा धंदा अवलंबून आहे असे सगळे देश, व्यापारी यात वेळोवेळी सहभागी होत असतात.
गाझा पट्टी, सीरिया, लिबिया, इराण, इराक, अफगाणिस्तान हे प्रयोग आम्ही गेले अनेक वर्षे बघत आलो आहोत. पाकिस्तानातही हेच प्रयोग झाले आहेत. कुठल्याही विकसनशील देशाला विकसित होण्यापासून रोखायचे असेल तर त्या देशात अंतर्गत अशा शक्ती वाढवा, प्रोत्साहित करा ज्या कारणाने तो देश आतूनच पोकळ होत राहील आणि आमच्यावर अवलंबून राहील हे तथाकथित जागतिक महाशक्तीचे धोरण राहिले आहे.
मग त्या देशातील नेतृत्व एक तर आपल्याला धार्जिणे असेल किंवा इतके अस्थिर आणि परावलंबी असेल की, त्याची ध्येयधोरणे आपल्यालाच ठरवता येतील. हा आणखी एक याच त्यांच्या धोरणाचा भाग.
२०१४ साली भारतात एक स्थिर सरकार स्थापन झाले आणि भारताने कात टाकली. अंतर्गत सुरक्षा प्रस्थापित होऊ लागली. देशविघातक शक्तींचा बंदोबस्त झाला. आर्थिक स्थिरता यायला लागली. शेजारील राष्ट्रांशी संबंध सुरळीत झाल्यावर अन्य देशांशी चांगले संबंध प्रस्थापित झाले. २०१९ ला आणखी स्थिरता भारताच्या क्षितिजावर दिसू लागली. कोरोनावर मात करत भारताने आर्थिक प्रगतीचे नवे उच्चांक प्रस्थापित केले. पंतप्रधान मोदींनी दिलेल्या आत्मनिर्भर भारत मंत्राने संरक्षण ते विज्ञान आणि आरोग्य ते अवकाश सर्वत्र भारत भरारी घेत आहे, असे चित्र निर्माण झाले.
गुलामगिरीच्या खुणा पुसून स्वाभिमानाने देश उभा राहत होता. जम्मू-काश्मीर येथील अतिरेकी चळवळी ते माओवादी शेवटचे उसासे सोडत आहेत, अशी स्थिती दिसू लागली. विकसित भारत हे स्वप्न देशाच्या नेतृत्वाला आणि भारतीयांना खुणावू लागले. जी-२० च्या यशस्वी आयोजन आणि रशिया / युक्रेन युद्धातील भूमिका, रशियाकडून तेलाची खरेदी आणि पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था हे सगळे कुठे तरी अमेरिका, चीन यांना पोटात दुखायला पुरेसे होते. मग अमेरिकेतील जॉर्ज सोरासप्रणीत इकोसिस्टीम आणि चीनप्रणीत डावी विचारसरणी एकत्र आली आणि त्यांच्या भारतीय भाऊबंद मंडळींनी मोदी विरुद्ध मोहीम सुरू केली. शाहीन बाग आंदोलन, शेतकरी आंदोलन या आंदोलनात खलिस्तानी सहित देशातील तमाम मोदी विरोधकांना एकत्र आणून मोदींविरोधी राजकीय आघाडी उभी केली.
२०२४ मधील निवडणुकीत मोदींना पराभूत करण्याचे मनसुबे तर फसले, पण आता पुढे काय? याचा पायलट प्रोजेक्ट म्हणून बांगलादेशातील घडलेली घटना प्रयोग आहे हे लक्षात घ्यावे लागेल. तेथील पाकिस्तानधार्जिणे पुरोगामी मुस्लीम अतिरेकी जमात आणि चिनीधार्जिणे यांना एकत्र आणण्यात सोरास कंपनी यशस्वी झाली आणि मग जे घडले ते आपण आज बघत आहोत. महमद युनूस यांच्या नावावर एकमत होणे यात सगळे मर्म आहे. बांगलादेशातील शेख हसीना सरकार तेथील कट्टर पांथियांना जुमानत नव्हते. भारत आणि बांगला देश यांचे सुरळीत आणि चांगले राजकीय संबंध चीनच्या हितसंबंधांच्या आड येत होते. अमेरिकेला लॉन्चिंग पॅड हवे होते. त्याला शेख हसीना यांनी नकार दिला होता. शेख हसीना यांच्या नेतृत्वात बांगला देश आर्थिक प्रगती करत होता. बांगला देशातील हसीना सरकार संकटात यायलाही कारणे पुरेशी होती. जेथे हिंदू कमी होत गेला तेथे हिंसाचार, दहशतवाद फोफावला हे पुन्हा सिद्ध होत आहे. आजचा बांगलादेश कधी तरी भारताचा अविभाज्य भाग होता. ढाक्याची ढाकेश्वरी देवी हिंदूंचे आराध्य दैवत होते. फाळणीच्या वेळेस २२ टक्के हिंदू असलेल्या या भागात आता ८ टक्के हिंदू शिल्लक राहिले आहेत. दुसऱ्या बाजूने बांगला देशातून घुसखोरी करून सीमावर्ती भागात मुस्लीम लोकसंख्या वाढत आहे. बांगलादेशातील घडामोडीला ही पार्श्वभूमी आहे.
या घडामोडीत नेहमीप्रमाणे बळी ठरला आहे हिंदू समाज. १९२१ साली झालेले खीलापत आंदोलन ते आज बांगलामधील आंदोलन यात बळी ठरतो आहे तो हिंदू समाज! बांगला घटनेने पुरोगामी वृत्तीने हिंदू विरोधी कंड भागवून घेतला आहे. चीन भारताच्या शेजारील राष्ट्रात आपली स्पेस निर्माण करण्यात आणि कुरापती करण्यासाठी श्रीलंकेच्या पाठोपाठ यशस्वी होणार आहे. लोकशाहीचे कैवारी हा अमेरिकन बुरखा टरा टरा फाटला आहे. अफगाणिस्तान पाठोपाठ येथेही लष्कर आणि पुरोगामी वृत्तीच्या आधारावर लोकशाहीने सत्तेवर आलेले सरकार उलथवून विकसनशील देशांना दुबळे ठेवणारी अमेरिकन वृत्ती उघड झाली आहे.
मोदींविरोधी ब्रिगेडमध्ये अलीकडे सामील झालेली उद्धव गँग यात आघाडीवर आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि जियो पॉलिटिक्स यांचे कुठलेही ज्ञान नसलेला संजय बोंब मारत सुटला आहे. मुंबईबाहेर पण काय चालले आहे ते न समजणारी, बारामती हेच साम्राज्य असणारे हप्ते, वसुली गँग बांगलातील घटनेमुळे सत्तांतर होण्याचे दिवास्वप्न बघत आहे. देशाचे काही होऊ द्या आम्हाला सत्तेत बसवा असे योगेंद्र यादव गाजर दाखवत पळवत आहे. पण ते हे विसरत आहेत की, आपली ही वृत्ती पाकिस्तान, चीनसहित सर्व शत्रू राष्ट्राला बलवान करण्यास खतपाणी घालत आहे. आज लोकसभेच्या निवडणुकीत आपण काय चुका करून बसलो हे आता हिंदू समाजाला कळायला सुरुवात झाली असेल. व्यक्तिगत इच्छा, राग, लोभ, महत्त्वाकांक्षा, संस्था अभिनिवेश, यातून जे यश मोदी यांच्या पदरात पडायला हवे होते ते यश आम्ही देऊ शकलो नाही, याचा पश्चाताप आता अनेकांना होत असेल.
येणाऱ्या काळात वफ्फ बोर्ड अधिनियमात ४० सुधारणा येऊ घातलेल्या आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा येण्याची शक्यता आहे. अशा वेळी आंदोलनजीवी तुकडे गँग आंदोलन पेटवणार आहे. मोठ्या प्रमाणावर हिंदू स्थलांतरित होणार आहेत. त्याचा फायदा घेऊन भारतात मुस्लीम घुसखोरी करणार आहेत. अशा वेळी सीएए आणि एनआरसी या कायद्याची अंमलबजावणी करताना ममता बानो काय भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे. अशावेळी जागृत, जागरूक, संघटित हिंदू समाज हेच यावर उत्तर असणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. बांगलादेशातील घटना आम्हाला आत्मबोध आणि शत्रुबोध होण्यास भाग पाडत आहे. मोदींना गुन्हेगार ठरवून निर्भय बनो म्हणणारे आता तोंड बंद करून बसले आहेत.
तेथील छात्र आंदोलन आणि जमात यांना त्या देशातील समंजस लोकांकडून रझाकार संबोधले जाते हे भारतातल्या लिब्रांडूना कधी कळणार? छत्रपती शिवरायांनंतर मुस्लीम समस्या, मानसिकता समजली सावरकर, डॉ. हेडगेवार यानाच! त्यांच्या विचारांची परंपरा जपणारी राजकीय व्यवस्था हेच वर उल्लेख केलेल्या असुरी शक्तीला उत्तर आहे. ही व्यवस्था बळकट करायची असेल तर या महापुरुषांचा विचार समाजात अधिक गतीने प्रस्थापित करावा लागेल. तो जर प्रस्थापित झाला तर सरकार कुठल्याही पक्षाचे आले तरी विचार या महापुरुषांचा असेल. कारण हाच विचार समाज, राष्ट्र, मनुष्य जातीच्या कल्याणाचा असणारा आहे.