Tuesday, March 18, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘प्रियावीण उदास वाटे रात...’

‘प्रियावीण उदास वाटे रात…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

अलीकडचे टीव्हीवरील भपकेबाज समारंभ आणि त्यात होणारे अतिशय सामान्य कलाकारांचे भव्य कौतुक सोहळे पाहिले की, जुन्या अभिजात कलाकारांविषयी फार हुरहूर वाटून जाते. ज्यांनी मायमराठीची मनोभावे सेवा केली, तिला आपल्या सोनेरी शब्दांच्या अलंकारांनी मढवले अशा अनेक श्रेष्ठ कलाकारांना त्यांच्या पात्रतेच्या मानाने १० टक्के सुद्धा सन्मान त्याच्या हयातीत किंवा हयातीनंतरही मिळाला नाही याची रुखरुख मनाला सलत राहते.

भावगीत लेखनाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखे एकेकाळचे नाव म्हणजे स्व. गीतकार मधुकर जोशी! तसे त्यांना ‘राज्य नाट्य पुरस्कार’, ‘स्वरतीर्थ सुधीर फडके स्मृती समिती गौरव’, ‘चतुरंग प्रतिष्ठान’ आदी पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले होते, पण त्यांचे कर्तृत्व यापेक्षा कितीतरी जास्त होते. त्यांनी वैभवशाली अभिजात मराठीचा वापर आपल्या भावगीतात करून ती भाषा घराघरात रूढ केली. ‘गुरुगीत संग्रह’, ‘गुरुगौरव गाथा’, ‘माधवराव पेशव्यांचा काव्यसंग्रह’, ‘मधुशाला’ अशी त्यांची काव्यविषयक पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत. खरे तर त्यांचे मराठी गीतलेखनातील योगदान पाहता त्यांना एखाद्या विद्यापीठाने मानद डॉक्टरेट बहाल करायला हवी होती. त्यात मधुकरजींपेक्षा त्या विद्यापीठाच्या गुणग्राहकतेचाच गौरव झाला असता. याउलट हल्ली अनेक विद्यापीठात कसलाही विधीनिषेध न बाळगता श्रीमंत झालेल्या राजकारणी लोकांना आणि उद्योगपतींना डॉक्टरेट देण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. अशा कुणालाही डॉक्टरेट दिल्याच्या बातम्या वाचल्या की, जेफ्री आर्चरच्या ‘नॉट अ पेनी लेस, नॉट अ पेनी मोअर’ या कादंबरीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.

एकेकाळी भावगीत लेखनात जोशींची लेखणी जणू ध्रुव ताऱ्याप्रमाणे चमकत होती. त्यांनी लिहिलेली, बहुतेक वेळा दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केलेली आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गाणी हे आकाशवाणीच्या लोकप्रियतेचे एक कारण नक्कीच होते. जाणकार रसिकांच्या कित्येक पिढ्यांचे भावविश्व एकेकाळी जोशींच्या रचनांनी व्यापले होते.

उदाहरणादाखल त्यांची अगदी निवडक गाणीच पाहा. सुमन कल्याणपूर यांनी गायलेले ‘आकाश पांघरूनी जग शांत झोपले हे, घेऊन एकतारी गातो कबीर दोहे’, हे गाणे कधीही ऐकले तरी मन शांत करते किंवा ‘जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे, निराधार आभाळाचा तोच भार साहे’ हे भक्तीगीत, किती वेगळी चित्रे डोळ्यांसमोर उभी करून श्रोत्याला भक्तिरसात न्हाऊ घालते. त्यांचे आशाताईंच्या आवाजातले विरहगीत ‘तू दूर दूर तेथे, हुरहूर मात्र येथे.’ आजही रसिकांना मंत्रमुग्ध करते. शिवरायांवर राजमाता जिजाऊंनी केलेल्या उदात्त संस्कारांचे दर्शन घडवणाऱ्या एका प्रसंगाचे रूपांतर मधुकर जोशींनी एका स्फूर्तिदायी गीतात केले होते. दशरथ पुजारींनी स्वत: गायलेले ‘अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती.’ हे गाणे कोणताच मराठी माणूस विसरू शकणार नाही. असेच ‘जात्यामधले दाणे रडती सुपातले हसती, कळे न त्यांना मरण उद्याचे भाळी या अंति.’ हे पुन्हा दशरथ पुजारींनी गायलेले गाणे जुन्या रसिकांना आजही हळवे करून सोडेल.

असेच गायक-संगीतकार गोविंद पोवळे यांनी गायलेले ‘माती सांगे कुंभाराला, पायी मज तुडविशी, तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी.’ तर त्यातील तत्त्वज्ञानिक आशयामुळे जवळजवळ एक भजनच बनून गेले होते. याशिवाय ‘या लाडक्या मुलांनो, तुम्ही मला आधार, नवहिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार’ अशी प्रेरणादायी, एकाहून एक अवीट गोडीची गाणी जोशींच्या लेखणीतून उतरली. त्यांची भावुक, मनस्वी, मधुर, मनाला शांतरसात नेऊन रमवणारी गाणी ऐकली की, एखाद्या जुन्या भव्य वाड्यात जाऊन त्यातल्या सात्त्विक, सौम्य, सज्जन लोकांच्या सहवासात वावरल्यासारखे वाटते. त्यांनी ६० वर्षांच्या कारकि‍र्दीत तब्बल ४००० गीतांच्या रचना केल्या. राजकवी भा. रा. तांबे यांच्यासारखी सरळ, सोपी, सुलभ तरीही आशयगर्भ भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होते.

‘क्षण आला भाग्याचा’, ‘सप्तपदी’ ‘एक धागा सुखाचा’ यासारख्या चित्रपटांसाठी जोशींनी अनेक श्रवणीय गाणी लिहिली. त्यांच्याविषयी एक गंमतीची गोष्ट म्हणजे केंद्र सरकारच्या नोकरीत असताना त्यांचे हे गीतलेखन मुंबईच्या लोकलमधून प्रवास करताना सुरू असायचे.

या कवीची कल्पनाशक्ती अफाट होती. श्रावणात पडणारा रिमझिम पाऊस हा तसा अनेक कवींच्या कल्पनाशक्तीला फुलोरे आणणारा काळ! त्या प्रेमातुर वातावरणात मधुकरजींनी एका विरहगीताची रचना केली. सायंकाळची मनाला अस्वस्थ करणारी कातरवेळ, वरून श्रावणधारा कोसळताहेत आणि दूरदेशी गेलेल्या प्रियकराची वाट पाहणारी विरहिणी स्वत:शीच उदासपणे गुणगुणते आहे-

“झिमझिम झरती श्रावणधारा
धरतीच्या कलशात
प्रियाविण उदास वाटे रात…”
सुमनताईंचा काहीसा उदास अनुनासिक आवाज गाण्यातील आशयाला अनुरूप ठरला होता. जोशींची प्रिया प्रियकराची वाट आतुरतेने पाहते आहे. पण तिला त्याच्या येण्याची खात्री नाही. दीर्घकाळचा एकटेपणा, जीवलगाचा लांबलेला विरह तिला अस्वस्थ करतो आहे. म्हणून स्वत:च्या मनाला दिलासा देण्यासाठी ती उलट वरून बरसणाऱ्या मेघाशीच बोलून
त्याला खात्री देते आहे की, ‘ते आज नक्की येणार आहेत.’

“बरस बरस तू मेघा रिमझिम,
आज यायचे माझे प्रियतम,
आतुरलेले लोचन माझे बघती अंधारात,
प्रियाविण उदास वाटे रात…”
बाहेर अंधार आहे, आत मनाच्या
गाभाऱ्यातही निराशेचा काळोख दाटला आहे, इतका सुंदर ऋतू एकट्यानेच काढण्याची कल्पना मनाला अगदी खिन्न करून टाकते आहे. पण प्रिया मात्र आशेची ज्योत जपण्याचा प्रयत्न करते आहे. ती म्हणते, ‘जसा भुंगा कमळात अडकल्यावर त्याला बाहेर पडावेसे वाटत नाही, तो अगदी जायबंदी होतो, तसाच माझा प्रियकर घरात येताच माझ्या आलिंगनात बद्ध होऊ दे. हे मेघा, तू इतका बरसत राहा की, त्याला पुन्हा परत जाताच येऊ नये.

‘प्रासादी या जिवलग येता,
कमलमिठीमध्ये भृंग भेटता,
बरस असा की प्रिया न जाईल,
माघारी दारात.
प्रियाविण उदास वाटे रात…’
इतका वेळ धरलेला धीर सुटत चालल्यामुळे प्रिया अस्वस्थ होते, निराश होते, शेवटी अगदी शरणांगत होते. सुरुवातीला मेघालाच आपल्या प्रियकराच्या आगमनाबाबत आश्वासित करणारी प्रिया मग आपले दु:ख मोकळेपणाने मांडते. ती मेघाला उद्देशून म्हणते, ‘तू तर वर्षातून काही काळच बरसतोस. पण मी कितीतरी दिवस, किती ऋतू, माझ्या प्रियकराची वाट पाहते आहे. माझे डोळे सतत तुझ्यासारखेच वाहत आहेत. माझ्या अश्रुधारा कधीच्या थांबतच नाहीत.

‘मेघा असशी तू आकाशी,
वर्षातून तू कधी वर्षसी,
वर्षामागून वर्षती नयने,
करती नित बरसात.
प्रियाविण उदास वाटे रात.’
एका काल्पनिक विरहीणीच्या दु:खाने श्रोत्याला अस्वस्थ करायला भाग पाडणे हे काही सदैव केवळ यमक जुळवण्याच्या गडबडीत असणाऱ्या किंवा कवितेचे कोणतेच नियम न पाळता जे लिहिले त्यालाच कविता माना असा आग्रह धारणाऱ्या कवींच्या आवाक्यातले काम नाही. त्यासाठी एक मनस्वी तरीही संयत, सुसंस्कारित तरीही विमुक्त कविमनच हवे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -