दी लेडी बॉस – अर्चना सोंडे
वण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणेशोत्सवाचे. पिढ्यान् पिढ्या मूर्ती साकारणाऱ्या कलाकारांची तरुण पिढी गणेश चित्रशाळांमधून गणरायाची विविध रूपे साकारण्यात मग्न आहेत. त्यात महिला कलाकारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. काही जणी आवड म्हणून तर काही जणी कलेचा जवळीकतेत राहावे म्हणून तर काही जणी पोटाला काम म्हणून गणपती बनविण्याचे काम करीत आहेत. यातील काही जणी अशा आहेत की ज्या चित्रशाळेचा वारस जपावा म्हणून या फिल्डमध्ये स्वतःला सिद्ध करण्यासाठी उतरल्या आहेत. त्यापैकीच एक आहे मूर्तिकार रेश्मा विजय खातू.
२६ जुलै २०१७ मध्ये मूर्तिकार विजय खातू यांचे निधन झाल्यावर त्यांचा वारसा चालवणार कोण हा प्रश्न कलावंत, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे, नामवंत गणेशचित्र शाळांना पडला होता. विजय खातूंना शेवटचा निरोप देण्यासाठी जो जनसमुदाय लोटला होता, तो पाहताना रेश्मा भारावून गेली. आजपर्यंत रेश्माने वडिलांच्या वर लिहून आलेले लेख वाचले होते. काही कामानिमित्ताने तिचे बाबांच्या चित्रशाळेत जाणेही होई. एक मूर्तिकार म्हणून विजय खातूंवर लोकांचे असलेले प्रेम रेश्माने त्या दिवशी पहिल्यांदा पाहिले. त्याच दिवशी तिने ठरवले की बाबांची चित्रशाळा चालवायची. चित्रशाळेच्या माध्यमातून विजय खातूंच्या गणेश मूर्तिकलेचा वारसा जपायचा.
रेश्मा सांगते, मी जाहिरातीच्या क्षेत्रात काम केल्याने “गणपतीच्या मूर्ती घडवणे या क्षेत्राशी माझा तसा काहीच संबंध नाही. मुंबईतील दादर पूर्वेकडील राजा शिवाजी विद्यालय मुलींच्या शाळेतून मराठी माध्यमातून शिकले.
अभ्यासाबरोबरीने चित्रकलेतही मला रस होता. पोदार कॉलेजमधून इयत्ता बारावी झाल्यावर रचना संसदमधून टेक्स्टाईल डिझायनिंग, अॅडव्हर्टायझिंग, फिल्ममेकिंग असे निरनिराळे कोर्स केले. अर्थातच बाबांच्या प्रोत्साहनामुळे ते करता आले. कारण बाबा सतत सांगायचे की, माणसाने कुठली ना कुठली कला जोपासली पाहिजे. फ्रिलान्स कोर्स करीत असताना मुंबई विद्यापीठातून बीकॉमचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
फिल्ममेकिंगचा कोर्स करीत असताना मला सुप्रसिद्ध दिग्दर्शक शेखर सरतांडेल यांचे मार्गदर्शन लाभले. शेखर सरतांडेल सरांमुळे दिग्दर्शनात यावेसे वाटू लागले. शेखर सरांमुळे ‘एक अलबेला’ या मराठी सिनेमाच्या शेवटच्या टप्प्यासाठी काम करण्याची संधी मिळाली. हा तोच सिनेमा जो बॉलिवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांचा जीवनपट. सिनेमात भगवानदादांच्या भूमिकेत अभिनेता मंगेश देसाई आणि गीता बालींच्या भूमिकेत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचे दर्शन घडले. शेखर सर आणि त्यांच्या टीम सोबत सोनी टीव्हीसाठी मराठी मालिकासुद्धा केल्या. जाहिरातीमध्ये पीप होल या प्रॉडक्शन हाऊससाठी जाहिरात फिल्मसाठी मॉडेल मेकिंगचे काम केले. मी करीत असलेले काम आणि बाप्पांच्या मूर्ती यांची तसे पाहायला गेले तर काहीच संबंध नाही; पण बाबांच्या निधनानंतर त्यांच्यावर असलेले लोकांचे प्रेम पाहता ‘शरद आर्ट’ सुरू राहिले पाहिजे. त्यामुळे २७ जुलै २०१७ पासून बाबांच्या चित्रशाळेत जायला सुरुवात केली.
विजय खातूंची चित्रशाळा चालवणे हे रेश्मासाठी एक प्रकारचे आव्हानच होते. रेश्मा सांगते, “बाबा गेल्याच्या दुसऱ्या दिवसापासून शरद आर्टमध्ये जायला सुरुवात केली. बाबांच्या निधनाच्या बातमीने कित्येक मूर्तिकार, मंडळे हळहळली. काही गणेशोत्सव मंडळांनी मला असेही सांगितले की, जशा मूर्ती तयार असतील तशा द्या. आम्ही प्रभावळ वगैरे बाकीचे डेकोरेशन बाहेरून करून घेतो. पण मी नाही म्हटले. कारण मूर्तिकार विजय खातूंच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. बाबांनी बिल बुकवर जशा मूर्तींच्या ऑर्डर्स लिहून घेतल्या होत्या अगदी तशाच पूर्ण करून दिल्या. कुठेच डावे-उजवे झाले नाही. याचे क्रेडिट बाबांची शरद आर्टची टीम, त्यांच्याकडे शिकायला आलेल्या प्रत्येकावर त्यांनी केलेले संस्कार यांना जात. २०१७ मध्ये आम्ही देवीसुद्धा पूर्ण करून दिल्या. २०१८ आणि २०१९ वर्षसुद्धा चांगले गेले. भाद्रपद गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, माघी गणेशोत्सवमध्ये ऑर्डर्सप्रमाणे मूर्ती दिल्या. २०२० मध्ये कोरोनाच्या साथीमुळे संपूर्ण जगाने अनुभवलेल्या मंदीच्या लाटेची झळ गणेश चित्रशाळांनाही बसली. २०२२ मध्ये विजय खातूंच्या शरद आर्टचे काही मूर्तिकार सोडून गेले. आमच्या प्रतिस्पर्धी चित्रशाळांनी जास्त मोबदला देऊन त्यांना फोडले. मंडळे कमी झाली. आयत्या वेळेस मूर्तिकार आणायचे कुठून असा माझ्यासमोर यक्षप्रश्नच होता. राजकारण कुठल्या क्षेत्रात नाहीये, असे म्हणत मी माझ्या मनाची समजूत घालून घातली.”
ज्याचे कुणी नसते त्याच्यासाठी आणि त्याच्यापाठी बाप्पा असतो. याची प्रचिती त्यावेळेस रेश्माला आली. रेश्मा सांगते, “२०२२ हे वर्ष माझ्यासाठी खऱ्या अर्थाने आव्हानात्मक ठरले. अचानक मूर्तिकार सोडून गेले. मूर्तीच्या ऑर्डर्स कमी झाल्या. त्यामुळे कारखाना मुंबईतील भायखळा परिसरातील बकरी अड्डा येथे हलवला. शेवटी भाडेसुद्धा भरणे परवडले पाहिजे. त्याच वेळेस बाबांच्या सोबत २५ वर्षं गणपती बनविणारे अनिल सोनी यांची मदत झाली. बाबांनी त्यांना मूर्तीचे कॉन्ट्रॅक्टिंग कसे करायचे हे शिकवले होते. अनिल सोनींनी त्यांचा भाऊ रणजीत सोनींना शिकवले. सोनी बंधूंनी मला शिकवले. मूर्तिकारांची नवी टीम उभी करून शरद आर्टचे रूपांतर विजय खातू आर्ट्समध्ये केले. नव्या संचात खातू आर्टची सुरुवात करताना ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’, ‘ताडदेवचा राजा, भायखळा’, ‘उपनगरचा महाराजा, बोरिवली’, वसईचा राजा या मंडळांनी विजय खातूंच्या चित्रशाळेत गणपती घडविण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे.
चिंचपोकळीचा ‘चिंतामणी’ आणि विजय खातूंच्या चित्रशाळेचे अनोखे बंध आहेत. रेश्मा सांगते, “चिंचपोकळी दक्षिण विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाबा सर्वात जुने मूर्तिकार. बाबांच्या नंतरही ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ने खातूंच्या चित्रशाळेतून घडणे सोडलेले नाही. या मंडळाकडून मला घरच्यासारखी ट्रिटमेंट मिळते. मीसुद्धा तितक्याच आत्मीयतेने चिंतामणी घडविते. मला वाटते की, मी माझ्या बाबांच्या कलेला घडवीत आहे. गेल्या वर्षी रामावतारातील चिंतामणीची मूर्ती घडविली. यंदा तर कित्येक चित्रशाळेत रामावतारातील चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या छोट्या छोट्या प्रतिकृती घडविल्या जात आहेत. हे माझे नाही तर बाबांच्या साधनेचे आणि चिंचपोकळीचा चिंतामणी गणेशोत्सव मंडळाने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाचे यश आहे.” यंदा १० मूर्ती घडविण्याचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहे. २ वर्षांपूवी तयार केलेल्या नव्या संचासोबत काम करीत आहे. खातू आर्ट्सचे जुने कलाकार पुन्हा येऊ पाहत आहेत. मूर्तीचे कॉन्ट्रॅक्ट वाढल्यावर त्यांना नक्की चित्रशाळेत स्थान मिळणार.
चित्रशाळेच्या व्यवस्थापनाची धुरा वाहण्यात व्यग्र असल्यामुळे रेशमाचे अॅडव्हर्टायझिंग, फिल्ममेकिंगचे काम मागे पडत आहे. रेश्मा सांगते, “चित्रशाळेचा व्यवसाय हा हंगामी नाही, तर वर्षभराचा आहे. मंडळांमधून गणपती विराजमान होण्याच्या शेवटच्या दिवसांत नवरात्रोत्सवासाठी देवीच्या मूर्ती घडविण्याची सुरुवात होते. मग माघी गणेशोत्सवाच्या कामाला सुरुवात करतो. त्यानंतर पुन्हा भाद्रपद गणेशोत्सवाच्या मूर्तीच्या कामास सुरुवात होते. खातू आर्ट्सचे अर्थकारण माझा भाऊ रोहित खातू सांभाळतो. मुलगा धनराज जव्हेरीला आई विनया खातू सांभाळते. नवरा यशेष जव्हेरी आणि सासरच्यांच्या पाठबळामुळे खातू चित्रशाळेचे काम पूर्णपणे सांभाळणे शक्य होते. एकदा का चित्रशाळेची घडी नीट बसली की, पुन्हा वेळात वेळ काढून अॅडव्हर्टायझिंग, फिल्ममेकिंगच्या कामाला सुरुवात करायची आहे.”
असे म्हणतात की, देव माणसाला निर्माण करतो. पण गणेशोत्सव, नवरात्रोत्सवामुळे माणूस देवाला घडवण्याच्या परंपरेचे आपण सर्वच साक्षीदार आहोत. या परंपरेत मूर्तिकार विजय खातू यांचे नाव अतिशय आदराने घेतले जात आहे. विजय खातूंचा देव घडविण्याचा वारसा रेश्मा अतिशय प्रामाणिकपणे सांभाळत आहे. याच कारणामुळे ती खऱ्या अर्थाने लेडी बॉस
ठरली आहे.