श्रावण आला ग वनी, श्रावण आला !
दरवळे गंध मधुर ओला
एकलीच मी उभी अंगणी
उगीच कुणाला आणित स्मरणी
चार दिशांनी जमल्या तोवर गगनी घनमाला
बरसू लागल्या रिमझिम धारा
वारा फुलवी मोर पिसारा
हलू लागली झाडेवेली, नाच सुरू जाहला
उरात नवख्या भरे शिरशिरी
शीर शीर करी नृत्य शरीरी
सूर कुठून ये मल्हाराचा, पदर कुणी धरिला
समीप कुणी आले, झुकले
किती धिटावा, ओठ टेकले
मृदुंग की ती वीज वाजते, भास तरी कसला
गीत – ग. दि. माडगूळकर
गायक – आशा भोसले
हसरा नाचरा जरा…
हसरा नाचरा जरासा लाजरा
सुंदर साजिरा श्रवण आला
तांबूस कोमल टाकीत
भिजल्या मातीत श्रावण आला
मेघात लावित सोनेरी निशाणे
आकाशवाटेने श्रावण आला
लपत छपत हिरव्या रानात
केशर शिंपीत श्रवण आला
इंद्रधनुष्याच्या बांधीत कमानी
संध्येच्या गगनी श्रावण आला
लपे ढगामागे धावे माळावर
असा खेळकर श्रावण आला
सृष्टीत सुखाची करत
आनंदाचा धनी श्रावण आला