विशेष – भालचंद्र ठोंबरे
पुराणानुसार ब्रह्मदेवाचे सात ते नऊ मानसपुत्र असल्याचे मानले जाते. त्यापैकी एक कश्यप नावाचे पुत्र होते. कश्यप हे ऋषी असून सप्तऋषीमधील एक महत्त्वाचे ऋषी व पौराणिक ॠषींमध्ये श्रेष्ठ मानले जातात. त्यांनी दक्षाच्या १७ मुलींशी विवाह केला होता. त्यापैकी कद्रू व विनता याही होत्या. एकदा कष्यपांनी प्रसन्न होऊन दोघींनाही मनाजोगता वर मागण्यास सांगितले. कद्रूने पराक्रमी हजार नागपुत्राचे वरदान मागितले, तर विनताने दोनच पण पराक्रमी पुत्र मागितले.
कालांतराने कद्रूला हजार, तर विनतीला दोन अंडे मिळाले. ५०० वर्षांनंतर कद्रूच्या अंड्यातून हजार नाग उत्पन्न झाले. त्यात शेषनाग, वासुकी, तक्षक व कालिया आदी प्रमुख आहेत. शेषनाग व वासूकी यांचा ओढा धार्मिकतेकडे असल्याने कद्रूपासून दूर झाले. शेषनाग विष्णूचे शय्यासन झाले; परंतु विनताच्या अंड्यातून तोपर्यंत काहीही निघाले नव्हते. दरम्यान दोघींचीही एकदा दूर्वास ॠषींशी भेट झाली असता दूर्वासांनी आपल्या गळ्यातील रूद्राक्षाची माळ विनताला देऊन इंद्रापेक्षाही महापराक्रमी पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद दिला. या प्रसंगाने कद्रूच्या मनात असूया निर्माण झाली. तिने विनतीला अजूनही अंड्यातून उत्पत्ती न झाल्याने अंड्यात जीवच नसावा किंवा असल्यास त्याला बाहेर येण्यास मदतीची गरज असावी, अशा अनेक शंका तिच्या मनात भरविल्या. शंकेच्या आहारी गेलेल्या विनतीने उत्सुकतेपोटी आणि घाईने एक अंडे तोडले. त्यातून कमरेपासून वरचे अंग परिपक्व पण कमरेपासून खालचे अंग अविकसित (लुळे) असलेले एक बालक जन्माला आले. विनताचा उतावळेपणा आपल्या विकलांगतेला कारणीभूत झाल्यामुळे त्या बालकाने विनताची निर्भर्सना करून तिला पाचशे वर्षे कद्रूची दासी बनशील असा शाप दिला. त्याचबरोबर दुसरे अंडे पूर्ण विकसित झाल्यानंतर फोडल्यास त्यातून उत्पन्न होणारा बालक तुझी या दास्यातून मुक्तता करेल असेही सांगितले. असे सांगून तो अपंग बालक सूर्याचा सारथी झाला. अरुण त्याचे नाव. दुसऱ्या अंड्याचा कालावधी पूर्ण होताच त्यातून पराक्रमी गरूड उत्पन्न झाला.
एकदा कद्रू व विनता यांनी इंद्राच्या उच्चैश्रवा या पांढऱ्या शुभ्र घोड्याला पाहिले. त्यांनी घोड्याच्या रंगावरून वाद उत्पन्न केला. विनता म्हणाली, घोड्याचा रंग पूर्णपणे शुभ्र पांढरा आहे, तर कद्रू म्हणाली तो काळा आहे. किंबहुना त्याची शेपटी तरी काळी आहे. या विधानावर पैज लागली आणि जो हरेल तो दुसऱ्याचे दास्यत्व पत्करेल असे ठरले. घोडा पांढरा शुभ्र होता हे दोघींनाही माहिती होते. मात्र कद्रूच्या मनात कपट असल्याने तिने मुद्दामच शेपटीचा रंग काळा सांगितला व आपले म्हणणे सत्य व्हावे यासाठी तिने आपल्या नागांना बोलावून त्यांना घोड्याच्या शेपटीला लपेटवून घ्यायला सांगितले. जेणेकरून दूरून पाहणाऱ्याला शेपूट काळे दिसावे. मात्र काही नागांनी हा अधर्म असून या गोष्टींमध्ये सहभागास नकार दिला. तेव्हा कद्रूने त्यांना शाप देऊन भविष्यात होणाऱ्या एका राजाच्या यज्ञात भस्म होण्याचा शाप दिला. मात्र तक्षक कालिया आदी नागांनी आईला मदत करण्याचे मान्य केले. दुसऱ्या दिवशी ते दोघेही घोडा पाहण्यासाठी गेले तेव्हा शेपटीला नाग लपेटले असल्यामुळे दुरून त्याचा रंग काळा भासत होता. पूर्ण रंग पांढरा; परंतु शेपूट काळी असल्याचे पाहून विनताला आश्चर्यमिश्रित अतिशय दुःख झाले आणि नियमाप्रमाणे तिला कद्रूचे दास्यत्व स्वीकारावे लागले.
कद्रू व तिची मुले विनताला अतिशय त्रास देत असत. आपल्या मुलांना गरुडापासून त्रास होऊ नये या उद्देशाने ती गरुडाच्या विनाशासाठी सतत कारस्थाने करीत असत. मात्र आपल्या पराक्रमाने व सद्गुणांमुळे गरूड त्यावर मात करीत असे. शिवाय एकट्याने असूरांचा पराभव करणे, समूद्र मंथनासाठी एकट्याने मंदार पर्वत उचलून आणणे, विष्णू लक्ष्मीच्या पूनर्मिलनात महत्त्वाची भूमिका बजावणे, वेळप्रसंगी नागांचे रक्षण करणे आदी परोपकारी कामे करून गरुडाने सर्वांचे आशीर्वाद मिळविले. आपल्या मातेला दास्यत्वातून मुक्त करण्यासाठी गरूड प्रयत्नशील होता. गरुडाने अमृत आणून दिल्यास गरूड व विनता दोघांनाही दास्यत्वातून मुक्त करू असे कद्रूने सांगितले. अमृत मिळाल्यास नागांना अमरत्व मिळेल किंवा अमृत आणण्याच्या प्रयत्नात गरुडाचा देवाकडून अंत झाल्यास मुलांचा एक शत्रू नष्ट होईल असा दुहेरी उद्देश कद्रूचा होता.
गरुडाने अमृत आणण्यासाठी स्वर्गाकडे प्रयाण केले व स्वप्रयत्नाने ते इंद्राच्या ताब्यातून पळविले. त्याला विष्णूने अडविले असता आपण मातेच्या मुक्ततेसाठी हे नेत असून त्यासाठी कोणत्याही संकटाशी सामना करण्यास तयार असल्याचे नम्रपणे सांगितले. मातेप्रती गरुडाची भक्ती पाहून विष्णूने त्याला परवानगी दिली. मात्र अमृत मिळाल्यास नागाच्या विषाने पृथ्वीला धोका होईल, हे जाणून गरुडाने अमृत देताच ते पळवून आणण्यास इंद्राला सांगितले.
गरूड अमृत घेऊन कद्रूकडे आला. कद्रूने गरूड व विनताला दास्यत्वातून मुक्त केले व अमृत कलश देण्याची विनंती केली. अमृत पवित्र असल्याने ते थोडे शुचिर्भूत होऊनच प्राशन करावे असे गरुडाने त्यांना सुचविले व तो अमृताचा कलश तेथेच गवतावर ठेवून दिला व आपल्या मातेला घेऊन निघून गेला. स्नान करून अमृत प्राशन करण्याची बाब नागांनाही पटल्याने ते शुचिर्भूत होण्यासाठी गेले असता तेवढ्या कालावधीत इंद्राने तो अमृतकंभ पळविला. स्नानावरून शुचिर्भूत होऊन आल्यानंतर नागांना अमृतकलश दिसला नाही. आपण फसविले गेल्याची जाणीव त्यांना झाली. कदाचित अमृताचा थोडाफार अंश खाली सांडला असेल या आशेने त्यांनी गवत चाटण्यास सुरुवात केली; परंतु त्यामुळे त्यांच्या जीभा चिरल्या गेल्या आणि म्हणूनच त्यांना द्विजमुख असेही म्हटले गेले.
अशाप्रकारे गरुडाने स्वतःसह मातेलाही दास्यत्वातून मुक्त केले. मातेला मुक्त करण्यासाठी गरुडाने घेतलेल्या परिश्रमामुळे श्री विष्णूने त्याचे कौतुक करून नेहमीसाठी आपले वाहन म्हणून स्वीकार केला, तर कद्रूची व सापांची कारस्थानीपणासाठी निंदा केली. तसेच गरुडाला सापांचे भक्षण करशील, असा आशीर्वाद दिला.