मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी
सोलापूर : राज्यात मराठा-ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही सातत्याने जुंपत असल्याचे चित्र आहे. त्यातच आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीला विरोधकांनी दांडी मारली होती. त्यामुळे यामागे शरद पवारांचा हात असल्याचं सातत्याने समोर आलं. यानंतर शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, मात्र त्यानंतरही आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. याचेच पडसाद म्हणून आज शरद पवार बार्शी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी पवारांची गाडी अडवली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी आंदोलकांनी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर शरद पवारांची गाडी अडवल्यानंतर मराठा आंदोलकांकडून ‘एक मराठा, लाख मराठा’ अशी घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांच्या गाडीच्या समोर येऊन काही मराठा आंदोलक घोषणा देत होते. आंदोलकांनी त्यांना मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
काय म्हणाले शरद पवार?
मनसेचे तालुका प्रमुख सागर लोकरे आणि मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली होती. मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केली. आंदोलकांनी गाडी अडवल्यानंतर पवारांनी कारचा दरवाजा उघडला आणि आंदोलकांचे म्हणणे ऐकले. त्यानंतर पवार यावेळी माझा पाठिंबा आहे, असे म्हणाले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा दिल्या.