'हे' असतील पर्यायी मार्ग
पुणे : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळवून देण्यासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आज पुणे शहरात शांतता रॅली (Shantata Rally) निघणार आहे. सोलापूर आणि सांगलीनंतर आज ही फेरी पुण्यात दाखल होणार आहे. त्या निमित्ताने स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान या रॅलीमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्यामुळे पुणे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सारसबाग येथील गणपतीचे दर्शन आणि लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकास अभिवादन केल्यानंतर सकाळी अकरा वाजता शांतता फेरीला सुरुवात होणार आहे. ही शांतता रॅली टिळक रस्त्यावरील पूरम चौक, बाजीराव रस्ता, शनिपार, अप्पा बळवंत चौक, शनिवारवाडा, गाडगीळ पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पूल मार्गावरून जाणार आहे. पुढे ही रॅली एसएसपीएमएस, स. गो. बर्वे चौक (मॉडर्न कॅफे), जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी चौक, जंगली महाराज रस्ता मार्ग डेक्कन जिमखाना भागातील पोहचणार आहे. छत्रपती संभाजी पुतळा येथे रॅलीची सांगता होणार आहे.
यापार्श्वभूमीवर पुणे शहरातील वाहतुकीत अनेक मोठे बदल करण्यात आले आहेत. अनेक रस्त्यांवरील वाहतूक रॅलीदरम्यान बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांना पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
वाहतुकीसाठी कोणते रस्ते बंद ?
एस पी कॉलेज चौक ते पूरम चौक, जेधे चौक, कुमठेकर मार्गावरील शनिपार चौक, लक्ष्मी मार्गावरील बेलबाग चौक, अप्पा बळवंत चौक, मंगला टॉकीज प्रिमिअर गॅरेज मार्ग, शिवाजीनगर न्यायालय, भिडे पूल पुलाची वाडी ते जंगली महाराज रोड आणि खंडोजीबाबा चौक या ठिकाणी वाहतुकीसाठी रस्ते बंद असणार आहेत.
वाहतूक वळवण्यात येणारे प्रमुख चौक
- नवले पूल - वाहतुकीचा आढावा घेऊन नवले पुलाकडून येणारी वाहतूक नवीन बोगद्याकडे वळविण्यात येईल.
- कोंढवा खडीमशीन चौक - जड वाहने कात्रजकडे न सोडता बोपदेव घाटमार्गे जातील.
- कात्रज चौकमार्गे फेरी लक्ष्मीनारायण चित्रपटगृह चौकमार्गे जाणार आहे.
- फेरी मार्गस्थ झाल्यानंतर पाठीमागील वाहतूक पुन्हा खुली करून देण्यात येणार आहे.
या पर्यायी मार्गांचा करा वापर
- छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, राष्ट्रभूषण चौकमार्गे जाणारी वाहने शंकरशेठ रस्त्याने जातील. तर शंकरशेठ रस्त्यावरील ढोले-पाटील चौक ते जेधे चौक भागातून जाणाऱ्या वाहनांनी मार्केट यार्ड किंवा नेहरू रस्त्याने जावे.
- मार्केट यार्ड ते जेधे चौक भागातील वाहनांनी शिवनेरी रस्त्याने वखार महामंडळ चौकातून इच्छितस्थळी जावे.
- पंचमी हॉटेल, शिवदर्शन चौक, गजानन महाराज मंदिरमार्गे वाहनचालकांनी पर्वती गावातून जावे.






