कथा – प्रा. देवबा पाटील
जयश्री ही एक खूप हुशार सुकन्या होती. ती खूप अभ्यासू व चौकस होती. ती तिच्या आईला सतत काही ना काही प्रश्न, शंका विचारत असायची. तिची आईही नेहमी तिच्या सर्व प्रश्नांची समर्पक उत्तरे द्यायची.
‘‘माझ्या एका मैत्रिणीला खूपच गुदगुल्या होत असतात. त्या कशा काय होतात?’’ जयश्रीने एकदा आपल्या आईला प्रश्न केला.
‘‘गुदगुल्या होणे ही एक आपल्या शरीराची प्रतिक्षिप्त क्रिया आहे.’’ आई सांगत असतानाच आईला थांबवत मध्येच जयश्रीने आश्चर्याने विचारले, ‘‘प्रतिक्षिप्त क्रिया? प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय गं आई?’’
‘‘सांगते, माझ्या जिज्ञासू छकुलीला मी सारे काही नीट समजावून सांगते. आई म्हणाली की, “आपल्या मेंदूत पेशी समूहांची विविध केंद्रे असतात. ही विविध केंद्रे शरीरातील चेतातंतूंद्वारे शरीराशी संबंधित निरनिराळ्या क्रिया-प्रक्रियांच्या आदेश संदेशांच्या देवाण-घेवाणीचे कार्य पार पाडत असतात. आपण करीत असलेल्या बहुतांश क्रिया, काही हालचाली या आपल्या मेंदूने त्या त्या अवयवांना दिलेल्या आदेशानुसार होत असतात म्हणजे त्या क्रियांवर, हालचालींवर आपल्या मेंदूचे म्हणजे आपले नियंत्रण असते; परंतु काही क्रियांवर, हालचालींवर आपला ताबा नसतो. काही हालचाली या आपल्या शरीराकडून आपोआप व सतत होत असतात त्यांना ‘अनैच्छिक क्रिया’ म्हणतात, तर आपल्या शरीराकडून घडणाऱ्या काही हालचाली व क्रिया या आपोआप; परंतु अचानक व क्षणार्धात घडून येतात, त्यांना ‘प्रतिक्षिप्त क्रिया’ असे म्हणतात. प्रत्येक प्रतिक्षिप्त क्रिया ही अनैच्छिक क्रियाच असते; परंतु या अनैच्छिक क्रियांहून थोड्याशा वेगळ्या असतात म्हणजे अनैच्छिक क्रिया या आपोआप सतत होत राहतात, तर प्रतिक्षिप्त क्रिया या एकाएकी क्षणात होतात.’’
‘‘मग त्या कशा होतात?’’ जयश्रीने आपली शंका विचारली.
आई पुढे बोलू लागली, “आपल्या शरीराच्या त्वचेच्या खाली निरनिराळ्या मज्जातंतूचे म्हणजे चेतातंतूंचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते. या मज्जातंतूंची टोकं त्वचेला अगदी लागून असतात. हे मज्जातंतू अतिशय सूक्ष्म दोऱ्याप्रमाणे असतात म्हणूनच त्यांना ‘तंतू’ म्हणतात. या मज्जातंतूंच्या समूहाला ‘मज्जासंस्था’ किंवा ‘चेतासंस्था’ असे म्हणतात. आपल्या शरीराकडून एखाद्या उद्दिपनाला मेंदूऐवजी त्या अवयवातील मज्जासंस्थेद्वारा स्वयंचलित प्रतिसाद निर्माण होत असतात. त्या प्रतिक्षिप्त क्रियाच असतात.’’
‘‘बरे मग एखाद्याला गुदगुदल्या कशा होतात?’’ जयश्रीने आपला आधीचा प्रश्न पुन्हा विचारला.
‘‘गुदगुल्या ही तशीच आपला ताबा नसणारी प्रतिक्षिप्त क्रिया आहे. या मज्जातंतूच्या टोकांना निरनिराळ्या गोष्टींची संवेदना होत असते. प्रत्येक मज्जातंतू हे एक विशिष्ट प्रकारचे काम करीत असतो, त्यामुळे प्रत्येक प्रकारच्या संवेदनेसाठी वेगवेगळे मज्जातंतू असतात. काहींना उष्णतेची जाणीव होते, तर काहींना थंडीची जाणीव होते. काहींना वेदना जाणवतात, तर काहींना स्पर्श जाणवतो. स्पर्शाला अतिसंवेदनशील असलेल्या मज्जातंतूंमुळे काहींना गुदगुल्या होतात. काही मज्जातंतू तर इतके संवेदनशील असतात की, केवळ गुदगुल्यांच्या जाणिवेनेच म्हणजे नुसते दुरून बोटही दाखविले, तर ते उद्दिपीत होतात, संवेदित होतात. अशा रीतीने काहींना बोट दाखविल्यानेही पटकन गुदगुदल्या होतात.’’
‘‘अरे व्वा, मज्जातंतूंची ही तर चांगलीच किमया आहे; पण आपण जर आपणासच गुदगुल्या केल्या, तर मग आपणास हसू का येत नाही?’’ जयश्रीने रास्त प्रश्न विचारला.
‘‘आपणाला दुसऱ्या कोणी गुदगुल्या केल्या, तर आपणास खूप खूप हसू येते. ज्याचे मज्जातंतू अतिसंवेदनशील असतात, त्याची तर हसून हसून पुरेवाट होते. समोरचा व्यक्ती आपणास गुदगुल्या करणार, हे आपणास माहीत नसते, ते आपल्या नकळत अनपेक्षितपणे घडत असते म्हणून आपणास हसू येते; परंतु जेव्हा आपण स्वत:च आपणास गुदगुल्या करून घेतो, तेव्हा ते आपणास माहीत असते, अनपेक्षित नसते. अशाप्रकारे अपेक्षित असलेले जेव्हा घडते, तेव्हा प्रतिक्षिप्त क्रिया घडत नाही. त्यामुळे स्वत:च स्वत:ला केलेल्या गुदगुल्यांमुळे आपणास हसू येत नाही.’’ आईने सांगितले.
जयश्रीचे शंकरपाळे खाऊन संपले व ती ‘‘आई, मी आता माझा अभ्यास करते. काही गोष्टी तू मला उद्या सांगशील.’’ असे म्हणत आपल्या खोलीत अभ्यासाला निघून गेली.