हवामान विभागाकडून अलर्ट जारी
शिमला : मागील आठवड्यात संपूर्ण राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावली होती. त्या तुलनेत या आठवड्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली. मात्र अनेक भागांत पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे चित्र दिसून येत आहे. अशातच हिमाचल प्रदेशात पावसाने धुमाकूळ (Himachal Rain) घातला आहे. याठिकाणी पावसाची संततधार सुरु असल्यामुळे अनेक भागात मोठ्या प्रमाणात साचले आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून २८ जणांचा मृत्यू झाल्याची देखील बातमी मिळत आहे. एकीकडे मुसळधार तर दुसरीकडे भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे हिमाचलमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिमाचल प्रदेशासह उत्तर प्रदेशात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे हिमाचलमधील रक्कड कॉलनीत पावसाचे पाणी शिरले. यामुळे नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यातच उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील गंगा नदीसह इतर नद्यांच्या पाणीपातळीतही लक्षणीय वाढ झाल्यामुळे हवामान विभागाने (IMD) या भागात अलर्ट जारी केला.
हिमाचलमध्ये तीन वेळा जाणवले भूकंपाचे धक्के
हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीच्या घटनेनंतर भूकंपाचे धक्के बसले आहेत. या ठिकाणी झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.३ इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू मंडी येथे होता. भूकंपाचे धक्के तीन वेळा जाणवले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.